Showing posts with label swapna patker. Show all posts
Showing posts with label swapna patker. Show all posts

Monday, July 4, 2011

सुटातला देव


मनुष्य म्हणजे देवाची कलाकृती. या कलाकृतीवर त्याचे भारीच प्रेम आहे. त्याने घडवलेल्या त्याच्या पिलांवर अपमान, अन्याय किंवा संकटाचे आभाळ कोसळले की, तो त्यांच्या मदतीला धावतो. माणसांच्या संरक्षणासाठी तो त्यांच्यातच जन्म घेतो, त्यांचा त्रास भोगतो आणि मग त्यांना त्यातून मुक्त करतो. तो देवासारखा नटून थटून न वावरता सामान्यांसारखाच राहतो. कधी कधी सुटाबुटातही आढळतो. असाच सुटात वावरलेला देव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या मध्य प्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते 14 वे अपत्य होते.

हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेच्या सैन्यात शिपाई होते. सैनिकी शाळेत शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न आणि ज्ञानी होऊ शकले. त्यांनी आपल्या मुलांनाही मराठी व इंग्रजी शिकण्याची प्रेरणा दिली. कबीरपंथीय असलेल्या रामजींनीही शिक्षणाला फार महत्त्व दिले. मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. बाबासाहेबांना फार लहान वयातच शिक्षणाची गोडी लागली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी रामजींना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. प्रवेश तर मिळाला, पण वागणूक मात्र फारच वाईट मिळत असे. बाबासाहेबांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे. त्यांना शिक्षकांचे सहाय्यही मिळत नसे. बाबासाहेबांनी एकदा शिक्षकांना सांगितले, ‘‘सर, फळ्यावरचे दिसत नाही हो आम्हाला! इतरांसोबत बसू द्याल का? कृपा करा.’’ त्यावर शिक्षक म्हणाले, ‘‘मिळतंय ते नशीब समज. नाहीतर तेही मिळणार नाही.’’ जे ऐकू येते ते नीट ऐकले नाही तर काहीच कळणार नाही म्हणून बाबासाहेब एकाग्र चित्ताने मन लावून ऐकत. 1893 मध्ये सुभेदार रामजींनी सातार्‍याची वाट धरली. ते सातारा येथे आपल्या कुटुंबासह राहू लागले.

1896 च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला कॅम्प स्कूलमध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. त्याच काळात मस्तकशूळ या आजाराने बाबासाहेबांच्या आईचे निधन झाले. आत्या मीराबाईने भीमरावांना आईचे प्रेम व आधार दिला. ‘‘आपल्याला असे का वागवले जाते गं?’’ या भीमरावांच्या प्रश्‍नाला मीराबाईचे एकच उत्तर असायचे, ‘‘देवाच्या लाडक्या माणसांना होतो रे त्रास! देव परीक्षा घेतो. आपण चांगले वागून पास होत राहायचे!’’ लहान भीमराव हेच समजून पास होत राहिले. रामजींनी 1898 साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तिथे आंबेडकर एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करून 1907 साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली. बाबासाहेबांना नेहमी आठवत असे की, शिपाई त्यांना शाळेत पाणी द्यायचा. ते म्हणायचे ‘‘नो प्यून, नो वॉटर’’ म्हणजे शिपाई नसला तर पाणी द्यायच्या भानगडीत कुणी पडायचे नाही. ‘अस्पृश्य’ हे लेबल काढून टाकले पाहिजे असेे ते सतत म्हणत. 1908 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. ‘‘तुला मोठे होऊन काय करायचे आहे?’’ असे एका प्राध्यापकांनी त्यांना एकदा विचारले. बाबासाहेब म्हणाले, ‘‘मला करायचे आहे ते खूप मोठे आहे. मला न्याय आणि अन्याय यातला फरक लोकांना समजवायचा आहे. माझे स्वप्न पूर्ण होईलच!’’ त्याआधी 1906 मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय 9 वर्षे) यांच्याबरोबर ठरले होते. त्यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. आपले ध्येय सतत लक्षात घेऊन बाबासाहेबांनी जीवतोड मेहनत केली. 1912 साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. त्याच वर्षी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. यशवंतच्या आगमनाने बाबासाहेबांच्या आयुष्यात बहार आणली.

सुखदु:खांच्या येण्या-जाण्याने आयुष्य काही थांबत नाही. 1913 मध्ये आजारी वडिलांचे निधन झाले. 1913 मध्येच त्यांना कोलंबिया विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली. 11.50 पौंडची शिष्यवृत्ती स्वीकारून न्यूयॉर्कला राहिले. नवल भातेना नावाच्या मित्रासोबत ते लिविंग्स्टन हॉल येथे राहिले. दादा केळुस्करांनी दिलेल्या ‘गौतम बुद्ध’ या पुस्तकाने बाबासाहेबांना एक दिशा दिली.ते एम.ए. झाले. 1916 साली ग्रे इन कॉलेजात वकिलीचे शिक्षण घेण्याकरिता त्यांनी प्रवेश केला. शिष्यवृत्ती संपली. ‘‘आता तुम्ही थांबू नाही शकत.’’ असे त्यांना सांगण्यात आले. ‘‘नंतर येऊन पेपर द्या’’ हेे ऐकून परतीचा प्रवास सुरू झाला. चार वषार्ंत थिसीस पोहोचवण्याचा करार देऊन ते निघाले. आवडीची पुस्तके प्रवासात हरवली, पण विश्‍वासाचा खजिना हृदयात साठवून परतले. बाबासाहेबांनी एक आघाडीचे हिंदुस्थानी विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 च्या बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजासाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. ‘मूकनायक’ नामक वृत्तपत्राला त्यांनी 1920 साली जन्म दिला. ‘हे वृत्तपत्र म्हणजे आमचा शांततापूर्ण लढा ठरेल,’ असे ते सर्वांना सांगत. याच वृत्तपत्राद्वारे त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातीभेदाविरुद्ध काहीही करीत नसलेल्या हिंदुस्थानी राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांसोबत जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकर दलितांचे नामवंत राजकीय नेते झाले. महात्मा गांधी आणि ब्रिटिशांनी अखिल भारतीय कॉंग्रेसवर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. 8 ऑगस्ट 1930 रोजी मागासवर्गींयांच्या सभेमध्ये त्यांनी आपला दृष्टिकोन जाहीर केला. मागासवर्गीय कॉंगे्रस व ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय सुरक्षित होणार नाहीत असे स्पष्ट केले. त्यांच्या चळवळी सुरूच होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी, हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी मोर्चेही काढले. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी सत्याग्रहही केला. लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर मतभेद झाले.म. गांधींना धार्मिक व जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते. ब्रिटिशांनी मागणी मान्य केली आणि म.गांधी उपोषणाला बसले.

नंतर आरक्षित मतदारसंघ झालेच. ‘दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल’ असे उपोषणाचे नंतर त्यांनी वर्णन केले. भारताचेे संविधान लिहिणार्‍या या थोर व्यक्तिमत्त्वाने अनेकांचे भविष्यच लिहिले. जाती-धर्माच्या काळोखात अडकलेल्यांना मानाने जगता येईल एवढा प्रकाश दिला. त्यांच्या एका भक्ताला ते म्हणाले, ‘‘बुद्ध समजण्यासाठी वाचन पुरेसे नाही. बुद्ध व्हावे लागते. सत्य मार्गावर लाख बोलशील, पण त्या मार्गावर चालावेही लागते.’’ 14ऑक्टोबर 1956 ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूर येथे त्यांच्या सर्व चाहत्यांनीही त्यांना साथ दिली. डायबिटीसच्या त्रासाने पछाडले असलेे तरी अनेकांना ‘न्याय’ मिळावा याव्यतिरिक्त कोणतीच काळजी नव्हती. त्याच वर्षी 6 डिसेंबरला दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी फक्त बौद्ध धर्मच नाही स्वीकारला तर ते बुद्ध झाले. बुद्ध कधी संपत नाही तसेच बाबासाहेब आंबेडकर कधीच गेले नाहीत. ज्यांना त्यांच्यामुळे जीवन मिळाले त्या सर्वांच्या श्‍वासात ते आहेत. अन्याय आणि अपमानाच्या सावलीतून सामान्य जीवनाचे स्वप्न साकार करून देणार्‍या बाबासाहेबांना थोर व्यक्ती न म्हणता देव म्हटलेलेच उचित असावे. अन्याय झाला आणि बाबासाहेबांच्या रूपाने देव मदत करून गेला. आता पटले असेल, देव कधीही कुठेही कसाही येऊ शकतो. गंध लावून, पितांबर नेसून किंवा बाबासाहेबांसारखा सुटाबुटात. कुणावर अन्याय करू नका आणि स्वत:वर झालेल्या अन्यायाविरोधात लढा. हाच होता बाबासाहेबांचा जीवनमंत्र. या सुटातल्या देवाने करोडो लोकांना गुलामीतून सोडवले, अपमानापासून वाचवले. या देवाला माझा नमस्कार!

