Sunday, May 29, 2011

मी हरत नाही.....



हरणे कुणालाच आवडत नाही. मग त्या शाळेतील कबड्डीच्या स्पर्धा असो, कार्यालयातील चढ-उतार असो किंवा आयुष्याचा खेळ असो, प्रत्येकाला जिंकायचे असते. प्रयत्न आणि कष्टाचे खतपाणी टाकण्यास मागे पुढे झाले तरी यशाचे पीक मात्र अपेक्षित असतेच. तरीही आपण फार पटकन शस्त्र टाकून मोकळे होतो. अडथळ्यांशिवाय जगण्याचा कोणताही मार्ग नाही. छोट्या अडथळ्यांना संकट मानून, घाबरून आपण हरलेल्या माणसांच्या यादीत झटकन आपले नाव नोंदवून टाकतो. स्वत:वर व स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास न ठेवता आपण परिस्थितीच्या आहारी जाऊन लाचारीच्या अंथरुणात डोळे मिटून पडतो. ‘मी हरलो, मी आता काही करू शकणार नाही’ हे म्हणणे फक्त अन्याय नसून गुन्हा आहे. धडपडणे हा गुन्हा नाही, पण परत न उठणे व स्वत:ला सावरण्यास नकार देणे हा महा गुन्हा आहे.

त्याहून मोठा गुन्हा म्हणजे हरण्याच्या भीतीने प्रयत्नच न करणे. मरणाच्या भीतीने कुणी श्‍वास घेणे सोडत नाही तसे पराजयाच्या भयाने थांबणे हे संपण्यासारखेच. भीतीने कोलमडून पडलेल्यांचे आयुष्य म्हणजे प्रवास नसून फरफट असते. आपली हार-जीत आपल्या मानण्यावर असते.नकारात्मक विचार दिशाहीन करतात. धडपडलात तरी पराजयाची भावना मनात विरघळून देऊ नका. ‘पडल्यावर बसून राहू नका. उठून पुढे चाला. इंटरव्हलला ‘दी एण्ड’ समजून बाहेर पडू नका. असे अनेक प्रसंग येतील जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल. स्वप्नांवर जळमटे लागल्यासारखे वाटेल. आता पुढे काहीच उरले नाही हा भाव मनात घर करील, पण अशावेळी घाबरू नका. समजा हे मध्यांतर आहे. नाटकात बरीच मध्यांतरे येतात आणि नाटकाचा अंत हा सुखीच असणार. त्यामुळे जो पडाव सुखी नाही तो अंत नाही हे लक्षात घ्या. थांबू नका. उठा, कामाला लागा. अडथळ्यांना झुंज द्या. स्वत:ला साथ द्या. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या डोळ्यात बघून सांगा, ‘‘मी हरणार नाही, मी हरत नाही.’’

दु:ख आले किती भयंकर,
त्यात कोणी मरत नाही.
चितेच्या आगीस भिऊन,
श्‍वास बंद ही करत नाही;
वेळ वेळेच्या प्रमाणे
मजप्रमाणे सरत नाही
अन् जरी पडले व रडले
मी तरीही हरत नाही!

व्ही. नाही ‘कि. शांताराम’



‘मोठ्या बापाचा आहे ना, मग काय म्हणायचे!’ असे फार सहजपणे बोलले जाते. पण मोठ्या बापाचे असणे म्हणजे काय चीज आहे, हे त्या परिस्थितीत असल्याशिवाय कळत नाही. मोठेपणाचे ओझे वेळेआधीच डोईवर ठेवले जाते. ‘आपण कोण’ हा शोध स्वत: लावण्यापूर्वीच ‘आपण कोण’ हे आपल्याला सांगितले जाते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसेच प्रत्येक परिस्थितीच्याही दोन बाजू असतात. किरण शांताराम म्हणतात की, ‘मी व्ही. शांताराम यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. या कुटुंबात जन्म झाला हे माझे भाग्य आहे.’

26 जून 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपण फारच सुखात गेले. किरण शांताराम यांच्या आई, शांतारामबापूंच्या दुसर्‍या पत्नी, बहीण राजश्री व तेजश्री या किरण यांचा जीवच. दादरच्या किंग जॉर्ज शाळेत त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. खूप मित्र, सुखी कुटुंब आणि खूप प्रेम हेच त्यांचे आयुष्य होते. शिक्षकांचे व सवंगड्यांचे लाडके किरण आई-वडिलांचाही प्राणच होते. आई-वडिलांकडून लहानपणी मिळालेले अमाप प्रेम त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे कारण असावे असे त्यांना वाटते. नंतर वडील कामात तल्लीन होऊ लागले. जास्त वेळ स्टुडिओत घालवायला लागले. फिल्मच्या कामात गुंतलेले असताना वडिलांचे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले, पण त्यांच्या आईने पोरांना कधी ते जाणवू दिले नाही. तीन मुलांची संपूर्ण जबाबदारी एकटीने पार पाडली. ‘आईनेच आम्हाला वाढवले’, असे ते सांगतात. शांतारामबापू जास्त वेळ काढू शकायचे नाही कुटुंबासाठी. पण रात्रीचे जेवण मात्र सर्व एकदमच करायचे. किरण हे लहानपणी खूप मस्तीखोर होते. आपण नीटच अभ्यास केला, पण तरीही मार्क कमी पडले असा त्यांचा टाहो असायचा. बहिणी हुशार होत्या आणि दादाच्या लाडक्याही होत्या. पण बाबांपुढे सर्वांची बोलती बंदच असायची. सहावीत असताना तिमाहीच्या परीक्षेत किरणना कमी मार्क पडले. आई अस्वस्थ झाली व शांतारामबापूंना तिने सांगितले. वडिलांची विचारपूस सुरू झाली. जेवताना या विषयावर चर्चा होत होती. किरणने नावडत्या दह्याची वाटी जरा ढकलली. कदाचित त्यांचा अस्वस्थपणा त्यांनी त्या वाटीवर काढला. पण बाबांना फार काय ते आवडले नाही. जेवणावरून उठून शांतारामबापूंनी किरणला हात पुढे करायला सागितला. जोरात हँगरने हातावर मारले. हँगरचा खिळा हातात घुसला. तो दिवस ते कधीही विसरू शकत नाहीत. त्या जखमेची खोक अजूनही किरणना त्यांच्या वडिलांच्या शिस्तीची व मुलांकडून असलेल्या अपेक्षांची आठवण करून देते.

