Sunday, July 11, 2010

99 क्लब




एक राजा होता. मोठे रामराज्य, नोकर-चाकर, शूर सैन्य, सर्व काही होते त्याच्याकडे, पण तरीही तो संतुष्ट नव्हता. दु:खात बुडून व वैफल्याच्या चिखलात माखलेल्या या राजाची अवस्था फारच वाईट होती. सहज राजवाड्यात फिरताना त्याने त्याच्या एका नोकराला गाणी गात साफसफाई करताना पाहिले. ही त्याच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. आपल्याकडे एवढे सगळे असूनही आपण दु:खी आहोत आणि दोन पैसे कमावणारा आपला सेवक खूप आनंदी आहे हे कोडे त्याला उलगडत नव्हते.

उत्सुकता अनावर होताच राजाने सेवकाला विचारले, ‘‘तू एवढा आनंदात का आहेस?’’ त्यावर सेवक म्हणाला, ‘‘राजे, मी एक नोकर आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजाही मोजक्या आहेत. डोक्यावर छत व दोन वेळेस गरम जेवण मिळाले की आमचे भागते.’’ राजाला हे पटले नाही व आनंदी राहण्याचे हे कारण कसे असेल ही शंका दूर करण्यास त्याच्या एका खास मंत्र्याला या संवादाबद्दल सांगितले. मंत्री म्हणाला, ‘‘राजे तो सेवक ‘99 क्लब’चा सदस्य नसणार. त्याला आपण सदस्य करू, मग बदल पाहा.

’’ मंत्र्याने त्या सेवकाच्या घराबाहेर 99 सोन्याचे शिक्के ठेवले. ते मिळताच सेवक उल्हसित झाला. मोजल्यावर तो विचारात पडला, ‘‘99 शिक्के कुणी का ठेवेल. 1 नक्कीच कुणी घेतला असेल किंवा कुठेतरी पडला असेल.’’ आपला एक शिक्का कमी आहे या विचाराने त्याचे मन जळू लागले. तो कमावून आपण 100 शिक्क्याचा वाटा पूर्ण करायचाच या जिद्दीने तो कामाला लागला. दगदग, धडपड, तडजोड त्याच्या आयुष्याचा भागच झाले. कुटुंब मदत नाही करीत याची चीडचीड आणि नैराश्याने त्याला पछाडले. त्याने गाणेही बंद केले. हा बदल पाहून राजा स्तब्ध झाला. मंत्र्याला बोलावून त्याने हा बदल कसा घडला हे विचारले. मंत्री म्हणाला, ‘‘यालाच तर मी ‘99 क्लब’ म्हणतो. आता हा सेवक 99 क्लबचा सदस्य झाला आहे.’’
‘99 क्लब’ हे अशा माणसांच्या समूहाला दिले गेलेले नाव आहे, ज्यांच्याकडे खूप काही असूनही ते कधीच खूश नसतात. कारण ते 99 सोडून ‘1’ या संख्येमागे झुरत असतात. ‘ते एक मिळाले की सगळं चांगलं होईल, असे समजणारे संपूर्ण आयुष्य शोधात घालवितात. थोडक्यात मनुष्य सुखात राहू शकतो, पण काही मोठे हाती लागले की माणूस हावरा होतो. त्याला अजून हवे असे वाटू लागते. झोप, आनंद, आपल्यांची मनं, कुटुंबाचे हित, सर्व काही पणाला लावून माणूस हावरेपणाच्या आहारी जातो.


ऐषाराम आणि गरजा यातला फरक जाणून घ्या. गरजांवर नियंत्रण ठेवा. एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना बेदखल करू नका. ‘99 क्लब’चे सदस्य होऊ नका

No comments:

Post a Comment