मीच मला खांदा देणार!


शरीरात वेगवेगळ्या अवयवात असलेला एक आहे खांदा. डोळ्यावर, ओठांवर, केसांवर, हातांवर अगदी पायांवरही कविता लिहिल्या जातात. पानावर पाने भरून लेख लिहिले जातात. पण ‘खांदा’ या विषयाकडे फार कुणाचे लक्ष जात नाही. खरं तर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण आयुष्य खांदे शोधण्यात जाते. मेल्यानंतर मात्र खांदे देणार्‍यांची रांग लागते. आलटून पालटून नंबर लावून प्रत्येकाला खांदा द्यायचा असतो. ‘मलाही द्यायचाय यांना खांदा. थोडे पुढे गेल्यावर जरा मला संधी द्याल का?’ हे जेवढे सहजपणे ऐकू येते, तेवढे सहज जिवंतपणी नाही कानी पडत. एवढे सगळे खांदे जिवंतपणी का नाही समोर येत, या प्रश्‍नावर विचार करून वेळ घालवणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्यात पद्धतच आहे ती, ‘जिवंतपणी तिरस्कार आणि मरणोत्तर पुरस्कार.’ अनेक मोठ्या लोकांनीही या पद्धतीतच जीव सोडला. कठीण परिस्थितीत कधी कधी आधार घ्यावासा वाटतो. खूप मनमोकळे बोलावे, रडावे, न पटणारी बाजू असली तरी कुणी ऐकून घ्यावी, डोक्यावरून हात फिरवावा, सगळं नीट होईल असे उगाच आश्‍वासन द्यावे, हे सगळे वाटत राहते. पण तसे काही होत नाही. मग रागाचे वादळ मन, मेंदू झपाटून टाकते. ही सगळी तडफड असते फक्त ‘खांद्या’साठी.

मोबाईलमध्ये जमा असलेल्या सर्व नावांमध्ये आपल्याला समजून घेईल असे एकही आढळत नाही अशा क्षणी. हे असे क्षण सर्वांच्याच जीवनात येतात. प्रत्येकाला आधाराची ओढ असते. डोके ठेवायला सगळेच खांदा शोधत असतात. त्यात काहीच गैर नाही. पण आपण विसरतो की, आपल्यालाही दोन खांदे आहेत. आपण जगभर आधार शोधतो, पण स्वत:च स्वत:ला आधार देत नाही. ही चूकच नाही का? ज्या खांंद्यांनी आपण इतरांना आधार देतो तेच खांदे आपल्यालाही आधार देऊ शकतात ही गोष्ट विसरू नका. खांदे शोधत फिराल तर स्वत:च हरवाल. तुम्ही जे खांदे शोधत आहात ते फक्त जगण्याला पूर्णविराम लागल्याशिवाय मिळत नाहीत. आधाराची गरज जाणवली की आरशात पहा. आपल्या मजबूत खांद्यावर असेल त्या संकटाची जबाबदारी सोडा. जेव्हा तुम्ही आयुष्यात संकटक्षणी आरशात पाहाल...हे खांदे तुमच्यासोबत असतील. कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. खांदे शोधू नका, आधारासाठी वणवण फिरू नका. आरशात पहा. स्वत:ला खांदा द्या. स्वत:ला आधार द्या. पुढल्यावेळी डोके ठेवण्याकरिता खांदा हवा असे वाटले की आरशात पाहून म्हणा, ‘मीच मला खांदा देईन.’

Sunday, June 19, 2011

आय ऍॅम अ डिस्को डान्सर...



सगळं काही नीट होत असताना मध्येच राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीडचीड होते. का? कशासाठी? कशामुळे? काहीच कळत नाही, पण असं होतं. ऑफिसचे काम लवकर संपते. नेहमी लवकर घरी पोहोचावे असे वाटत असून पोहोचता न येणार्‍याला घरी जावेसे वाटत नाही. इथे तिथे वेळ घालवूनही वेळ जात नाही. कारण काही नसते, पण असं होतं. खूप वर्षे वाट पाहिलेली संधी दारात चालून येते. मनासारखे होते, पण आनंदाचा एक अंशही जाणवत नाही. खरं तर अर्थच नाही याला, पण असं होतं.

आपले प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीवर क्रोधाचा वर्षाव केला जातो. तसे करायचे नसते, पण नकळत घडून जाते. प्रेम अमाप असते तरी असं होतं. तरतरीत सुरू झालेल्या सकाळचा शेवट एक वैफल्यपूर्ण संध्याकाळ करते. बिघडलेले काहीच नसते. दिवसही नेहमीप्रमाणेच सरलेला असतो, पण असं होते. आपली क्षमता, कुवत माहीत असूनही कधीतरी लाचारीचे पांघरुण ओढून झोपावेसे वाटते. आपण काहीच करू शकत नाही. आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच मानावेसे वाटते. तोच आत्मविश्‍वास, तीच जिद्द, तीच स्वप्नं असतात मनात, पण असं होतं.

एकटेपणाची खूप भीती वाटते. कुणीतरी सोबत असावे असे वाटते. मुद्दाम सर्वांपासून दूर राहायचा, अबोला धरायचा निर्णय आपण घेतो. गरज असते संवादाची आणि आपण तोंड लपवून पळत राहतो. करायचे असते काहीतरी, करतो वेगळेच. असेही होते. अरे पण का होते याचे उत्तर कुणालाच सापडत नाही. कदाचित ते उत्तर न सापडण्यातच जगण्याची मजा आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन फुलपाखरासारखे असते. रंगीबेरंगी. कधी या फुलावर तर कधी त्या. मध्येच खूश होते. आनंदात रडवते, दु:खात हसवते. प्रगतीचा ध्यास लावते. ती मिळाली की, त्याचे महत्त्व संपवते. फुलपाखराप्रमाणे उडत राहते. पाऊस नाही पडला की, मन म्हणते ‘कसे होणार जगाचे? पावसाला काही काळजीच नाही.’ धो धो पडला की, तेच मन म्हणते, ‘अरे, काही सीमा आहे की नाही? किती पडायचे पावसाने!’ आणि अगदीच काही नाही तर म्हणते ‘पावसाचे काहीच खरं नाही, कधीही येतो आणि कधीही जातो.’ मन हे असेच.

छोट्या पोरांची मनं सांभाळण्यासाठी आपण जी मेहनत घेतो, तेवढेच श्रम आपण स्वत:चे मन सांभाळण्यासाठी घ्यायला हवे. मनाशी संवाद साधा. स्वत:च्या मनाला समजवा. ‘मूड’च्या नावाखाली काम न होणे हे योग्य नाही. मन बदलत राहते, उडत राहते, भावनांचे मंथन करते, विचारांचे पत्ते पिसते, मूड नावाच्या गुंत्यात गुंतवते. मन अक्षरश: आपल्याला नाचवते आणि आपण नाचत राहतो. काही कळतच नाही, कधी कधी बेसूर रडगाण्याचे खड्डे खणून त्याभोवती बेताल ठेके देत नाचतो. खड्ड्यात पडू या भीतीने कुढतो, पण नाचत राहतो. हा नाच नाचण्यापेक्षा मनाचे हे खेळ समजून घ्या. आपल्या बाळांचे जेवण सांडणे, धडपडणे, रडणे, हसणे, अगदी काहीही जसे ‘गोड’ किंवा ‘किऊट’ वाटते तसेच स्वत:च्या मनाच्या नाचालाही गोड मानून हसत रहा. त्या बेताल नृत्याला छान समजूतदारीचा ठेका द्या. मनाच्या खेळांची मजा घ्या. त्यात व्यापून जाऊ नका. आनंदाचा ताल धरून मनासोबत नाचा. रोज नाचा. आनंद घ्या जगण्याचा. मनाच्या उड्यांचा. उत्तरे शोधू नका. अनुभव घ्या. मनासोबत आनंदाने नाचताना खुशाल म्हणा ‘‘आय ऍम अ डिस्को डान्सर.’’

Tuesday, June 14, 2011

शेवटचा उ‘संत’



सध्या उपोषणांचा सीझन आहे. क्रिकेट, फुटबॉल किंवा ऑलिम्पिक्सचे जसे थेट प्रक्षेपण टी.व्ही.वर दाखवले जाते तसेच हे उपोषणाचे कार्यक्रमदेखील लाईव्ह टेलिकास्ट होतात. ए.सी. तंबू, वारा घालणारे सतराशे साठ चहाते, सर्व बाजूंनी कॅमेरा आणि दुनियेभरच्या गोंगाट्यातली ही उपोषणे पाहून हसावे की रडावे हे कळायचाही मार्ग नसतो. ‘मी संत आहे’ अशी पाटी गळ्यात टांगून फिरणार्‍यांनी अध्यात्म, देव आणि समाजसेवेचा जो बाजार मांडलाय त्यात ढोंग आणि फसवेगिरीखेरीज काहीच प्राप्त नाही. अनेक महाराज, अण्णा आणि बाबांच्या संतगिरीच्या धंद्याचे स्वरूप पाहून आता पटते की देवाने संत बनवायचे सोडून दिले. 11 सप्टेंबर 1895 रोजी जन्माला आलेले विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यांच्यानंतर आलेत फक्त पंत आणि संतत्वाचा अंत. लहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदे मातरम्चे नारेही त्यांना खेचत होते. 1916 मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता. आईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.

बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्‍न लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला. एक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.’

हे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले. गांधीजींनी त्यांना आश्रमात राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादातील आश्रमात एकटे राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. ते नेहमी सांगत, ‘मी बंगालला गेलो नाही किंवा हिमालयातही नाही गेलो. पण गांधीजींच्या सहवासात मला त्या दोनही ठिकाणी पोहोचल्याचे सुख मिळाले. हिमालयाची शांतता आणि अन्यायविरोधाचा पराक्रम दोनही एकाच वेळी कसे घडू शकते ते मला आता कळले.’ 7 जून 1916 या दिवशी ते गांधीजींना पहिल्यांदा कोचरब आश्रमात भेटले आणि त्याच दिवसापासून आपले आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केले. विनोबांना महान व्हायचे नव्हते. नेता व्हायचे नव्हते. गर्दी जमवायची नव्हती. ते नेहमी सांगत, ‘रोज ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. नाहीतर जगणे व्यर्थ आहे.’ 1921 साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला पोहोचले. तेथे त्यांना सेठ जमनालाल बजाज भेटले. बजाज यांनी विनोबांना गुरू मानले. पवनार येथे परमधाम आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात. केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांनी बंद केला होता. याविरुद्धच्या 1924 मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले. स्वातंत्र्यलढ्यात 1932 साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन सांगितले. हेच गीता प्रवचन ‘गीताई’ झाले. याच्याशी एक गोड गोष्ट जुडलेली आहे.

विनोबा कॉलेजमध्ये असताना विनोबांची आई गीतेवरील प्रवचन ऐकायला जात असे. एकदा ती विनोबांना म्हणाली, ‘गीता संस्कृत आहे. ती मला समजत नाही. मला मराठी गीता आणून दे.’ त्यावेळी उपलब्ध होता तो ग्रंथ विनोबांनी तिला आणून दिला. तो पसंत नव्हता तरी नाइलाजाने तोच द्यावा लागला. तेव्हा आई विनोबांना म्हणाली, ‘हे पद्य तर संस्कृतइतकेच कठीण आहे. तू स्वत:च का अनुवाद करीत नाहीस?’ आपला मुलगा गीतेचा अनुवाद करू शकेल इतका आत्मविश्‍वास तिला कशामुळे वाटला असेल कोण जाणे! कदाचित तिने विनोबांचे अप्रतिम कविता लिहून अग्नीला समर्पण करणे पाहिले असेल. आईच्या या पूर्ण विश्‍वासामुळे विनोबांना फार मोठे बळ लाभले. विनोबांची आई विद्वान नव्हती की शिकली सवरलेली नव्हती. तिने कधी विनोबांना शिकवलेही नाही. उलट विनोबांनीच तिला वाचायला शिकवले होते. तिचा अत्याधिक विश्‍वास विनोबांच्या जीवनाचा पाया होता. विश्‍वास ही एक जादू आहे. अनेक धर्मग्रंथ सांगतात, ‘तू पापी आहेस, पुण्यवान हो.’ पण वेद, उपनिषदे विश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘तू ब्रह्म आहेस.’ त्या माऊलीने विनोबांवर असाच विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास विनोबांनी गांधीजींवर ठेवला. आईच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी गीतेचा मराठी अनुवाद करून त्या अनुवादाला ‘गीताई’ म्हणजे गीता-आई असे नाव दिले. ही गीताई आज महाराष्ट्रात घरोघर पोहोचली आहे. विनोबांनी जे काही चिंतन, मनन केले होते आणि लिहिलेले अग्नीला समर्पण केले होते त्याचाच हा प्रसाद आहे असे विनोबांना वाटते. ही साहित्यिक कृती नसून हे धर्म-चिंतन आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जेलमध्ये विनोबा होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेले कैदी गीताईची मागणी करीत. फाशीला चढणार्‍या एका कैद्याने डॉक्टरांच्या मार्फत विनोबांना संदेश पाठवला, ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. गीताई वाचली. आता आनंदाने जातो.’ विनोबा सर्वांचे प्रिय होते.

निसर्गाचे व मुक्या प्राण्यांचे कैवारी होते ते. शांतपणे उपोषणे, साधे कपडे, गोरगरीबांची सेवा हेच त्यांचे जगणे. गांधीजींचे दोन लाडके- एक विनोबा आणि एक जवाहरलाल नेहरू. ब्राह्मण असून मांस-मच्छी व मद्यपान करणार्‍या नेहरूंना विनोबा फार आवडायचे नाहीत. गांधींच्या तोंडी विनोबांचा सारखा उल्लेखही नेहरूंना पसंत नव्हता. पण त्यांना ते सहन करण्याखेरीज उपाय नव्हता. जनता विनोबाची दिवानी होती. विनोबा नेहमीच चाहत्यांनी घेरलेले व त्यांच्या प्रवचनांना-भाषणांना खूप गर्दी असायची. या गर्दीसाठी नेहरू विनोबांजवळ जाऊ लागले. लोकांचे प्रचंड प्रेम होते विनोबांवर, नेहरूंचे नव्हते. पण प्रेम न करणारेही विनोबांकडे खेचले जायचे. विनोबांना अनेक भाषा येत. फ्रेंच व लॅटिनवर तर त्यांचे प्रभुत्व होते. 17 ऑक्टोबर 1940 पासून गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली व भावे यांची निवड केली. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या चळवळीचा आरंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. भूमिहीन हरिजनांनी विनोबांना आपल्या वेदना सांगितल्या. गर्दीतील विनोबांच्या एका भक्ताने उठून सांगितले, ‘मी शंभर एकर जमीन तुम्हाला अर्पण करतो विनोबा.’ हे ऐकून ते थक्क झाले. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या परीने जमिनी दान करणे सुरू केले. विनोबांनी मेलेली मनं जागृत केली. ही होती भूदान चळवळ. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व भूदान चळवळींसाठी विनोबा पायी फिरले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना दिली.

आपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. ‘टाइम’ मासिकाने व ‘यॉर्कर’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या विचाराला साथ दिली. शिस्त हवी असे सांगणार्‍या विनोबांच्या आश्रमात इंदिराजींच्याच माणसांनी काही मासिके जाळून थैमान घातले तेव्हाही ते हसलेच. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.’ त्यांना परदेशात ‘द वॉल्किंग सेंट’ असे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली. 15 नोव्हेंबर 1982 मध्ये विनोबा गेले. शेवटचे दिवस आश्रमात पण सेवेतच घालवले. त्यांना 1983 मध्ये भारतरत्न दिले गेले (मरणोत्तर). माणूस मेल्याशिवाय त्याचे कौतुक करायचे नाही अशी पद्धत आहे. जीव सोडला की पुरस्कार, त्याच्या नावाने रस्ते, बागा व सिनेमे सर्व होते. पण विनोबांचे कौतुक करू तेवढे कमीच. कार्य लिहू तेवढे कमीच. त्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्‍यांनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे. अमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस्थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का?’ विनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे!’ विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यानंतर झाले ते दुकानदार.

Sunday, June 5, 2011

पिडियॅट्रिक संगीतकार


कधी कधी आपल्याला काय बोलावे कळतच नाही. आपण फार विचार करतो काय बोलायचे याचा आणि शेवटी न बोलता ती वेळ घालवतो, पण सलीलचे अगदी उलट आहे. तो कधीही बोलण्याआधी विचार करीत नाही. बर्‍याचदा तो काय बोलणार आहे हे त्यालाही माहीत नसते. ‘अनप्रेडिक्टेबल’ या शब्दाचा खरा अर्थ काय ते सलीलला भेटल्यावर नक्कीच कळते. आयुष्य म्हणजे ‘रुटीन’ तेच तेच आणि जगणे म्हणजे ‘फॉरमॅट’ सगळे करतात तसे. या वागणुकीहून विपरीत जगणार्‍याला आपल्यात ‘सटक’ असे म्हणतात. तसाच एक सटक म्हणजे डॉ. सलील कुलकर्णी.

