
मनुष्य म्हणजे देवाची कलाकृती. या कलाकृतीवर त्याचे भारीच प्रेम आहे. त्याने घडवलेल्या त्याच्या पिलांवर अपमान, अन्याय किंवा संकटाचे आभाळ कोसळले की, तो त्यांच्या मदतीला धावतो. माणसांच्या संरक्षणासाठी तो त्यांच्यातच जन्म घेतो, त्यांचा त्रास भोगतो आणि मग त्यांना त्यातून मुक्त करतो. तो देवासारखा नटून थटून न वावरता सामान्यांसारखाच राहतो. कधी कधी सुटाबुटातही आढळतो. असाच सुटात वावरलेला देव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या मध्य प्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते 14 वे अपत्य होते.
हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेच्या सैन्यात शिपाई होते. सैनिकी शाळेत शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न आणि ज्ञानी होऊ शकले. त्यांनी आपल्या मुलांनाही मराठी व इंग्रजी शिकण्याची प्रेरणा दिली. कबीरपंथीय असलेल्या रामजींनीही शिक्षणाला फार महत्त्व दिले. मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. बाबासाहेबांना फार लहान वयातच शिक्षणाची गोडी लागली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी रामजींना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. प्रवेश तर मिळाला, पण वागणूक मात्र फारच वाईट मिळत असे. बाबासाहेबांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे. त्यांना शिक्षकांचे सहाय्यही मिळत नसे. बाबासाहेबांनी एकदा शिक्षकांना सांगितले, ‘‘सर, फळ्यावरचे दिसत नाही हो आम्हाला! इतरांसोबत बसू द्याल का? कृपा करा.’’ त्यावर शिक्षक म्हणाले, ‘‘मिळतंय ते नशीब समज. नाहीतर तेही मिळणार नाही.’’ जे ऐकू येते ते नीट ऐकले नाही तर काहीच कळणार नाही म्हणून बाबासाहेब एकाग्र चित्ताने मन लावून ऐकत. 1893 मध्ये सुभेदार रामजींनी सातार्याची वाट धरली. ते सातारा येथे आपल्या कुटुंबासह राहू लागले.
1896 च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला कॅम्प स्कूलमध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. त्याच काळात मस्तकशूळ या आजाराने बाबासाहेबांच्या आईचे निधन झाले. आत्या मीराबाईने भीमरावांना आईचे प्रेम व आधार दिला. ‘‘आपल्याला असे का वागवले जाते गं?’’ या भीमरावांच्या प्रश्नाला मीराबाईचे एकच उत्तर असायचे, ‘‘देवाच्या लाडक्या माणसांना होतो रे त्रास! देव परीक्षा घेतो. आपण चांगले वागून पास होत राहायचे!’’ लहान भीमराव हेच समजून पास होत राहिले. रामजींनी 1898 साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तिथे आंबेडकर एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करून 1907 साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली. बाबासाहेबांना नेहमी आठवत असे की, शिपाई त्यांना शाळेत पाणी द्यायचा. ते म्हणायचे ‘‘नो प्यून, नो वॉटर’’ म्हणजे शिपाई नसला तर पाणी द्यायच्या भानगडीत कुणी पडायचे नाही. ‘अस्पृश्य’ हे लेबल काढून टाकले पाहिजे असेे ते सतत म्हणत. 1908 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. ‘‘तुला मोठे होऊन काय करायचे आहे?’’ असे एका प्राध्यापकांनी त्यांना एकदा विचारले. बाबासाहेब म्हणाले, ‘‘मला करायचे आहे ते खूप मोठे आहे. मला न्याय आणि अन्याय यातला फरक लोकांना समजवायचा आहे. माझे स्वप्न पूर्ण होईलच!’’ त्याआधी 1906 मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय 9 वर्षे) यांच्याबरोबर ठरले होते. त्यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. आपले ध्येय सतत लक्षात घेऊन बाबासाहेबांनी जीवतोड मेहनत केली. 1912 साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. त्याच वर्षी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. यशवंतच्या आगमनाने बाबासाहेबांच्या आयुष्यात बहार आणली.