व्ही. शांताराम हे हृदयाने कोमल, पण शिस्तबद्ध असल्यामुळे सर्वांकडून त्यांची हीच अपेक्षा असायची. त्यानंतरचा काळ थोडा कठीण होता. जयश्रीताई व शांतारामबापू यांच्यात मतभेद होऊ लागले. वादविवादांना कारणांची गरज नाही, असे भासू लागले. मुलांवर या तणावाचा फरक पडू नये म्हणून घटस्फोट घ्यायचे ठरवले. जयश्रीताई व शांतारामबापू वेगळे जगू लागले. जयश्रीताईंनी धीराने पोरांना सावरले. आयुष्यात बदल जरी आला तरी किरण शांताराम यांनी आपण मोठे आणि घरातला पुरुष असे समजून नव्याने जीवनाकडे पाहायला सुरू केले. ‘दो आँखे बारा हात’ या चित्रपटात एका बैलाशी मारामारीचा सीन आहे. त्याचे चित्रीकरण करताना शांतारामबापूंना एक अपघात झाला. त्यांच्या डोळ्याला त्या बैलाचे शिंग लागले व त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. कागदी नाती तुटली तरी मनाच्या तारा जुळूनच राहतात. म्हणूनच जयश्रीताई बेचैन झाल्या. मधल्या काळात शांतारामबापूंशी अजिबात संपर्क नसल्यामुळे विचारपूस कशी करावी, या दुविधेत होत्या. त्यांनी किरणना सांगितले, ‘तुम्ही पोरं बाबांना भेटून या. मलाही त्यांची खबर कळेल आणि त्यांनाही बरं वाटेल.’ आईचे पाणावलेले डोळे पाहून किरणनाही भरून आले. बहिणींना घेऊन ते शांतारामबापूंना भेटायला गेले. त्यांना सर्व अण्णा म्हणायचे. ‘अण्णा पोरं आली,’ हे ऐकून शांतारामबापू खूप खूश झाले. गप्पा, पाप्या आणि प्रेम यात संपूर्ण दिवस गेला. स्टुडिओत सहाची घंटी वाजल्यावर त्यांनी किरणना ‘घरी जा आता! आई वाट पाहत असेल’, असे सांगितले. अण्णांनी किरणना जवळ बोलावले आणि म्हटले, ‘मला तुझी गरज आहे. शिक्षण झाले की तू लगेच माझ्यासोबत कामाला लाग.’ हे किरण यांना मनाला लावले. अकरावीनंतर कॉलेजची पायरी चढली, पण वडिलांची ओढ त्यांना राजकमल स्टुडिओत घेऊन गेली. नवरंगच्या चित्रीकरणाच्या काळात त्यांनी अण्णांच्या असिस्टंटचे काम केले. शांतारामबापूंनी त्यांना विविध फिल्म फेस्टिव्हलना पाठवले. सिनेमा जगतातील अनेक नव्या गोष्टी शिकण्याकरिता परदेशात पाठवले. वॉल्ट डिस्ने येथे वर्षभराचा स्टुडिओ मॅनेजमेंटचा अभ्यासही केला. व्ही. शांताराम यांना जाऊन आज 22 वर्षे झाली. गेली 51 वर्षे किरण शांताराम आपल्या वडिलांचा वारसा, राजकमल स्टुडिओ व प्लाझा थिएटर सांभाळत आहेत. 1966 मध्ये ज्योतीजींशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न फार मोठ्या प्रमाणात झाले. हा दिवस त्यांच्या जिव्हाळ्याचा. यासाठीसुद्धा कारण घटस्फोटानंतर पहिल्यांदा त्यांचे आई-वडील समोरासमोर आले. मुलाच्या सुखासाठी म्हणा की ज्योतींचा पायगुण म्हणा पण त्या दिवशी संपूर्ण शांताराम कुटुंब एका छताखाली जमले. प्लाझाचे नूतनीकरण व राजकमल स्टुडिओत काळाप्रमाणे गरज असलेले काही बदल हे त्यांचे पुढचे पाऊल आहे. या वाटचालीत त्यांचे सुपुत्र राहुल व चैतन्य त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या सुना अनिता व लक्ष्मी ही ज्योतींजीप्रमाणेच घरात संस्कार व संस्कृतीची उधळण करतात. त्यांच्या चार नातींना त्यांनी गोड नावेसुद्धा दिली आहेत. निमॉनला परीराणी, गौरवीला फुलराणी, क्रिषला मधुराणी आणि आईशाला छोटीराणी. ते सर्वांना सांगतात माझ्या चार राण्या आहेत आणि एक महाराणी तेही ही म्हणतात. मी संतुष्ट आहे. माझे घर हाऊसफुल आहे. मी बाबांचे नाव ठेवले आणि माझी मुलेही ते नाव जोपासतील. सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जो चांगले काम करील मी त्याच्या सोबत उभा राहतो हे त्यांचे म्हणणे. सर्व समारंभांना त्यांना आवर्जून बोलावले जाते आणि ते लोकांच्या प्रेमाखातर जातातही. अनेकांना त्यांच्या टोपीबद्दल फार कुतूहल असते. ‘ते व्ही. शांताराम यांची कॉपी का करतात’ असा प्रश्‍न बर्‍याच जणांच्या मनात उद्भवतो. पण त्याचेही कारण आहे.

30 ऑक्टोबर 1990 मध्ये व्ही. शांताराम यांचे निधन झाले. बरोबर दोन दिवस आधी त्यांनी किरणना बोलावून घेतले. 4 तास दोघांनी गप्पा मारल्या. त्याचवेळी शांतारामबापूंनी स्वत:ची टोपी काढून किरण यांच्या डोक्यावर ठेवली व त्यांना सांगितले, ‘मी माझी जबाबदारी तुझ्या डोक्यावर ठेवत आहे. ती नीट पार पाड. ही टोपी माझा आशीर्वाद आहे. जो सदैव तुझ्या डोक्यावर राहील. लहानपणी फार वेळ देता आला नाही, पण यापुढे मी तुझ्या सोबतच असेन.’ हे एकूण त्यांचे डोळे भरून आले. या दिवसानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांची टोपी म्हणजेच त्यांच्या जबाबदार्‍या धारण केल्या. बहिणी, तीन आया (शांतारामबापूंच्या तीन पत्नी विमलाताई, जयश्रीतार्ई आणि संध्याताई) आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी व त्यांच्या गरजा किरण यांनी जोपासल्या. व्ही. शांताराम हे नाव जपण्यासाठी त्यांनी स्वत:चे नाव, इच्छा व त्यांची छबी पणाला लावली.

‘झुंज’सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही राजकमल सांभाळताना बर्‍याच इच्छा राहून गेल्या. आता त्यांना चित्रपट काढावेसे वाटतात. व्ही. शांताराम जपता जपता के. शांताराम कुठेतरी हरवून गेले. मुंबईचे शेरीफ झाले तेव्हा त्यांनी अनेकांना मदत केली, दिशा दिली पण स्वत:च्या स्वप्नांना कधी फार वाव दिला नाही. किरण शांताराम होणे हे व्ही. शांताराम होण्याएवढेच कठीण आहे, कदाचीत जास्त कठीण.

Wednesday, May 25, 2011

आधुनिक शिल्पकार



डॉक्टरकडे कुणी आनंदाने जात नाही. पण सर्व डॉक्टरांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. काही डॉक्टर औषधे वाटतात, पण डॉ. पूर्णिमा म्हात्रे अनेकांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम करतात. आरशासमोर उभे राहण्याची इच्छा निर्माण करतात. त्या फक्त शरीरालाच नाही तर मनालाही आकार देतात. त्यांच्या ‘गॉरजियस’ क्लिनिकमध्ये शिरल्याक्षणी प्रसन्न वाटू लागते. इथे सर्वांचा कायापालट होत असेल हे कळायला फार वेळ लागत नाही. कॉस्मेटिक सर्जरी, वजन कमी करणे, चेहर्‍याची ठेवण नीट करणे हे सर्व काही त्या करतात. अनेकांना त्यांनी जगण्याची उमेद व आत्मविश्‍वास दिला आहे.

गॉरजियस क्लिनिक हा सुंदर बनवण्याचा कारखाना आहे असे म्हणायला हरकत नाही. 13 जुलै 1967 मध्ये डोंबिवलीत पूर्णिमाचा जन्म झाला. वडील दिनकर म्हात्रे व आई शोभना म्हात्रे यांनी आपल्या मुलांमध्ये व मुलीमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. भावांना जेवढे स्वातंत्र्य व शिक्षणाची संधी दिली तेवढीच तिलाही दिली गेली. आपल्या पोरीने डॉक्टर व्हावे आणि समाजात मोठे स्थान मिळवावे असे सौ. शोभना यांचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्णिमाचे ध्येय कधी झाले हे तिलाही कळले नाही. आपण डॉक्टर व्हायचे हे तिने लहानपणापासूनच ठरवले होते. त्यांच्या घराण्यात कुणीच डॉक्टर नाही. वडील कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात व बदलापूर येथील त्यांच्या फार्मवर शेतीचे कामही पाहतात. पण आपल्या पोरीने हवे ते शिकावे यासाठी त्यांनी सतत तिला प्रोत्साहन दिले. संस्कारांसोबत स्वप्ने पाहायची हिंमतही दिली. टिळकनगर विद्यामंदिर शाळेची मुलगी पूर्णिमा पेंढारकर कॉलेजमध्येदेखील अभ्यासात नेहमी पुढेच होती. आपल्याला पुढे काय करायचे आहे हे माहीत असल्यामुळे तिची मानसिक भरकट कधीच झाली नाही.