त्याच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. विचारांची, भावनांची आणि आपलेपणाची बंपर ऑफर असलेल्या सलीलचा जन्म ६ ऑक्टोबर १९७२ मध्ये पुण्यात झाला. एकतर सटक, भन्नाट मुडी आणि त्यात पुणेकर म्हणजे कसले सॉलिड कॉम्बिनेशन असणार हे डॉक्टर याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणे हे भाग्याचेच आहे, असे सलील सांगतो. कारण पु. ल., सुधीर फडके, अत्रे, टिळक, साहित्य, संगीत या सगळ्यांचे उल्लेखसुद्धा मध्यमवर्गीय घरांमध्येच होतात. प्रेमाच्या भिंती आणि संस्कारांचे छत यात सलीलचे बालपण गेले. संगीताची त्याच्या आयुष्यातली सुरुवात त्याच्या श्‍वासाच्या लयीवरच झाली असावी. अडीच वर्षांच्या सलीलने आकाशवाणीवर जयोत्सुते गायले होते. मला मिळालेले पहिले गिफ्ट होते एक हार्मोनियम. त्याने संगीताशी नाही तर संगीतानेच त्याच्याशी एक नाते जोडले असावे असे माझे मत आहे. त्याचे सुदैव असे की लहान गायक म्हणून त्याला कधी कुणी डोक्यावर बसवले नाही. पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमालाबाई शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून त्याने गाण्याचे प्रशिक्षण घेतले. आधीपासून त्याला अभ्यासाचे वेड होते. आपण डॉक्टर व्हायचे हे त्याने ठरवले होते. म्हणूनच जोरजबरदस्ती आणि ढकलमपंची हा प्रकार शिक्षणात त्याने कधीच नाही अनुभवला. एमबीबीएस करीत असतानाच त्याने काही गाणी बनवली. शांता शेळके, पु. लं.सारख्या दिग्गजांनी त्याला दाद दिली. त्याक्षणी तो संगीताकडे वळला. पुराचे पाणी झाडांना ओढून नेते तेव्हा झाडांना चॉईस नसतो. तसेच मी संगीतात वाहून गेलो, असे त्याचे म्हणणे. संगीत दिग्दर्शन म्हणजे गोंगाट आणि स्टुडिओतील मशिनींची कमाल समजल्या जाणार्‍या काळात पेटीवर अप्रतिम चाली बसवणार्‍या सलीलला ‘हॅटस् ऑफ’ म्हणावेसे वाटते. एस. पी. बालसुब्रमणीयम, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, बेला शेंडेंसारख्या मोठमोठ्या गायकांना त्याने आपल्या चालींवर सुरांचा वर्षाव करण्याची संधी दिली आहे. संगीत म्हणजेच सलीलची अभिव्यक्ती. त्याच्यातल्या लहान मुलाला संगीतामुळेच मन मोकळे करता येते हेही तो सांगतो. एकटेपणाचे प्रदर्शन भरवणार्‍यांशी त्याचे अजिबात काही घेणेदेणे नाही. त्याला गर्दीत रमायला आवडते, गप्पा मारायला आवडतात आणि आनंद उपभोगायला आवडतो. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे बाबा गेले. आईच बाबासुद्धा झाली.

आईने कोणतीही उणीव भासू दिली नाही. सलीलच्या वागण्यात जी माया जाणवते त्याचे खरे क्रेडिट कुणाला मिळायला हवे ते आता सर्वांना कळलेच असेल. प्रेमगीते असो किंवा बालगीते, सलीलचे संगीत मनाला भिडणारे असते. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातील गाण्याच्या चाली नसत्या तर कदाचित त्या कवितांचे अर्थ कळले नसते, असे मला नेहमी वाटते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे गाणारा आणि ऐकणारा गाणे संपेपर्यंत डोळे पुसत राहतो. फक्त पेटी, तबला आणि भावना एकत्र आल्या की संगीत हृदयात खोलवर शिरते हे सलीलच्या संगीताने लक्षात येते. बालगीतांना संगीत देणे त्याला आवडते. ते कठीण असते. कारण लहान मुलांना राग, कौशल्य, अलंकार, षडज वगैरे काही कळत नाही. त्यांना गाणे आवडते किंवा आवडत नाही. ‘अग्गेबाई-ढग्गोबाई’ या बालगीतांच्या अल्बममधील गाणी मोठ्यांनाही आवडणारी आहेत. ‘मी पप्पांचा ढापून फोन’ या गाण्याने तर तुफान केले होते. सलीलचे आयुष्य म्हणजे त्याची आई रेखा कुलकर्णी, बायको अंजली आणि पोरं शुभंकर व अनन्या. अंजली ही प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांची कन्या. सलील सांगतो, ‘माझ्या दोन्ही पोरांचा आवाज अंजलीसारखा चांगला आहे हे नशीब.’ सलीलची स्मरणशक्ती फारच छान आहे. एकदा भेटलेल्या व्यक्तीलाही तो विसरत नाही. बाबा गेले तो त्याचा सर्वात वाईट दिवस होता. तो दिवस आजही ठळक आठवतो. त्याला हसायला आवडते, मित्रांसोबत गप्पांच्या मैफली रंगवायला आवडतात, पोरांसोबत खेळायला आवडते. ‘गेलेले क्षण परत येत नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक क्षण जगतो’ असे तो सांगतो. मुलांच्या शाळेत पॅरेंटस् मिटिंगपासून ते मित्रांच्या गरजेच्या वेळेत मी असतो.’

क्रिकेटचे वेड आहे सलीलला. तेंडुलकर, युवराज आणि गांगुलीसोबत घरी जेवायला बसून क्रिकेट या विषयावर गप्पा मारणे हे स्वप्न सलीलसारखेच भन्नाट आहे. माझे मित्र, माझी माणसं हीच माझी संपत्ती आहे हे तो सांगतो. त्याचे अल्बम ‘आयुष्यावर बोलू काही’, नामंजूर, दमलेल्या बाबाची कहाणी, आनंद पहाट, संधीप्रकाश! आणि अनेक हे मनात घर करणारे आहेत. तो सांगतो, मी शर्यतीत नाही. मला कोणते स्टेशन गाठायचे नाही. माझ्या मुलांना व पुढल्या पिढीला माझ्या कार्याचा अभिमान वाटला पाहिजे एवढेच माझे ध्येय. खूप सुंदर विचार करणे, चांगली गाणी बनवणे, खूप प्रेम वाटणे हे सगळे या कार्यासोबत करायचे आहे. मनं जिंकायची आहेत. कोणतीही रेस जिंकायची नाही. त्याचे पुस्तक ‘लपवलेल्या काचा’ आजकाल फार चर्चेत आहे. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की वाचकाला हे आपणच लिहिले आहे असे वाटते. फार सुंदर शब्दांत सलीलने संपूर्ण आयुष्यच त्या पुस्तकात संचित केले आहे. २०७ पानांमध्ये कितीतरी प्रसंग, भावना व वर्ष लपलेली आहेत. हे पुस्तक वाचूनही संपत नाही. खरं तर या पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात ते वाचून संपल्यावरच होते. पुस्तक अर्पण केलंय दोघींना. आईला व हार्मोनियमला. तरीही ते प्रत्येक वाचकाला त्यालाच अर्पण केलंय असे वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचे संगीतवेड, क्रिकेटवेड, प्रेमळ स्वभाव, संगीत शाळा, त्याचे विद्यार्थी आणि जगण्याची इच्छा हे सगळे त्याच्या जगण्याचा पाया. कुटुंब, मित्रपरिवार आणि संगीत त्याच्या सगळ्यांचे कारण. तो प्रत्येकातल्या लहान मुलाला आपल्या संगीताने जागृत करतो. हसवतो, रडवतो, विचार न करता भावना व्यक्त करायला लावतो. त्याच्या कार्यक्रमात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत पोट धरून हसतातही आणि मान खाली घालून रडतातही. म्हणूनच हा डॉक्टर कम संगीतकार मला अगदी जवळचा वाटतो. अगदी के.जी.मधल्या टीचरसारखा किंवा गोड गोळ्या देणार्‍या लहान मुलांच्या डॉक्टरसारखा.

मुलांचे डॉक्टर तसे मोठ्या माणसातल्या लहान मुलाच्या भावनांचा डॉक्टर सलील याला आपण पिडियॅट्रिक संगीतकार म्हणायला काहीच हरकत नाही. सलील तू तुझा अजबखाना चालूच ठेव. आमच्या भावनांना वाचा दे. तुझ्या संगीताने सर्वांना थोडा वेळ का होईना पण लहान होण्याची संधी दे.

Sunday, May 29, 2011

मी हरत नाही.....



हरणे कुणालाच आवडत नाही. मग त्या शाळेतील कबड्डीच्या स्पर्धा असो, कार्यालयातील चढ-उतार असो किंवा आयुष्याचा खेळ असो, प्रत्येकाला जिंकायचे असते. प्रयत्न आणि कष्टाचे खतपाणी टाकण्यास मागे पुढे झाले तरी यशाचे पीक मात्र अपेक्षित असतेच. तरीही आपण फार पटकन शस्त्र टाकून मोकळे होतो. अडथळ्यांशिवाय जगण्याचा कोणताही मार्ग नाही. छोट्या अडथळ्यांना संकट मानून, घाबरून आपण हरलेल्या माणसांच्या यादीत झटकन आपले नाव नोंदवून टाकतो. स्वत:वर व स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास न ठेवता आपण परिस्थितीच्या आहारी जाऊन लाचारीच्या अंथरुणात डोळे मिटून पडतो. ‘मी हरलो, मी आता काही करू शकणार नाही’ हे म्हणणे फक्त अन्याय नसून गुन्हा आहे. धडपडणे हा गुन्हा नाही, पण परत न उठणे व स्वत:ला सावरण्यास नकार देणे हा महा गुन्हा आहे.