सुखदु:खांच्या येण्या-जाण्याने आयुष्य काही थांबत नाही. 1913 मध्ये आजारी वडिलांचे निधन झाले. 1913 मध्येच त्यांना कोलंबिया विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली. 11.50 पौंडची शिष्यवृत्ती स्वीकारून न्यूयॉर्कला राहिले. नवल भातेना नावाच्या मित्रासोबत ते लिविंग्स्टन हॉल येथे राहिले. दादा केळुस्करांनी दिलेल्या ‘गौतम बुद्ध’ या पुस्तकाने बाबासाहेबांना एक दिशा दिली.ते एम.ए. झाले. 1916 साली ग्रे इन कॉलेजात वकिलीचे शिक्षण घेण्याकरिता त्यांनी प्रवेश केला. शिष्यवृत्ती संपली. ‘‘आता तुम्ही थांबू नाही शकत.’’ असे त्यांना सांगण्यात आले. ‘‘नंतर येऊन पेपर द्या’’ हेे ऐकून परतीचा प्रवास सुरू झाला. चार वषार्ंत थिसीस पोहोचवण्याचा करार देऊन ते निघाले. आवडीची पुस्तके प्रवासात हरवली, पण विश्वासाचा खजिना हृदयात साठवून परतले. बाबासाहेबांनी एक आघाडीचे हिंदुस्थानी विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 च्या बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजासाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. ‘मूकनायक’ नामक वृत्तपत्राला त्यांनी 1920 साली जन्म दिला. ‘हे वृत्तपत्र म्हणजे आमचा शांततापूर्ण लढा ठरेल,’ असे ते सर्वांना सांगत. याच वृत्तपत्राद्वारे त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातीभेदाविरुद्ध काहीही करीत नसलेल्या हिंदुस्थानी राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांसोबत जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकर दलितांचे नामवंत राजकीय नेते झाले. महात्मा गांधी आणि ब्रिटिशांनी अखिल भारतीय कॉंग्रेसवर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. 8 ऑगस्ट 1930 रोजी मागासवर्गींयांच्या सभेमध्ये त्यांनी आपला दृष्टिकोन जाहीर केला. मागासवर्गीय कॉंगे्रस व ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय सुरक्षित होणार नाहीत असे स्पष्ट केले. त्यांच्या चळवळी सुरूच होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी, हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी मोर्चेही काढले. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी सत्याग्रहही केला. लंडन येथील दुसर्या गोलमेज परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर मतभेद झाले.म. गांधींना धार्मिक व जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते. ब्रिटिशांनी मागणी मान्य केली आणि म.गांधी उपोषणाला बसले.
नंतर आरक्षित मतदारसंघ झालेच. ‘दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल’ असे उपोषणाचे नंतर त्यांनी वर्णन केले. भारताचेे संविधान लिहिणार्या या थोर व्यक्तिमत्त्वाने अनेकांचे भविष्यच लिहिले. जाती-धर्माच्या काळोखात अडकलेल्यांना मानाने जगता येईल एवढा प्रकाश दिला. त्यांच्या एका भक्ताला ते म्हणाले, ‘‘बुद्ध समजण्यासाठी वाचन पुरेसे नाही. बुद्ध व्हावे लागते. सत्य मार्गावर लाख बोलशील, पण त्या मार्गावर चालावेही लागते.’’ 14ऑक्टोबर 1956 ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूर येथे त्यांच्या सर्व चाहत्यांनीही त्यांना साथ दिली. डायबिटीसच्या त्रासाने पछाडले असलेे तरी अनेकांना ‘न्याय’ मिळावा याव्यतिरिक्त कोणतीच काळजी नव्हती. त्याच वर्षी 6 डिसेंबरला दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी फक्त बौद्ध धर्मच नाही स्वीकारला तर ते बुद्ध झाले. बुद्ध कधी संपत नाही तसेच बाबासाहेब आंबेडकर कधीच गेले नाहीत. ज्यांना त्यांच्यामुळे जीवन मिळाले त्या सर्वांच्या श्वासात ते आहेत. अन्याय आणि अपमानाच्या सावलीतून सामान्य जीवनाचे स्वप्न साकार करून देणार्या बाबासाहेबांना थोर व्यक्ती न म्हणता देव म्हटलेलेच उचित असावे. अन्याय झाला आणि बाबासाहेबांच्या रूपाने देव मदत करून गेला. आता पटले असेल, देव कधीही कुठेही कसाही येऊ शकतो. गंध लावून, पितांबर नेसून किंवा बाबासाहेबांसारखा सुटाबुटात. कुणावर अन्याय करू नका आणि स्वत:वर झालेल्या अन्यायाविरोधात लढा. हाच होता बाबासाहेबांचा जीवनमंत्र. या सुटातल्या देवाने करोडो लोकांना गुलामीतून सोडवले, अपमानापासून वाचवले. या देवाला माझा नमस्कार!
beautiful way of expressing gratitude.
ReplyDeletewell written and heart touching .. thank you Swapna for sharing this article.