क्रिष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडमधून ती डॉक्टर झाली. स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू केली, पण तिला नुसत्या गोळ्या वाटून पैसे छापायचे नव्हते. तिला बदल घडवणे हा प्रकार फार आवडतो. माझ्यामुळे लोकांचे चेहरे खुलले पाहिजेत, त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळायला हवे या विचाराने तिने मुंबई विद्यापीठातून कॉस्मेटॉलॉजी या विषयातून डिप्लोमा केला. या विषयात रस असल्यामुळे ती जोमाने कामाला लागली. 2005 ते 2007 ती कॅनडाला ऍडबास्ड कॉस्मेटॉलॉजी शिकण्याकरिता गेली. आपण जे शिकलो ते आपल्या हिंदुस्थानातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तिने धडपड करून पहिले क्लिनिक उभे केले. ‘स्त्रीला या समाजात मूर्ख समजून तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो’ असे ती सांगते. पण तिच्या आयुष्यात आलेल्या अशा प्रसंगांना तिने धाडसाने हाताळले. स्वप्नांच्या मागे धावणे हा तिचा रोजचाच व्यायाम असल्यामुळे तिला अडथळ्यांची भीती वाटत नाही. अमेरिकेत जाऊन तिने काही नव्या प्रकारचे उपचार हिंदुस्थानात आणले आहेत. कमी दरात, कमी तासात बरेच काही करता येते हे लोकांना पटत नाही, पण पूर्णिमा ते फार सोप्या भाषेतच चांगल्या रीतीने समजावते. एम. बी. बी.एस.ला शिवाजी युनिव्हर्सिटीत मेरिटमध्ये येण्यापासून ते ‘गॉरजियस’ची केंद्रे सर्वत्र पसरवण्यापर्यंत तीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अनेक कलाकारांची ती मैत्रीण आहे. त्यांच्यावर उपचार करता करता वेगळेच नाते जुळून येते असे ती सांगते. सिनेमा जगतातील बर्‍याच तारकांनी तिचे उपचार घेतले आहेत. केसांची काळजी, नाक सरळ करणे, ओठांची ठेवण बदलणे हे तिचे रोजचे काम. ऋषी कपूरची पत्नी व रणबीर कपूर यांची आई नीतू सिंग या पूर्णिमाच्या कलेवर भारावूनच गेल्या आहेत. जाहीरपणे त्या तिची तारीफ करत असतात. ‘सध्या प्रत्येक हीरोईन माझ्याकडे येते’ असे हसत तिने म्हटले. जरी, तरी कोण कोणता उपाय करून घेत आहे हे मी नाही सांगू शकत हेही ती ठामपणे सांगते. एकेकाळी फक्त सेलेब्रिटी’ असे उपचार करायचे पण आता सर्वसामान्य माणसेदेखील या उपायांचा वापर करत आहेत. केसांचा उपचार, त्वचेचा उपचार, वजन कमी करणे या सगळ्यासाठी वेगवेगळे डॉक्टर असतात. पण पूर्णिमाने हे सगळे एका छताखाली आणले आहे. दहा ठिकाणी जावे लागावे नाही म्हणून या सर्व उपचारांना ‘गॉरजियस’ एकाच क्लिनिकमध्ये मांडले आहे. हे सर्व करत असताना विविध प्रकारचे लोक भेटतात. त्यांच्या विचित्र मागण्या ऐकूनही अगदी आश्‍चर्य होते. एकदा एका पोरीने पूर्णिमाला म्हटले, मला अगदी तुमच्यासारखे बनवण्याचे किती पैसे लागतील? एका महिलेला दीपिका पदुकोणसारखी हनुवटी करून हवी होती. काही तर चित्र घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला असे व्हायचे आहे. अपघातात चेहर्‍याचा आकार बिघडलेले बरेच लोक पूर्णिमाकडे आपला चेहरा नीट करण्याकरिता येतात. लग्नापूर्वी चेहर्‍यावरचे डाग घालवण्यासाठीही रांग असते. मराठी असल्याचा तिला अभिमान आहे. मराठी माणसांनी मला खूप मदत केली व दाद दिली. लायपोसकशन करून चरबी काढणे या प्रकाराला आपल्या देशात भयाण समजले जाते. पण ते किती फायद्याचे आणि सोयीचे हे तिने अनेकांना समजावून त्यांचे जीवन हलके केले. आज तिचे मुंबईत पाच क्लिनिक आहेत. जयपूरलाही तिचे एक क्लिनिक आहे. आपली 50 केंद्रे असावीत हे स्वप्न ती लवकरच साकार करील असे आश्‍वासन देते. तिचे पती डॉ. सॅबियो डिसुझादेखील तिच्या पाठीशी असतात.

तिचे मराठीपण, तिचे मूळ नाव आणि स्वप्न जपण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तिचा 16 वर्षांचा मुलगा प्रतीत तिचा लाडका आहे. कुणाकडून एक पैसा न घेता शिक्षण व मेहनतीचे भांडवल हाताशी धरून डोंबिवलीतली पोरगी आज कुठल्याकुठे पोहोचली. फेमिना मिस इंडियाच्या पॅनलवरही पूर्णिमाचे महत्त्वाचे स्थान आहे.स्त्री असून व्यापारात पडणे हा मूर्खपणा असे समजणार्‍या अनेकांना तिने शालजोडीतले फटके दिले आहेत. तिला अजून खूप काही करायचे आहे. व्यवसायात असलेल्या स्त्रियांना मदत करण्याकरिता एक सामाजिक संघटना बनवायची आहे. जे त्रास तिला झाले त्यातून ती खूप शिकली व इतर महिलांना मदत व्हावी अशी तिची इच्छा आहे. ती चेहरे सुंदर करतेच पण मने सुंदर करण्याचा कार्यक्रम तिला भेटल्यापासूनच सुरू होतो. तिचा आपलेपणा अगदी आपलेसे करून घेतो. सुंदर पूर्णिमाला संपूर्ण जग सुंदर दिसावे असे वाटते. तिच्या ताब्यात असलेली सर्व माणसे आपोआप सुंदर होऊ लागतात.

डॉ. पूर्णिमा म्हात्रे हे नाव कॉस्मेटिक सर्जरीसाठी आता खूपच नावाजले आहे. ‘माझे गाव डोंबिवली’ हे सांगणारी पूर्णिमा आपल्या मराठीपणाचे ठसे सर्वत्र उमटत असते. तिच्या क्लिनिकमध्ये मराठी संभाषणे ऐकू येतात. रिसेप्शनवर बसलेल्या मुलींपासून ते चहा आणणार्‍या पोरीपर्यंत सर्व मराठी. कमाल म्हणजे पूर्णिमा मराठीतच संभाषण सुरू करते. अगदी अमराठी लोकांशीसुद्धा. तिने स्वत:च्या हिमतीवर स्वत:च्या आयुष्याला आकार दिला, तसेच ती इतरांच्या जीवनात घडवत आहे. मला ती आधुनिक शिल्पकार वाटते. ‘मी फक्त वाकडी नाकं आणि फाटके ओठ नीट करत नाही. त्या काळात गप्पा मारून मनही सरळ करते’ असे डॉ. पूर्णिमा म्हात्रेचे म्हणणे आहे.

Friday, May 20, 2011

मी कोण?