त्याहून मोठा गुन्हा म्हणजे हरण्याच्या भीतीने प्रयत्नच न करणे. मरणाच्या भीतीने कुणी श्‍वास घेणे सोडत नाही तसे पराजयाच्या भयाने थांबणे हे संपण्यासारखेच. भीतीने कोलमडून पडलेल्यांचे आयुष्य म्हणजे प्रवास नसून फरफट असते. आपली हार-जीत आपल्या मानण्यावर असते.नकारात्मक विचार दिशाहीन करतात. धडपडलात तरी पराजयाची भावना मनात विरघळून देऊ नका. ‘पडल्यावर बसून राहू नका. उठून पुढे चाला. इंटरव्हलला ‘दी एण्ड’ समजून बाहेर पडू नका. असे अनेक प्रसंग येतील जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल. स्वप्नांवर जळमटे लागल्यासारखे वाटेल. आता पुढे काहीच उरले नाही हा भाव मनात घर करील, पण अशावेळी घाबरू नका. समजा हे मध्यांतर आहे. नाटकात बरीच मध्यांतरे येतात आणि नाटकाचा अंत हा सुखीच असणार. त्यामुळे जो पडाव सुखी नाही तो अंत नाही हे लक्षात घ्या. थांबू नका. उठा, कामाला लागा. अडथळ्यांना झुंज द्या. स्वत:ला साथ द्या. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या डोळ्यात बघून सांगा, ‘‘मी हरणार नाही, मी हरत नाही.’’

दु:ख आले किती भयंकर,
त्यात कोणी मरत नाही.
चितेच्या आगीस भिऊन,
श्‍वास बंद ही करत नाही;
वेळ वेळेच्या प्रमाणे
मजप्रमाणे सरत नाही
अन् जरी पडले व रडले
मी तरीही हरत नाही!

व्ही. नाही ‘कि. शांताराम’



‘मोठ्या बापाचा आहे ना, मग काय म्हणायचे!’ असे फार सहजपणे बोलले जाते. पण मोठ्या बापाचे असणे म्हणजे काय चीज आहे, हे त्या परिस्थितीत असल्याशिवाय कळत नाही. मोठेपणाचे ओझे वेळेआधीच डोईवर ठेवले जाते. ‘आपण कोण’ हा शोध स्वत: लावण्यापूर्वीच ‘आपण कोण’ हे आपल्याला सांगितले जाते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसेच प्रत्येक परिस्थितीच्याही दोन बाजू असतात. किरण शांताराम म्हणतात की, ‘मी व्ही. शांताराम यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. या कुटुंबात जन्म झाला हे माझे भाग्य आहे.’

26 जून 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपण फारच सुखात गेले. किरण शांताराम यांच्या आई, शांतारामबापूंच्या दुसर्‍या पत्नी, बहीण राजश्री व तेजश्री या किरण यांचा जीवच. दादरच्या किंग जॉर्ज शाळेत त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. खूप मित्र, सुखी कुटुंब आणि खूप प्रेम हेच त्यांचे आयुष्य होते. शिक्षकांचे व सवंगड्यांचे लाडके किरण आई-वडिलांचाही प्राणच होते. आई-वडिलांकडून लहानपणी मिळालेले अमाप प्रेम त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे कारण असावे असे त्यांना वाटते. नंतर वडील कामात तल्लीन होऊ लागले. जास्त वेळ स्टुडिओत घालवायला लागले. फिल्मच्या कामात गुंतलेले असताना वडिलांचे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले, पण त्यांच्या आईने पोरांना कधी ते जाणवू दिले नाही. तीन मुलांची संपूर्ण जबाबदारी एकटीने पार पाडली. ‘आईनेच आम्हाला वाढवले’, असे ते सांगतात. शांतारामबापू जास्त वेळ काढू शकायचे नाही कुटुंबासाठी. पण रात्रीचे जेवण मात्र सर्व एकदमच करायचे. किरण हे लहानपणी खूप मस्तीखोर होते. आपण नीटच अभ्यास केला, पण तरीही मार्क कमी पडले असा त्यांचा टाहो असायचा. बहिणी हुशार होत्या आणि दादाच्या लाडक्याही होत्या. पण बाबांपुढे सर्वांची बोलती बंदच असायची. सहावीत असताना तिमाहीच्या परीक्षेत किरणना कमी मार्क पडले. आई अस्वस्थ झाली व शांतारामबापूंना तिने सांगितले. वडिलांची विचारपूस सुरू झाली. जेवताना या विषयावर चर्चा होत होती. किरणने नावडत्या दह्याची वाटी जरा ढकलली. कदाचित त्यांचा अस्वस्थपणा त्यांनी त्या वाटीवर काढला. पण बाबांना फार काय ते आवडले नाही. जेवणावरून उठून शांतारामबापूंनी किरणला हात पुढे करायला सागितला. जोरात हँगरने हातावर मारले. हँगरचा खिळा हातात घुसला. तो दिवस ते कधीही विसरू शकत नाहीत. त्या जखमेची खोक अजूनही किरणना त्यांच्या वडिलांच्या शिस्तीची व मुलांकडून असलेल्या अपेक्षांची आठवण करून देते.

व्ही. शांताराम हे हृदयाने कोमल, पण शिस्तबद्ध असल्यामुळे सर्वांकडून त्यांची हीच अपेक्षा असायची. त्यानंतरचा काळ थोडा कठीण होता. जयश्रीताई व शांतारामबापू यांच्यात मतभेद होऊ लागले. वादविवादांना कारणांची गरज नाही, असे भासू लागले. मुलांवर या तणावाचा फरक पडू नये म्हणून घटस्फोट घ्यायचे ठरवले. जयश्रीताई व शांतारामबापू वेगळे जगू लागले. जयश्रीताईंनी धीराने पोरांना सावरले. आयुष्यात बदल जरी आला तरी किरण शांताराम यांनी आपण मोठे आणि घरातला पुरुष असे समजून नव्याने जीवनाकडे पाहायला सुरू केले. ‘दो आँखे बारा हात’ या चित्रपटात एका बैलाशी मारामारीचा सीन आहे. त्याचे चित्रीकरण करताना शांतारामबापूंना एक अपघात झाला. त्यांच्या डोळ्याला त्या बैलाचे शिंग लागले व त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. कागदी नाती तुटली तरी मनाच्या तारा जुळूनच राहतात. म्हणूनच जयश्रीताई बेचैन झाल्या. मधल्या काळात शांतारामबापूंशी अजिबात संपर्क नसल्यामुळे विचारपूस कशी करावी, या दुविधेत होत्या. त्यांनी किरणना सांगितले, ‘तुम्ही पोरं बाबांना भेटून या. मलाही त्यांची खबर कळेल आणि त्यांनाही बरं वाटेल.’ आईचे पाणावलेले डोळे पाहून किरणनाही भरून आले. बहिणींना घेऊन ते शांतारामबापूंना भेटायला गेले. त्यांना सर्व अण्णा म्हणायचे. ‘अण्णा पोरं आली,’ हे ऐकून शांतारामबापू खूप खूश झाले. गप्पा, पाप्या आणि प्रेम यात संपूर्ण दिवस गेला. स्टुडिओत सहाची घंटी वाजल्यावर त्यांनी किरणना ‘घरी जा आता! आई वाट पाहत असेल’, असे सांगितले. अण्णांनी किरणना जवळ बोलावले आणि म्हटले, ‘मला तुझी गरज आहे. शिक्षण झाले की तू लगेच माझ्यासोबत कामाला लाग.’ हे किरण यांना मनाला लावले. अकरावीनंतर कॉलेजची पायरी चढली, पण वडिलांची ओढ त्यांना राजकमल स्टुडिओत घेऊन गेली. नवरंगच्या चित्रीकरणाच्या काळात त्यांनी अण्णांच्या असिस्टंटचे काम केले. शांतारामबापूंनी त्यांना विविध फिल्म फेस्टिव्हलना पाठवले. सिनेमा जगतातील अनेक नव्या गोष्टी शिकण्याकरिता परदेशात पाठवले. वॉल्ट डिस्ने येथे वर्षभराचा स्टुडिओ मॅनेजमेंटचा अभ्यासही केला. व्ही. शांताराम यांना जाऊन आज 22 वर्षे झाली. गेली 51 वर्षे किरण शांताराम आपल्या वडिलांचा वारसा, राजकमल स्टुडिओ व प्लाझा थिएटर सांभाळत आहेत. 1966 मध्ये ज्योतीजींशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न फार मोठ्या प्रमाणात झाले. हा दिवस त्यांच्या जिव्हाळ्याचा. यासाठीसुद्धा कारण घटस्फोटानंतर पहिल्यांदा त्यांचे आई-वडील समोरासमोर आले. मुलाच्या सुखासाठी म्हणा की ज्योतींचा पायगुण म्हणा पण त्या दिवशी संपूर्ण शांताराम कुटुंब एका छताखाली जमले. प्लाझाचे नूतनीकरण व राजकमल स्टुडिओत काळाप्रमाणे गरज असलेले काही बदल हे त्यांचे पुढचे पाऊल आहे. या वाटचालीत त्यांचे सुपुत्र राहुल व चैतन्य त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या सुना अनिता व लक्ष्मी ही ज्योतींजीप्रमाणेच घरात संस्कार व संस्कृतीची उधळण करतात. त्यांच्या चार नातींना त्यांनी गोड नावेसुद्धा दिली आहेत. निमॉनला परीराणी, गौरवीला फुलराणी, क्रिषला मधुराणी आणि आईशाला छोटीराणी. ते सर्वांना सांगतात माझ्या चार राण्या आहेत आणि एक महाराणी तेही ही म्हणतात. मी संतुष्ट आहे. माझे घर हाऊसफुल आहे. मी बाबांचे नाव ठेवले आणि माझी मुलेही ते नाव जोपासतील. सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जो चांगले काम करील मी त्याच्या सोबत उभा राहतो हे त्यांचे म्हणणे. सर्व समारंभांना त्यांना आवर्जून बोलावले जाते आणि ते लोकांच्या प्रेमाखातर जातातही. अनेकांना त्यांच्या टोपीबद्दल फार कुतूहल असते. ‘ते व्ही. शांताराम यांची कॉपी का करतात’ असा प्रश्‍न बर्‍याच जणांच्या मनात उद्भवतो. पण त्याचेही कारण आहे.

30 ऑक्टोबर 1990 मध्ये व्ही. शांताराम यांचे निधन झाले. बरोबर दोन दिवस आधी त्यांनी किरणना बोलावून घेतले. 4 तास दोघांनी गप्पा मारल्या. त्याचवेळी शांतारामबापूंनी स्वत:ची टोपी काढून किरण यांच्या डोक्यावर ठेवली व त्यांना सांगितले, ‘मी माझी जबाबदारी तुझ्या डोक्यावर ठेवत आहे. ती नीट पार पाड. ही टोपी माझा आशीर्वाद आहे. जो सदैव तुझ्या डोक्यावर राहील. लहानपणी फार वेळ देता आला नाही, पण यापुढे मी तुझ्या सोबतच असेन.’ हे एकूण त्यांचे डोळे भरून आले. या दिवसानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांची टोपी म्हणजेच त्यांच्या जबाबदार्‍या धारण केल्या. बहिणी, तीन आया (शांतारामबापूंच्या तीन पत्नी विमलाताई, जयश्रीतार्ई आणि संध्याताई) आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी व त्यांच्या गरजा किरण यांनी जोपासल्या. व्ही. शांताराम हे नाव जपण्यासाठी त्यांनी स्वत:चे नाव, इच्छा व त्यांची छबी पणाला लावली.

‘झुंज’सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही राजकमल सांभाळताना बर्‍याच इच्छा राहून गेल्या. आता त्यांना चित्रपट काढावेसे वाटतात. व्ही. शांताराम जपता जपता के. शांताराम कुठेतरी हरवून गेले. मुंबईचे शेरीफ झाले तेव्हा त्यांनी अनेकांना मदत केली, दिशा दिली पण स्वत:च्या स्वप्नांना कधी फार वाव दिला नाही. किरण शांताराम होणे हे व्ही. शांताराम होण्याएवढेच कठीण आहे, कदाचीत जास्त कठीण.

Wednesday, May 25, 2011

आधुनिक शिल्पकार



डॉक्टरकडे कुणी आनंदाने जात नाही. पण सर्व डॉक्टरांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. काही डॉक्टर औषधे वाटतात, पण डॉ. पूर्णिमा म्हात्रे अनेकांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम करतात. आरशासमोर उभे राहण्याची इच्छा निर्माण करतात. त्या फक्त शरीरालाच नाही तर मनालाही आकार देतात. त्यांच्या ‘गॉरजियस’ क्लिनिकमध्ये शिरल्याक्षणी प्रसन्न वाटू लागते. इथे सर्वांचा कायापालट होत असेल हे कळायला फार वेळ लागत नाही. कॉस्मेटिक सर्जरी, वजन कमी करणे, चेहर्‍याची ठेवण नीट करणे हे सर्व काही त्या करतात. अनेकांना त्यांनी जगण्याची उमेद व आत्मविश्‍वास दिला आहे.

गॉरजियस क्लिनिक हा सुंदर बनवण्याचा कारखाना आहे असे म्हणायला हरकत नाही. 13 जुलै 1967 मध्ये डोंबिवलीत पूर्णिमाचा जन्म झाला. वडील दिनकर म्हात्रे व आई शोभना म्हात्रे यांनी आपल्या मुलांमध्ये व मुलीमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. भावांना जेवढे स्वातंत्र्य व शिक्षणाची संधी दिली तेवढीच तिलाही दिली गेली. आपल्या पोरीने डॉक्टर व्हावे आणि समाजात मोठे स्थान मिळवावे असे सौ. शोभना यांचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्णिमाचे ध्येय कधी झाले हे तिलाही कळले नाही. आपण डॉक्टर व्हायचे हे तिने लहानपणापासूनच ठरवले होते. त्यांच्या घराण्यात कुणीच डॉक्टर नाही. वडील कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात व बदलापूर येथील त्यांच्या फार्मवर शेतीचे कामही पाहतात. पण आपल्या पोरीने हवे ते शिकावे यासाठी त्यांनी सतत तिला प्रोत्साहन दिले. संस्कारांसोबत स्वप्ने पाहायची हिंमतही दिली. टिळकनगर विद्यामंदिर शाळेची मुलगी पूर्णिमा पेंढारकर कॉलेजमध्येदेखील अभ्यासात नेहमी पुढेच होती. आपल्याला पुढे काय करायचे आहे हे माहीत असल्यामुळे तिची मानसिक भरकट कधीच झाली नाही.

क्रिष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडमधून ती डॉक्टर झाली. स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू केली, पण तिला नुसत्या गोळ्या वाटून पैसे छापायचे नव्हते. तिला बदल घडवणे हा प्रकार फार आवडतो. माझ्यामुळे लोकांचे चेहरे खुलले पाहिजेत, त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळायला हवे या विचाराने तिने मुंबई विद्यापीठातून कॉस्मेटॉलॉजी या विषयातून डिप्लोमा केला. या विषयात रस असल्यामुळे ती जोमाने कामाला लागली. 2005 ते 2007 ती कॅनडाला ऍडबास्ड कॉस्मेटॉलॉजी शिकण्याकरिता गेली. आपण जे शिकलो ते आपल्या हिंदुस्थानातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तिने धडपड करून पहिले क्लिनिक उभे केले. ‘स्त्रीला या समाजात मूर्ख समजून तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो’ असे ती सांगते. पण तिच्या आयुष्यात आलेल्या अशा प्रसंगांना तिने धाडसाने हाताळले. स्वप्नांच्या मागे धावणे हा तिचा रोजचाच व्यायाम असल्यामुळे तिला अडथळ्यांची भीती वाटत नाही. अमेरिकेत जाऊन तिने काही नव्या प्रकारचे उपचार हिंदुस्थानात आणले आहेत. कमी दरात, कमी तासात बरेच काही करता येते हे लोकांना पटत नाही, पण पूर्णिमा ते फार सोप्या भाषेतच चांगल्या रीतीने समजावते. एम. बी. बी.एस.ला शिवाजी युनिव्हर्सिटीत मेरिटमध्ये येण्यापासून ते ‘गॉरजियस’ची केंद्रे सर्वत्र पसरवण्यापर्यंत तीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अनेक कलाकारांची ती मैत्रीण आहे. त्यांच्यावर उपचार करता करता वेगळेच नाते जुळून येते असे ती सांगते. सिनेमा जगतातील बर्‍याच तारकांनी तिचे उपचार घेतले आहेत. केसांची काळजी, नाक सरळ करणे, ओठांची ठेवण बदलणे हे तिचे रोजचे काम. ऋषी कपूरची पत्नी व रणबीर कपूर यांची आई नीतू सिंग या पूर्णिमाच्या कलेवर भारावूनच गेल्या आहेत. जाहीरपणे त्या तिची तारीफ करत असतात. ‘सध्या प्रत्येक हीरोईन माझ्याकडे येते’ असे हसत तिने म्हटले. जरी, तरी कोण कोणता उपाय करून घेत आहे हे मी नाही सांगू शकत हेही ती ठामपणे सांगते. एकेकाळी फक्त सेलेब्रिटी’ असे उपचार करायचे पण आता सर्वसामान्य माणसेदेखील या उपायांचा वापर करत आहेत. केसांचा उपचार, त्वचेचा उपचार, वजन कमी करणे या सगळ्यासाठी वेगवेगळे डॉक्टर असतात. पण पूर्णिमाने हे सगळे एका छताखाली आणले आहे. दहा ठिकाणी जावे लागावे नाही म्हणून या सर्व उपचारांना ‘गॉरजियस’ एकाच क्लिनिकमध्ये मांडले आहे. हे सर्व करत असताना विविध प्रकारचे लोक भेटतात. त्यांच्या विचित्र मागण्या ऐकूनही अगदी आश्‍चर्य होते. एकदा एका पोरीने पूर्णिमाला म्हटले, मला अगदी तुमच्यासारखे बनवण्याचे किती पैसे लागतील? एका महिलेला दीपिका पदुकोणसारखी हनुवटी करून हवी होती. काही तर चित्र घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला असे व्हायचे आहे. अपघातात चेहर्‍याचा आकार बिघडलेले बरेच लोक पूर्णिमाकडे आपला चेहरा नीट करण्याकरिता येतात. लग्नापूर्वी चेहर्‍यावरचे डाग घालवण्यासाठीही रांग असते. मराठी असल्याचा तिला अभिमान आहे. मराठी माणसांनी मला खूप मदत केली व दाद दिली. लायपोसकशन करून चरबी काढणे या प्रकाराला आपल्या देशात भयाण समजले जाते. पण ते किती फायद्याचे आणि सोयीचे हे तिने अनेकांना समजावून त्यांचे जीवन हलके केले. आज तिचे मुंबईत पाच क्लिनिक आहेत. जयपूरलाही तिचे एक क्लिनिक आहे. आपली 50 केंद्रे असावीत हे स्वप्न ती लवकरच साकार करील असे आश्‍वासन देते. तिचे पती डॉ. सॅबियो डिसुझादेखील तिच्या पाठीशी असतात.