चांगल्या-वाईटाच्या शर्यतीत आपण दररोज स्वत:ला कोर्टात गुन्हेगाराला उभे करतात तसे उभे करून असतो. आपण चांगले आहोत हेच ऐकण्याची इच्छा असते. सर्वांना आयुष्याच्या कोर्टात निकाल आपल्याच बाजूने लागावा असे वाटत जरी असले तरी तसे होईलच असे नाही. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात यावर आपण आपली प्रतिमा बांधत असतो. राहून जाते ते स्वत:ला विचारणे की ‘मी कोण?’

एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली, मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’ लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो.’ हे ऐकून गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली, ‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले. संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरू म्हणाले, ‘फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते.’ दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.

सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिले स्वत:ला विचारा. टीका करणारे प्रत्येक पावलाला भेेटतील. त्या टीकांचे वार घेऊन जीव सोडू नका. चुका होतील, सर्वांच्याच होतात. त्या सुधारा. चुका म्हणजे आयुष्याचा अंत नाही. दुसर्‍यांनी कमी लेखले म्हणून आपण कमी होत नाही. तुम्ही कसे आणि कोण ते स्वत:च ठरवा. टीकांनी त्याचा हिशेब नका करू. तुम्हीच ठरवा, ‘मी कोण?’

दुर्बीण लावून पहा...!!



विहिरीतल्या बेडकासारखे आपण जगत असतो. आपल्या डोळ्याला दिसते तेवढेच आपले जग असते. आपल्या नजरेपलीकडे काहीच नाही असा गोड गैरसमज बाळगून आपले आयुष्य सरत असते. प्रेम, समजूतदारपणा, राग, त्रास अशा सर्व भावनांच्या व विचारांच्या व्याख्या आपल्या मनात तयार असतात. अट्टहास असा असतो की आपल्याच व्याख्या खर्‍या. प्रत्येकाचा जगण्याच्या, वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेवढी मनं तेवढे स्वभाव. हीच तर देवाची कमाल आहे. एका साच्यातून त्याने सर्वांना नाही काढले. आपण ज्याप्रकारे आपल्यांची काळजी घेतो, आपण अपेक्षा ठेवतो की इतरांनीही तसेच वागावे. तसे होत नाही. कारण ‘काळजी’ प्रत्येक जण आपापल्या परीने व पद्धतीने करत असतो. अपेक्षाभंगाच्या ओझ्याखाली दबून आपण जगणे स्वीकारतो. पण स्वभावांची विविधता समजून घेत नाही. आपल्या विचारांपलीकडेही विचार आहेत, जग आहे हे विसरू नका. आपल्या व्याख्या दुसर्‍यांवर लादू नका. दुसर्‍यांच्या व्याख्या समजून घ्या. एखादी आई ओरडते, एखादी गप्प होते. याचा अर्थ एकीचे प्रेम जास्त आणि एकीचे कमी असे नाही. गांधीजी उपोषणाला बसले आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला उभे केले. मार्ग वेगळे पण प्रेम तेच, भावना तीच. गुलाब चांगले की जास्वंद, समुद्र डौलदार की झरे अशा विक्षिप्त तुलना करू नका. परमेश्‍वराने घडवलेली प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे व कोणत्याही दोन गोष्टी सारख्या नाहीत. तसेच माणसांचे स्वभावही सारखे नाहीत. या वेगळेपणाचा आनंद घ्या. ‘असेच वागले पाहिजे, तसेच बोलायला हवे’ हे हट्ट धरू नका. तुमच्या व्याख्या तुमच्याजवळ. निरनिराळ्या व्याख्यांचे निरीक्षण करा.
नजर एका दिशेत असते,
असतात मात्र दिशा दहा,
सोडू नका जग आपले,
तुम्ही तुमच्याच जगात रहा,
पण जवळ जवळचे पाहणार्‍यांनी,
एकदा दुर्बीण लावून पाहा..!

Thursday, May 19, 2011

यम दूताचा कट्टर दुश्मन



सगळ्यांना सोपी गणितं आवडतात. सुरळीत आयुष्याची चटक प्रत्येकाला असते. परीक्षेला जाताना बुद्धी व बळ मागणारे कमी आणि ‘पेपर सोपा असू दे’ अशी प्रार्थना करणारे जास्त असतात. पण डॉक्टर प्रफुल विजयकर यांचे अगदी उलट आहे. सर्व डॉक्टर्सनी शस्त्र टाकले व सर्व हॉस्पिटल्सनी नकारघंटा वाजवली की लोक विजयकरांकडे येतात. हल्ली तर त्यांची अपॉइंटमेंट मिळता मिळत नाही. ‘अशक्य आजार असेल तरच डॉक्टर पाहतील’ हे ऐकून मी हादरले. हसत मी मनात म्हटलेही की डॉक्टर विजयकरांना भेटायचे असेल तर भयंकर आजार झाल्याशिवाय कठीणच आहे. खरं तर प्रफुल विजयकर यांचा प्रसन्न चेहरा आणि कोलगेट स्माईल अर्धा आजार दूर करतच असेल. त्यांची सकारात्मक वृत्ती, त्यांच्या उपचारावरचा व होमिओपॅथी या विज्ञानावरचा विश्‍वास आणि कठीण आव्हानांना स्वीकारायची क्षमता हेच त्यांचे गुण त्यांच्या यशाचा पाया ठरतात. 4 ऑगस्ट, 1952 रोजी मुंबईत जन्माला आलेले प्रफुल विजयकर फार लहानपणीपासून डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहत होते. त्यांचे दोन्ही आजोबा, वामनराव विजयकर व मुकुंद कोठारे डॉक्टरच होते. वडील गजानन विजयकरदेखील डॉक्टर असल्यामुळे दुसरा कोणताही पर्याय कधीच त्यांच्या मनात आला नाही. सर्जन व्हायचे स्वप्न रंगलेले असतानाच एका ज्योतिषाने त्यांच्या आईला सांगितले, ‘तुमचा मुलगा फार मोठा सर्जन होईल.’ ज्योतिषानेही त्या स्वप्नात काही अजून रंग कमी पडले. पण नियती कुणालाच कळत नाही हे खरे आहे. 3 मार्क कमी पडले आणि एम.बी.बी.एस.चे ऍडमिशन चुकले. डॉक्टर व्हायचेच म्हणून होमिओपॅथीही चालेल असे वडिलांनी सांगितले आणि त्यांनी इच्छा नसतानाही होमिओपॅथीचा अभ्यासक्रम सुरू केला. प्रामाणिकपणे शिक्षण पूर्ण करून ते आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत. येणार्‍या रुग्णांची तपासणी करता करता ते ऍलोपॅथीही शिकत होते. एकदा एका माणसाला ऍलोपॅथीने गुण येत नसल्यामुळे सहज होमिओपॅथीचे औषध दिले व त्याने त्याला बरेही वाटले. ते रुग्ण होते सरजुप्रसाद तिवारी. कोणतेही औषध लागू पडत नसताना विजयकरांनी काहीतरी कमाल केली आणि तिवारीजींचा जुना आजार बरा झाला. तिवारी त्यांना म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही होमिओपॅथीच का नाही देत. तुमच्या हातात जादू आहे.’’ त्यावर विजयकर म्हणाले, ‘‘माझ्याकडे जागा असती तर तसे केले असते.’’ तिवारींनीही एक वेगळीच कमाल केली. दुसर्‍या दिवशी एक चावी आणून प्रफुल विजयकरांच्या हातात ठेवली आणि म्हणाले, ‘‘ही आजपासून तुमच्या दवाखान्याची चावी.’’ इथून सुरू झाला डॉ. प्रफुल विजयकरांचा खरा प्रवास. ना ऍग्रीमेंट ना पैसे ना डिपॉझिट, फक्त विश्‍वासावर व त्यांची जादू अनेकांना लाभावी म्हणून तिवारींनी त्यांना त्यांची जादूगिरी दाखवायला एक जागा दिली. 3 वर्षांत ही जागा तिवारींना त्यांनी परत केली, पण आजही सरजुप्रसाद यांचा विश्‍वासच माझे भांडवल होते असे ते सांगतात. त्या काळात होमिओपॅथीवर हसले जायचे. तथ्य असूनही या विज्ञानाची खिल्ली का उडवली जाते या शोधात त्यांनी स्वत:ला बुडवले. एम.डी. या परीक्षेला लागणारी सर्व पुस्तके त्यांनी विकत घेतली व त्यांचा नीट अभ्यास केला. त्यांच्याप्रमाणे होमिओपॅथीचे उपचार हळू होतात हे फार खोटे आहे. ते म्हणतात, अशक्य काही नाही. ते सांगतात की, सर्व आजारांची सुरुवात मनातून होते. मन आदेश देते आणि देह तो आदेश पाळतो. थ्री इडियट या चित्रपटातील एक डायलॉग ते सर्वांना ऐकवतात, ‘‘गलेपर कितना प्रेशर पडा ये हम माप सकते है, मगर दिमाग पर पडनेवाले प्रेशर को मापने की मशीन नहीं है.’’ प्रत्येक आजाराचे मनातील मूळ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आजारही रेंगाळत राहतो. ‘‘मी आजारावर हल्ला करत नाही, मी प्रतिकारशक्ती वाढवतो’’ असे ते सांगतात. देवाने आपल्याला अफाट प्रतिकारशक्ती दिली आहे. त्याचा नीट वापर करून आजार नाहीसा करणे यालाच ते खरा उपचार समजतात. गोव्यात एका गोबर गॅसच्या टाकीत पडून एकजण 65 टक्के भाजला होता. सर्वांनी हात झटकलेले. त्याची अवस्था पाहून विजयकरांनी त्याचा स्वभाव, राहणी, इतर पूर्वीचे त्रास, आई-वडिलांची माहिती घेतली व एक औषध सांगितले. 3 तासांत त्याचा ऑक्सिजन पम्प काढता आला. तो श्‍वास घेऊ शकला व आज तो 3 महिन्यांनंतर परत पूर्वीसारखा झाला. डॉक्टर सांगतात, मनातले त्रास आजारांना जन्म देतात तसेच मानसिक उपचाराने मरणकळाही दूर होऊ शकतात. उदाहरणार्थ पुढे अंधार व त्रास पाहणार्‍यांना कॅटरॅक्टचा त्रास होता. घोर दु:ख व घाव साठवलेल्यांना कॅन्सर होऊ शकतो व आधार नसण्याचे भाव बाळगाणार्‍यांना हाडांचे विकार होतात. सर्व काही सुरू होते ते मनातून. वरवरच्या गोळ्या खाऊन तात्पुरते बरे होण्यात काही फायदा नाही. ‘‘मन आणि शरीराचा ताबा देण्याचे काम मी करतो’’ असे त्यांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला झाला की होमिओपॅथी चालते. इतर वेळी नाही. हा चुकीचा समज आहे. डॉ. विजयकरांकडे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, अंधत्व, किडनी फेलीयर, मेनीनजायटीसपासून ते ल्युकेमिया, थालेसेमीयापर्यंत सर्व उपचारांसाठी रुग्ण येतात. तरंग व अंबरीश त्यांचे दोन पुत्र. अंबरीशसुद्धा होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत व आपल्या वडिलांना सहकार्य करतात. मेनीनजायटीसने 100 टक्के आंधळा झालेला राजेंद्र आता फोटोग्राफीचे काम करतो, ब्रेन ट्यूमरने मरायला टेकलेली एनडीली गावातील मुलगी आज पाहू शकते ते फक्त डॉक्टरांमुळे. असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वर्गाच्या दारातून विजयकरांनी परत आणले आहे. पण त्याचे श्रेय देतात ते त्यांच्या पत्नी प्रीतीला. आयुष्यभर माझी वाट पाहत राहणे व माझ्या संसाराचे नंदनवन करणे हेच तिचे ध्येय होते. आज त्यांच्यासाठी डॉक्टर थोडा वेळ काढूही लागले आहेत. प्रीती विजयकरांना आपल्या पतीच्या कार्यावर गर्व आहे. मोफत शिबीर करून ते वर्षभर आपली जादू दाखवतच असतात. मुंबई, बीड, महाबळेश्‍वर व इतर अनेक ठिकाणी ते जाऊन रुग्णांची सेवा करतात. ‘सगळ्यांनी नकार दिला असेल तर लगेच या’ हे त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे ‘पेपर कठीण असेल तर लवकर वाटा असेच वाटते.’ त्यांना ‘‘आईनस्टाईन ऑफ होमिओपॅथी असे म्हणतात.’’ त्यांना काहीही म्हणत असो, पण मला ते यमदूताचे जानी दुश्मन वाटतात. चित्रगुप्ताने नाव लिहिले की तोही विचार करत असेल की, या माणसाला डॉ. प्रफुल विजयकर भेटले तर पुस्तकात फुकट खाडाखोड होईल.
डॉ. प्रफुल विजयकरांची जादू पसरावी, अनेकांना त्या जादूने आयुष्य मिळावे. यमदूताचे अनेक पुढले प्लॅन फ्लॉप करण्याकरिता मी डॉक्टरांना शुभेच्छा देऊ इच्छिते. होमिओपॅथीवर हसण्याआधी ते विज्ञान समजण्याचा प्रयत्न करा. जीव कुणाचाच गेला नाही. मात्र या विज्ञानाचा वापर करून विजयकरांनी अनेक जीव वाचवले. मन आणि शरीर गोळ्यांनी भरू नका. प्रतिकारशक्ती वाढवून पहा. होमिओपॅथीला नावे ठेवण्याआधी विजयकरांचे चमत्कार पहा.

चलाना जानता है



एकदा एक मुलगा अंगणात उभे राहून सूर्याकडे पाहत होता. लख्ख प्रकाशात डोळे मिटत होते तरी त्या सूर्यात काहीतरी शोधत होता. तेवढ्यात सूर्याने त्याला हाक मारली, ‘‘ए पोरा, काय विचार करत आहेस माझ्याकडे पाहून?’’ त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘‘अरे सूर्या, तू यायला कधी चुकत कसा नाहीस? वादळ, वारा, भूकंप, सुनामी काहीही आले तरी तू आपला दुसर्‍या दिवशी हजर असतोस. तुला कशाचा काहीच फरक पडत नाही का? तू यायला कधी विसरत कसा नाहीस?’’ तेव्हा सूर्याने उत्तर दिले, ‘‘तू कितीही चिडलास, रडलास, दु:खात बुडालास, त्रासलास तरी तू श्‍वास घ्यायला विसरतोस का? नाही ना! तसेच आहे माझे. मुळात तुला श्‍वास घेणे हे आठवावे लागत नाही तसे माझे येणेजाणेही ठरलेले आहे. ते तुझ्या आणि माझ्या नकळत सुरूच राहते.’’ कधी कधी अडचणी, अडथळे आपल्यावर हावी होतात, जग संपल्यासारखे वाटते. आता आयुष्य संपणार असे गृहीत धरून वैफल्याचे पांघरूण ओढून आपण झोपून जातो. झोपताना स्वत:ला, आपल्यांना व जगाला अखेरचा टाटा केल्यासारखे डोळे मिटतो. नोकरी सुटली, भांडण झाले, अपेक्षाभंग, प्रेमभंग, आर्थिक नुकसान, भावनिक वेदना, शारीरिक यातना हे सर्वकाही येते आणि जाते. काळ, वेळ, येणे, जाणे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे पण प्रत्येकजण तेच वैफल्याचे पांघरूण ओढतो. तो क्षण, तो प्रसंग शेवटचा वाटतो. पण तसे नसते. कुणाचाही शेवट व कशाचाही शेवट आपल्या हातात नसतो. सर्वकाही ठरलेले असते. सर्व प्रसंग, घडामोडी ठरलेल्या असतात. या प्रसंगांमध्ये आपण कसे वागावे एवढेच आपण ठरवतो. रडगाणे, वैफल्य, छातीतली धडधड हे विकतचे ओढवलेले त्रास आहेत. त्यात गुंतून आयुष्याची मजा घालवू नका. आनंद शोधा, दु:ख नको. तुम्ही दु:खी व्हायचा कितीही प्रयत्न केला तरी आनंद त्याची वेळ चुकवणार नाही. तुम्ही झोपून राहिलात तरी सूर्य उगवणारच. श्‍वास घेताना विचार नाही करावा लागत तसे आनंद उपभोगताना दु:खाच्या विचारांनी आनंदाचा सत्यानाश करू नका. व्हायचे ते होणार आणि चांगलेच होणार. कारण ‘‘बनानेवाला चलाना जानता है।’’

आपण ज्ञानेश्‍वर नाही!!