तिचे मराठीपण, तिचे मूळ नाव आणि स्वप्न जपण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तिचा 16 वर्षांचा मुलगा प्रतीत तिचा लाडका आहे. कुणाकडून एक पैसा न घेता शिक्षण व मेहनतीचे भांडवल हाताशी धरून डोंबिवलीतली पोरगी आज कुठल्याकुठे पोहोचली. फेमिना मिस इंडियाच्या पॅनलवरही पूर्णिमाचे महत्त्वाचे स्थान आहे.स्त्री असून व्यापारात पडणे हा मूर्खपणा असे समजणार्‍या अनेकांना तिने शालजोडीतले फटके दिले आहेत. तिला अजून खूप काही करायचे आहे. व्यवसायात असलेल्या स्त्रियांना मदत करण्याकरिता एक सामाजिक संघटना बनवायची आहे. जे त्रास तिला झाले त्यातून ती खूप शिकली व इतर महिलांना मदत व्हावी अशी तिची इच्छा आहे. ती चेहरे सुंदर करतेच पण मने सुंदर करण्याचा कार्यक्रम तिला भेटल्यापासूनच सुरू होतो. तिचा आपलेपणा अगदी आपलेसे करून घेतो. सुंदर पूर्णिमाला संपूर्ण जग सुंदर दिसावे असे वाटते. तिच्या ताब्यात असलेली सर्व माणसे आपोआप सुंदर होऊ लागतात.

डॉ. पूर्णिमा म्हात्रे हे नाव कॉस्मेटिक सर्जरीसाठी आता खूपच नावाजले आहे. ‘माझे गाव डोंबिवली’ हे सांगणारी पूर्णिमा आपल्या मराठीपणाचे ठसे सर्वत्र उमटत असते. तिच्या क्लिनिकमध्ये मराठी संभाषणे ऐकू येतात. रिसेप्शनवर बसलेल्या मुलींपासून ते चहा आणणार्‍या पोरीपर्यंत सर्व मराठी. कमाल म्हणजे पूर्णिमा मराठीतच संभाषण सुरू करते. अगदी अमराठी लोकांशीसुद्धा. तिने स्वत:च्या हिमतीवर स्वत:च्या आयुष्याला आकार दिला, तसेच ती इतरांच्या जीवनात घडवत आहे. मला ती आधुनिक शिल्पकार वाटते. ‘मी फक्त वाकडी नाकं आणि फाटके ओठ नीट करत नाही. त्या काळात गप्पा मारून मनही सरळ करते’ असे डॉ. पूर्णिमा म्हात्रेचे म्हणणे आहे.

Friday, May 20, 2011

मी कोण?



चांगल्या-वाईटाच्या शर्यतीत आपण दररोज स्वत:ला कोर्टात गुन्हेगाराला उभे करतात तसे उभे करून असतो. आपण चांगले आहोत हेच ऐकण्याची इच्छा असते. सर्वांना आयुष्याच्या कोर्टात निकाल आपल्याच बाजूने लागावा असे वाटत जरी असले तरी तसे होईलच असे नाही. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात यावर आपण आपली प्रतिमा बांधत असतो. राहून जाते ते स्वत:ला विचारणे की ‘मी कोण?’

एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली, मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’ लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो.’ हे ऐकून गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली, ‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले. संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरू म्हणाले, ‘फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते.’ दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.

सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिले स्वत:ला विचारा. टीका करणारे प्रत्येक पावलाला भेेटतील. त्या टीकांचे वार घेऊन जीव सोडू नका. चुका होतील, सर्वांच्याच होतात. त्या सुधारा. चुका म्हणजे आयुष्याचा अंत नाही. दुसर्‍यांनी कमी लेखले म्हणून आपण कमी होत नाही. तुम्ही कसे आणि कोण ते स्वत:च ठरवा. टीकांनी त्याचा हिशेब नका करू. तुम्हीच ठरवा, ‘मी कोण?’

दुर्बीण लावून पहा...!!



विहिरीतल्या बेडकासारखे आपण जगत असतो. आपल्या डोळ्याला दिसते तेवढेच आपले जग असते. आपल्या नजरेपलीकडे काहीच नाही असा गोड गैरसमज बाळगून आपले आयुष्य सरत असते. प्रेम, समजूतदारपणा, राग, त्रास अशा सर्व भावनांच्या व विचारांच्या व्याख्या आपल्या मनात तयार असतात. अट्टहास असा असतो की आपल्याच व्याख्या खर्‍या. प्रत्येकाचा जगण्याच्या, वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेवढी मनं तेवढे स्वभाव. हीच तर देवाची कमाल आहे. एका साच्यातून त्याने सर्वांना नाही काढले. आपण ज्याप्रकारे आपल्यांची काळजी घेतो, आपण अपेक्षा ठेवतो की इतरांनीही तसेच वागावे. तसे होत नाही. कारण ‘काळजी’ प्रत्येक जण आपापल्या परीने व पद्धतीने करत असतो. अपेक्षाभंगाच्या ओझ्याखाली दबून आपण जगणे स्वीकारतो. पण स्वभावांची विविधता समजून घेत नाही. आपल्या विचारांपलीकडेही विचार आहेत, जग आहे हे विसरू नका. आपल्या व्याख्या दुसर्‍यांवर लादू नका. दुसर्‍यांच्या व्याख्या समजून घ्या. एखादी आई ओरडते, एखादी गप्प होते. याचा अर्थ एकीचे प्रेम जास्त आणि एकीचे कमी असे नाही. गांधीजी उपोषणाला बसले आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला उभे केले. मार्ग वेगळे पण प्रेम तेच, भावना तीच. गुलाब चांगले की जास्वंद, समुद्र डौलदार की झरे अशा विक्षिप्त तुलना करू नका. परमेश्‍वराने घडवलेली प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे व कोणत्याही दोन गोष्टी सारख्या नाहीत. तसेच माणसांचे स्वभावही सारखे नाहीत. या वेगळेपणाचा आनंद घ्या. ‘असेच वागले पाहिजे, तसेच बोलायला हवे’ हे हट्ट धरू नका. तुमच्या व्याख्या तुमच्याजवळ. निरनिराळ्या व्याख्यांचे निरीक्षण करा.
नजर एका दिशेत असते,
असतात मात्र दिशा दहा,
सोडू नका जग आपले,
तुम्ही तुमच्याच जगात रहा,
पण जवळ जवळचे पाहणार्‍यांनी,
एकदा दुर्बीण लावून पाहा..!