येणार्‍या प्रत्येक क्षणात आपण काही ना काही शिकत असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. याच अनुभवांच्या धाग्यात आपण आयुष्य गुंफत असतो आणि मी पाहिले तेच खरे आयुष्य असा हट्टही प्रत्येकजण निरनिराळ्या पद्धतीने करतो. ऑफिसमध्ये सहकार्‍यांना काम दिले की ते आपण करतो तसेच असावे ही अपेक्षा ठेवतो. ‘मी हे काम जास्त चांगले करू शकलो असतो’ असे अनेकदा तुम्ही बोललाही असाल. आपण सांगू ती प्रत्येक गोष्ट ऐकणार्‍याला कळलीच पाहिजे हा फार मोठा अन्यायकारक विचार आहे. ‘मी एवढ्या वेळा नीट समजावूनही कळत कसे नाही’ हे वाक्य पुन्हा उच्चारण्यापूर्वी एक लक्षात घ्या की, जसे तुम्हाला सर्व कळू शकत नाही तसेच इतरांनाही काही गोष्टी कळणार नाहीत. उलट असे अनेक भेटतील ज्यांना ‘समजण्याशी’ काहीच घेणेदेणे नाही. अशावेळी स्वत:चे रक्त आटवून स्वत:ला त्रास देणे म्हणजे वेडेपणा. झोपलेल्यांना उठवण्याचा प्रयत्न करा पण झोपेचे सोंग घेतलेले उठत नाहीत म्हणून रडत बसू नका. कधी कधी समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचेच नाही हे माहीत असूनही आपण ‘मी समजवणारच’ असा अट्टहास धरतो. असे करणे व्यर्थ. शेवटी दगड डोक्यावर मारला काय किंवा डोके दगडावर, जखम डोक्यालाच होते. जखमांचे धोपटे भरून कुढत राहू नका. प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारा. ती बदलण्याचा प्रयत्न करा आणि बदलत नाही म्हणून मदमस्त राहू नका. जीवनाच्या प्रवासात विविध आकार, प्रकार व विचाराच्या व्यक्ती आढळतील. काही तुमच्यासारख्या, काही अगदी वेगळ्या. इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या या जगातील विविधतेचा आनंद घ्या. समजून घ्या, तुम्हाला समजणार्‍यांना आणि न समजणार्‍यांनासुद्धा. ज्ञानेश्‍वरांनी रेड्याकडून गीता म्हणवून घेतली. असेच रेडे रोजच्या जीवनात भेटत असतात. त्यांना गीता न समजल्याचे ओझे उचलून आयुष्य कठीण करू नका. तुम्ही ज्ञानेश्‍वर नाही हे लक्षात ठेवा आणि रेड्यांना ‘इट्स ओ के’ म्हणून सुखाने जगू द्या. समजा, समजवा पण हे विसरू नका की, ‘‘आपण ज्ञानेश्‍वर नाही!!’’

खरा ‘कळाकार’



खरं तर आपण सगळेच कलाकार आहोत. कारण आयुष्य जगणे हीदेखील एक कलाच आहे. जे रडतखडत, रुसत, फुगत जगतात ते पडिक, फ्लॉप आणि जे प्रत्येक क्षणाचा, सुखाचा, दु:खाचा आनंद घेतात ते हिट. वितभर सुखासाठी हातभर दु:खांशी कॉम्प्रमाईज करण्याला आयुष्य म्हणत नाही. आयुष्य म्हणजे भेलपुरी, तिखट-गोड दोन्हीची चव घेणे. १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन शहरातील गलिच्छ वस्तीत जन्मलेल्या चार्लीने आपले आयुष्य चव घेत घेत काढले. त्यांचे संपूर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅप्लीन. त्यांचे वडील चार्ल्स सीनियर व आई हॅना. दोघेही रंगमंचावर गायचे. चार्ली ३ वर्षांचा असतानाच त्याचे आईवडील वेगळे झाले. आईची बिघडती तब्येत, गरिबीची झळ आणि यातना हेच चार्लीचे जग होते. वडील लुईस नावाच्या स्त्रीबरोबर राहात होते. त्यांचीही आर्थिक परिस्थिती वाईटच होती. एकदा चार्लीला खूप भूक लागलेली. आजारी आईला पावाचे दोन तुकडे देऊन तिचे पोट भरले. भावाला एक तुकडा दिला व स्वत: ढेकर देऊन जेवण अंगावर आल्याचे केलेले नाटक ही त्यांच्या आयुष्यातली पहिली ‘नाट्य भूमिका’. भाऊ सिडनी व चार्ली दोघे वडिलांसोबत काही काळ राहिले. आईला रुग्णालयात ठेवल्यावर त्यांचा नाइलाज झाला. लुईसशी फार पटत नसे. तिने त्यांना आर्चबिशप टेंपल बॉईज स्कूलमध्ये टाकले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी पैसे कमवायला सुरू केले. रस्त्यावर गाणी गाऊन व त्या गाण्यांना अभिनयाची साथ देऊन ते कसेबसे दोन वेळचे जेवत. दारूडे वडील आणि आजारी आई यांच्याकडून शिकलेले गाणे हेच त्यांच्या आयुष्याचे भांडवल होते. चार्ली १२ वर्षांचा असताना १९०१ मध्ये वडील गेले. ‘द एट लॅन्कशायर लॅड्स’ हे त्यांचे पहिले बालनाट्य. लोक चार्लीला ओळखू लागले. विलियम जिलेट यांच्या मदतीने ‘शेरलॉक होम्स’ या नाटकात चार्लीला ‘बिली’ हे पात्र मिळालं.
चार्लीचे बालपण त्याला जगायलाच मिळाले नाही. डोळ्यात भरलेल्या पाण्यातच त्याने आशेच्या होड्या सोडून पावसाळे काढले. आपल्या दु:खाला हशा व टाळ्यांच्या ऊबदार पांघरुणात घालून त्यांनी रात्री काढल्या. हसणे म्हणजे जगणे म्हणणार्‍या चार्ली चॅप्लीनने स्वत:वर हसून दुसर्‍यांना हसवले. त्यांचे काम पाहून मोठ्या मोठ्यांना त्यांच्या सोबत काम करावेसे वाटले. १९१० मध्ये फ्रेड कार्मो कंपनीने त्यांना अमेरिकेत नेले. प्रेक्षकांनी चार्लीला डोक्यावर घेतले. एका प्रयोगात चार्ली सुपर हिट झाला. ‘अ नाईट इन ऍन इंग्लिश म्युझिक हॉल’ या नाट्यात चार्लीने तुफान अभिनयाने अमेरिकेला हादरून टाकले. म्युचुअल फिल्म कॉर्पोरेशनने त्यांना एका वर्षात ३५ पिक्चरसाठी पैसे दिले. फ्लोरवॉकर, फायरमॅन, वॅगाबॉण्ड, वन ए.एम, द काऊंट, पॉनशॉप, द रिक, बिहाइंड द स्क्रीन, इजी स्ट्रीट, द क्योर, ‘द इमिग्रंट’, ‘द ऍडव्हेंचरर’ अशा अनेक कॉमेडी चित्रपटांत चार्लीने आपल्या अभिनयाची जादू पसरली. हसून हसून डोळ्यात पाणी, पोटात कळ आणि मोकळे मन घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडणार्‍या प्रेक्षकांना चार्ली नक्की हसवतो की रडवतो हे कळतच नव्हते. कधीकाळी एखाद्या घासासाठी तरसणार्‍या चार्लीचे पोट कौतुकाने भरत होते व त्याने चांगले पैसेही कमावले. त्याने कलेला आणि कलेने त्याला जोपासले.
चार्ली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. लहानपणी न मिळालेल्या चॉकलेटमध्ये त्याला त्याचे बालपण सापडायचे. भूक मारण्यासाठी चहा प्यायचा चार्ली कमी वयातच. पण चार्ली चॅप्लीन मोठा कलाकार होऊनही चहा त्याच्या आयुष्याचा भागच राहिला. प्रेमाची भूक ही सर्वांनाच असते. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणे, वडिलांची कडकडून मिठी, कुणीतरी आपली वाट पाहणे हे सर्व चार्लीसाठी स्वप्नासारखेच होते. हेटी केलीच्या प्रेमात पडून १९व्या वर्षीच त्याने तिच्याशी लग्न करायचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. तिने तो नाकारला. ती चांगली डान्सर होती. चार्लीला जीवनात सहन करायची चांगलीच सवय होती. हे दु:खही त्याने पचवले. पण काही वर्षांत फ्लूच्या साथीत तिचा मृत्यू झाला हे ऐकून चार्ली तुटला. जगाला हसवणारा खूप रडला. त्या वेळेस त्याला व्यथेला समजावता आले नाही. पण त्या दु:खाचेही त्याने जगासमोर हसे करून सर्वांना हसवले. त्याच्या डोळ्यातले पाणी कधी आपल्या डोळ्यात आले हे प्रेक्षकांना कळायचे नाही. चार्लीच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या व गेल्या हेटीच्या मृत्यूनंतर तो एडना पुरवीआन्सच्या प्रेमात पडला, असे सर्व म्हणायचे. पण मिलड्रेड हॅरीसशी लग्न करून त्याने संसार थाटला. तीसुद्धा कलाकारच होती. नॉरमन नावाचा मुलगा झाला त्यांना. चार्लीने हॅरीसशी घटस्फोट घेतला, कारण तिचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला कळले. तो स्त्रियांमध्ये आईचे रूप शोधायचा. कधीही न मिळालेले प्रेम त्याला मिळावे हे त्याचे स्वप्न होते. लीटा ग्रेशी झालेले लग्नही असेच विस्कटले. तिला झालेल्या दोन मुलांवर चार्ली खूप प्रेम करत.
चार्ली जुनियर आणि सिडनी अर्ल ही दोन लीटा आणि चार्लीची मुले. जुएन बॅरीला एका चित्रपटात चार्ली काम देणार होता. तिने चार्लीवर आरोप केला की तिची मुलगी कॅरल ही चार्लीचीच आहे. तो काळ चार्लीसाठी फार त्रासदायक होता. त्याच काळात १६ जून १९४३ला त्यांनी ऊना ओनीलशी लग्न केले. चार्ली ५४ आणि ऊना १८ अशा वयामध्ये त्यांनी नव्याने आयुष्य सुरू केले. तिच्यापासून चार्लीला ८ मुले झाली. जेरालडीन, मायकल, जोरफीन, व्हिक्टोरिया, ऊनी, जेन, एनेट व ख्रिस्टोफर ही त्यांची पोरं. त्यांनी चार पुस्तके लिहिली. ‘माय ट्रीप अब्रॉड, अ कॉमेडीयन सीझ द वर्ल्ड, माय ऑटोबायोग्राफी आणि माय लाई पिक्चर्स. त्याने अनेक गाणी लिहिली व त्यांना संगीतही दिले. ‘स्माईल’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे. त्यांना ‘सर’ हा किताब १९७५ साली देण्यात आला.
डाव्या विचारांचे चार्ली राजकारणातही रस ठेवायचे. आपल्या नाट्यात सरकार व अव्यवस्थित समाजाची खिल्ली उडवून जनतेला विचार करायला लावायचे. हिटलरलाही चॅप्लीनने सोडले नाही. १९४० मध्ये द ग्रेट डिक्टेटर या चित्रपटाने सर्वांच्या आतड्यांना हसवून हसवून खूप व्यायाम दिला. सिनेमासृष्टीतील त्यांच्या कलात्मक दृष्टीवर प्रसन्न होऊन एलिझाबेथ राणीच्या हस्ते त्यांना ‘नाईट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. १९७२ साली त्यांना ऑस्कर पारितोषिक देण्यात आले. चलत् चित्रपटांचा जमाना सुरू होण्यापूर्वीच १९७७ साली त्यांचे निधन झाले. चित्रपटसृष्टीत एक नवे विश्‍व निर्माण करणारा तो ‘विश्‍वामित्र’ होता. आजही त्यांचे ते स्थान जगात सर्वमान्य आहे. चार्ली चॅप्लिनचे जुने चित्रपट पाहायला नवी पिढी आजही तेवढीच उत्सुक असते. चार्लीचे लहानपण फारच वाईट परिस्थितीत गेले. रडण्याचे हसू करून त्यांनी जगाला हसवले. मला तर प्रश्‍न पडतो की, हा कलाकार की ‘कळाकार’ आहे. तो आपल्या वेदनांची व कळांची ‘कला’ करून जग जिंकतो. हसरे ओले ओठ आणि पाणावलेल्या ओल्या पापण्या एकाच वेळी कसे करायचे याचा गुरूमंत्र होता चार्ली या कलाकारांत. टायटल ‘कळाकार’ आहे. ते चुकलेले नाही. चार्लीच्या कळांनी त्याला मोठे केले. चार्ली चप्लिनने म्हटले आहे, हसण्याविना जगणे व्यर्थ. हसत रहा. हसवत रहा. आयुष्याच्या भेलपुरीतील तिखट-गोड स्वादाचा आनंद घेत रहा.

मशाल पेटवा!


आयुष्याचे हे असेच असते. सर्व काही सरळ सुरळीत चालत असताना अचानक काहीतरी नवीनच समोर येते. अनेकदा आपल्यावर जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण गोंधळून जातो. ऑफिसच्या जबाबदार्‍या, घरची कर्तव्ये आणि आपले मन, सगळं काही सांभाळता सांभाळता जीव जायची वेळ धडकते. त्यात सल्ले देणार्‍यांचीही कमी नसते. प्रत्येक मिळालेल्या सल्ल्याने आपल्या विचारांची दिशा बदलत जाते. कधी हे तर कधी ते अशा विचारांच्या पकडापकडीत आपण दमून जातो, पण निर्णय मात्र घेता येत नाहीत. ‘‘कुणाचे ऐकू, कुणावर विश्‍वास ठेवू, मला नक्की काय करावे कळत नाही!’’ अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा एक लक्षात ठेवा, सांगणारे काहीही सांगतील, काही खूप चांगले आणि काही अगदी बिनडोकपणे, पण आपले निर्णय आपणच घ्यावेत. आपल्या सर्व बाजू सांभाळून जे सोयीचे असेल तेच करावे. कुणीतरी सांगितले म्हणून मी केले हे शहाणपणाचे लक्षण नाही, बर्‍याचदा आपण निर्णय घेण्यापासून लांब पळतो. भीती वाटते म्हणून नाही तर निर्णय चुकला तर आपल्यावर कुणी बोट दाखवू नये म्हणून. स्वत:च्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसर्‍यांच्या हाती देऊ नका. जे मनाला पटते ते न घाबरता करा. सकारात्मक विचार, आपल्यांची खुशी आणि आपली मर्जी यांची काळजी घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकत नाही. नैतिकता आणि माणुसकीबद्ध निर्णयांना तसा चुकण्याचा अधिकारच नाही. काही कारणास्तव निर्णय चुकले तरी ते निर्णय आपणच घेतलेले असल्यामुळे जगावर किंवा कुणावर रागराग करण्याची गरजही उरत नाही. असेच अनेकदा आपल्या आयुष्यात नकारात्मक विचारांचे विष कालवणारेही सापडतील. आपल्या निश्‍चयांवर व निर्णयांवर फणा मारून दंश करतील, पण सकारात्मकतेच्या प्रकाशाने त्या नकारात्मकतेचा सामना करा. उगाच गोंधळून जाऊ नका. काल, उद्या, चूक, हार, अंधार हे सारे विसरा. लक्षात ठेवा माणुसकी, आज, नैतिकता आणि प्रकाश.
आताच माणसांची गाणी शिकून आलो,
आताच मी उद्याला सारे पुसून आलो,
विकला जरी कुणीही अंधार माणसांना,
माझी मशाल आता मी पेटवून आलो!
योग्य ते पटणारे निर्णय घ्या... स्वत:च घ्या... अंधारात आपली मशाल पेटवून ठेवा...