Thursday, May 19, 2011

यम दूताचा कट्टर दुश्मन



सगळ्यांना सोपी गणितं आवडतात. सुरळीत आयुष्याची चटक प्रत्येकाला असते. परीक्षेला जाताना बुद्धी व बळ मागणारे कमी आणि ‘पेपर सोपा असू दे’ अशी प्रार्थना करणारे जास्त असतात. पण डॉक्टर प्रफुल विजयकर यांचे अगदी उलट आहे. सर्व डॉक्टर्सनी शस्त्र टाकले व सर्व हॉस्पिटल्सनी नकारघंटा वाजवली की लोक विजयकरांकडे येतात. हल्ली तर त्यांची अपॉइंटमेंट मिळता मिळत नाही. ‘अशक्य आजार असेल तरच डॉक्टर पाहतील’ हे ऐकून मी हादरले. हसत मी मनात म्हटलेही की डॉक्टर विजयकरांना भेटायचे असेल तर भयंकर आजार झाल्याशिवाय कठीणच आहे. खरं तर प्रफुल विजयकर यांचा प्रसन्न चेहरा आणि कोलगेट स्माईल अर्धा आजार दूर करतच असेल. त्यांची सकारात्मक वृत्ती, त्यांच्या उपचारावरचा व होमिओपॅथी या विज्ञानावरचा विश्‍वास आणि कठीण आव्हानांना स्वीकारायची क्षमता हेच त्यांचे गुण त्यांच्या यशाचा पाया ठरतात. 4 ऑगस्ट, 1952 रोजी मुंबईत जन्माला आलेले प्रफुल विजयकर फार लहानपणीपासून डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहत होते. त्यांचे दोन्ही आजोबा, वामनराव विजयकर व मुकुंद कोठारे डॉक्टरच होते. वडील गजानन विजयकरदेखील डॉक्टर असल्यामुळे दुसरा कोणताही पर्याय कधीच त्यांच्या मनात आला नाही. सर्जन व्हायचे स्वप्न रंगलेले असतानाच एका ज्योतिषाने त्यांच्या आईला सांगितले, ‘तुमचा मुलगा फार मोठा सर्जन होईल.’ ज्योतिषानेही त्या स्वप्नात काही अजून रंग कमी पडले. पण नियती कुणालाच कळत नाही हे खरे आहे. 3 मार्क कमी पडले आणि एम.बी.बी.एस.चे ऍडमिशन चुकले. डॉक्टर व्हायचेच म्हणून होमिओपॅथीही चालेल असे वडिलांनी सांगितले आणि त्यांनी इच्छा नसतानाही होमिओपॅथीचा अभ्यासक्रम सुरू केला. प्रामाणिकपणे शिक्षण पूर्ण करून ते आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत. येणार्‍या रुग्णांची तपासणी करता करता ते ऍलोपॅथीही शिकत होते. एकदा एका माणसाला ऍलोपॅथीने गुण येत नसल्यामुळे सहज होमिओपॅथीचे औषध दिले व त्याने त्याला बरेही वाटले. ते रुग्ण होते सरजुप्रसाद तिवारी. कोणतेही औषध लागू पडत नसताना विजयकरांनी काहीतरी कमाल केली आणि तिवारीजींचा जुना आजार बरा झाला. तिवारी त्यांना म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही होमिओपॅथीच का नाही देत. तुमच्या हातात जादू आहे.’’ त्यावर विजयकर म्हणाले, ‘‘माझ्याकडे जागा असती तर तसे केले असते.’’ तिवारींनीही एक वेगळीच कमाल केली. दुसर्‍या दिवशी एक चावी आणून प्रफुल विजयकरांच्या हातात ठेवली आणि म्हणाले, ‘‘ही आजपासून तुमच्या दवाखान्याची चावी.’’ इथून सुरू झाला डॉ. प्रफुल विजयकरांचा खरा प्रवास. ना ऍग्रीमेंट ना पैसे ना डिपॉझिट, फक्त विश्‍वासावर व त्यांची जादू अनेकांना लाभावी म्हणून तिवारींनी त्यांना त्यांची जादूगिरी दाखवायला एक जागा दिली. 3 वर्षांत ही जागा तिवारींना त्यांनी परत केली, पण आजही सरजुप्रसाद यांचा विश्‍वासच माझे भांडवल होते असे ते सांगतात. त्या काळात होमिओपॅथीवर हसले जायचे. तथ्य असूनही या विज्ञानाची खिल्ली का उडवली जाते या शोधात त्यांनी स्वत:ला बुडवले. एम.डी. या परीक्षेला लागणारी सर्व पुस्तके त्यांनी विकत घेतली व त्यांचा नीट अभ्यास केला. त्यांच्याप्रमाणे होमिओपॅथीचे उपचार हळू होतात हे फार खोटे आहे. ते म्हणतात, अशक्य काही नाही. ते सांगतात की, सर्व आजारांची सुरुवात मनातून होते. मन आदेश देते आणि देह तो आदेश पाळतो. थ्री इडियट या चित्रपटातील एक डायलॉग ते सर्वांना ऐकवतात, ‘‘गलेपर कितना प्रेशर पडा ये हम माप सकते है, मगर दिमाग पर पडनेवाले प्रेशर को मापने की मशीन नहीं है.’’ प्रत्येक आजाराचे मनातील मूळ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आजारही रेंगाळत राहतो. ‘‘मी आजारावर हल्ला करत नाही, मी प्रतिकारशक्ती वाढवतो’’ असे ते सांगतात. देवाने आपल्याला अफाट प्रतिकारशक्ती दिली आहे. त्याचा नीट वापर करून आजार नाहीसा करणे यालाच ते खरा उपचार समजतात. गोव्यात एका गोबर गॅसच्या टाकीत पडून एकजण 65 टक्के भाजला होता. सर्वांनी हात झटकलेले. त्याची अवस्था पाहून विजयकरांनी त्याचा स्वभाव, राहणी, इतर पूर्वीचे त्रास, आई-वडिलांची माहिती घेतली व एक औषध सांगितले. 3 तासांत त्याचा ऑक्सिजन पम्प काढता आला. तो श्‍वास घेऊ शकला व आज तो 3 महिन्यांनंतर परत पूर्वीसारखा झाला. डॉक्टर सांगतात, मनातले त्रास आजारांना जन्म देतात तसेच मानसिक उपचाराने मरणकळाही दूर होऊ शकतात. उदाहरणार्थ पुढे अंधार व त्रास पाहणार्‍यांना कॅटरॅक्टचा त्रास होता. घोर दु:ख व घाव साठवलेल्यांना कॅन्सर होऊ शकतो व आधार नसण्याचे भाव बाळगाणार्‍यांना हाडांचे विकार होतात. सर्व काही सुरू होते ते मनातून. वरवरच्या गोळ्या खाऊन तात्पुरते बरे होण्यात काही फायदा नाही. ‘‘मन आणि शरीराचा ताबा देण्याचे काम मी करतो’’ असे त्यांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला झाला की होमिओपॅथी चालते. इतर वेळी नाही. हा चुकीचा समज आहे. डॉ. विजयकरांकडे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, अंधत्व, किडनी फेलीयर, मेनीनजायटीसपासून ते ल्युकेमिया, थालेसेमीयापर्यंत सर्व उपचारांसाठी रुग्ण येतात. तरंग व अंबरीश त्यांचे दोन पुत्र. अंबरीशसुद्धा होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत व आपल्या वडिलांना सहकार्य करतात. मेनीनजायटीसने 100 टक्के आंधळा झालेला राजेंद्र आता फोटोग्राफीचे काम करतो, ब्रेन ट्यूमरने मरायला टेकलेली एनडीली गावातील मुलगी आज पाहू शकते ते फक्त डॉक्टरांमुळे. असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वर्गाच्या दारातून विजयकरांनी परत आणले आहे. पण त्याचे श्रेय देतात ते त्यांच्या पत्नी प्रीतीला. आयुष्यभर माझी वाट पाहत राहणे व माझ्या संसाराचे नंदनवन करणे हेच तिचे ध्येय होते. आज त्यांच्यासाठी डॉक्टर थोडा वेळ काढूही लागले आहेत. प्रीती विजयकरांना आपल्या पतीच्या कार्यावर गर्व आहे. मोफत शिबीर करून ते वर्षभर आपली जादू दाखवतच असतात. मुंबई, बीड, महाबळेश्‍वर व इतर अनेक ठिकाणी ते जाऊन रुग्णांची सेवा करतात. ‘सगळ्यांनी नकार दिला असेल तर लगेच या’ हे त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे ‘पेपर कठीण असेल तर लवकर वाटा असेच वाटते.’ त्यांना ‘‘आईनस्टाईन ऑफ होमिओपॅथी असे म्हणतात.’’ त्यांना काहीही म्हणत असो, पण मला ते यमदूताचे जानी दुश्मन वाटतात. चित्रगुप्ताने नाव लिहिले की तोही विचार करत असेल की, या माणसाला डॉ. प्रफुल विजयकर भेटले तर पुस्तकात फुकट खाडाखोड होईल.
डॉ. प्रफुल विजयकरांची जादू पसरावी, अनेकांना त्या जादूने आयुष्य मिळावे. यमदूताचे अनेक पुढले प्लॅन फ्लॉप करण्याकरिता मी डॉक्टरांना शुभेच्छा देऊ इच्छिते. होमिओपॅथीवर हसण्याआधी ते विज्ञान समजण्याचा प्रयत्न करा. जीव कुणाचाच गेला नाही. मात्र या विज्ञानाचा वापर करून विजयकरांनी अनेक जीव वाचवले. मन आणि शरीर गोळ्यांनी भरू नका. प्रतिकारशक्ती वाढवून पहा. होमिओपॅथीला नावे ठेवण्याआधी विजयकरांचे चमत्कार पहा.