अ...ब...क...ड...


तू असं का बोललास? तू असे बोलू कशी शकते? त्याने असे का म्हणावे?... अर्धे आयुष्य आरोप करण्यात आणि खेद व्यक्त करण्यात निघून जाते. शब्दांच्या जाळ्यात आपण गुरफटून जातो. त्या शब्दांचे अर्थ शोधतो पण त्यामागच्या भावना पाहणे राहून जाते. खरं तर भावना महत्त्वाच्या. आई-वडिलांच्या रागात, बॉसच्या विचित्रपणात, लहान मुलांच्या चिडचिडीत, मित्र-मैत्रिणींच्या गैरव्यवहारात शब्द नका पाहूत. भावना समजून घ्या. देवही भावनांवरच आपले आयुष्य चालवतो, आपले शब्द, मागण्या आणि फिर्यादी ऐकून नाही. एका गावात एक देऊळ होते. रोज एक शेतकरी त्या देवळात यायचा. काहीतरी पुटपुटायचा देवापुढे आणि हे बरेच दिवसांपासून त्या देवळाचा पुजारी पाहत होता. तरुण पुजारीही आपल्या मंत्रांच्या वर्षावात देवाला भिजवून टाकायचा. शेतकरी आणि पुजारी दोघेही देवाकडे प्रगती व चांगल्या आयुष्यासाठीच मंत्रांचा मारा करायचे. शेतकर्‍याचा उत्कर्ष होत गेला. तो मोठा होत गेला. वर्षे सरली. तो पुटपुटून जायचा आणि प्रगती त्याच्या दारात धावून यायची. एकदा पुजार्‍याने देवळात आलेल्या शेतकर्‍याला विचारले, ‘तू कोणता मंत्र म्हणतोेस. मीही मंत्र म्हणतो तरी माझी प्रगती होत नाही. तुझा मंत्र सांग!’ त्यावर शेतकरी म्हणाला, ‘मला कोणताही मंत्र येत नाही. मी देवासमोर उभा राहतो आणि बाराखडी म्हणतो. अ ब क ड आणि देवाला सांगतो ऍडजेस्ट कर, समजून घे. माझ्या भावना देवाला कळतात. या शब्दांना अर्थच उरत नाही मग. कुणीतरी काहीतरी बोलले, ते आपलेच आपल्याला दुखवून गेले असा विचार सोडा. त्यांच्या बाराखडीवर मतं तयार नका करू. रागामागचे प्रेम, संशयामागची काळजी, मौनामागची आतुरता या समजण्याच्या गोष्टी आहेत. भावनांना शब्दांच्या मेहेरबानीवर जगवू नका. भांडण-तंटे, द्वेष, राग, रुसवे हे शब्दांमुळेच होतात. भावनांना महत्त्व द्या शब्दांना नंतर. आपल्यांची बाराखडी समजण्याचा प्रयत्न करा.
अ...ब...क...ड...

होय, मराठीच!



‘ए पोरा, मेदूवडा सेप्रेट लाना, सांबार मे बुडाके मत लाना.’
‘इतना महाग कैसा रे तेरे यहॉं? वो कोपरे का भैया तो स्वस्त देता है.’ घाई करो रिक्षावाले, नही तो बस आएगी और मेरी पंचाईत होगी.
असे काहीसे गोड कानावर पडले की आपलेच कुणीतरी जवळपास असल्यासारखे वाटते. हो, आपलेच म्हणजे जगाची काळजी करणारा आणि स्वत:च्या जगात जगणारा मराठी माणूस. खरं तर हा फक्त आठवड्याचाच नाही तर आयुष्याचा माणूस आहे. याला भावनांचा सम्राट म्हणायला हरकत नाही. दु:ख झाले की डोळ्यांतून पाणी काढतो, चिडला की आक्रमक होतो, आनंद झाला की वेडापिसा होतो. भावनांच्या लाटांमध्ये आयुष्याची होडी फिरवणार्‍या या मराठी माणसाला कुणी आळशी म्हणाले, कुणी मोर्चेबाज म्हणाले, कुणी गुंड म्हणाले तरी तो मात्र पुरेपूर जगण्याचा कॉण्टॅ्रक्टच करून जन्माला आला आहे. मिळेल त्यात समाधान मानणार्‍या मराठी माणसाची पिढी आता संपत आली. नवा तरुण मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात आपले नाव करत चाललाय. 9 ते 5 सरकारी नोकरीच करीन हा हट्ट सोडून मराठी माणूस बिल्डिंग बांधतो, सॉफ्टवेअर बनवतो, चित्रकला जोपासतो. मराठी माणसाचे आयुष्य, जग, राहणी, विचार सर्वकाही काळाबरोबर बदलत आहे. पूर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत राहायचा. नोकरी करावी व सांभाळावी. संध्याकाळी टी.व्ही.समोर बसावे. बातम्या पाहून सरकारला 4-5 शिव्या द्यायच्या. रविवारी दुपारी झेपत नसेल एवढे जेवून एक सॉलिड झोप काढावी. संध्याकाळी जवळपास चक्कर टाकावी. एवढे सरळ होते त्याचे आयुष्य. त्याच्या सुखाला नजर लागली ती त्याचीच. आपल्या-आपल्यातल्या राग-रुसव्यात तिराईतांनी फायदा साधला. दादर-गिरगावातले जोशी, पटवर्धन, भाटकर हे कल्याण, ठाणे, बोरिवली, दहिसरला जाऊन वसले. काहींनी तर पुण्याची वाट धरली. याने प्रदूषणाचे कारण पुढे केले पण मुंबईत राहणे त्याला जमत नाही हे त्याला आतून कळत होते. आजही तो दिवाळी-दसर्‍याची खरेदी करण्याकरिता दादर-गिरगावलाच येतो. आपल्या कुटुंबाची देखभालच नाही तर स्वप्नांची पूर्ती करणेही त्याच्या जीवनाच्या यादीत आता आढळते. धंदा करण्याकरिता लबाडी, चोरी करायची त्याची मानसिकता नाही पण पडेल ते काम करून हवे ते मिळवणारच असा अट्टहास नव्या मराठी पिढीने धरला आहे. स्वातंत्र्यानंतर देशभर भाषिक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतानाही आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी असतानाही ती महाराष्ट्राला द्यावी की नाही या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. मुंबईला तोडून स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. लेखक, पत्रकार, कलावंत, विचारवंत, समाजसेवक आणि सर्वसामान्य माणसांनी सरकारविरुद्ध लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली त्यात 106 हुतात्मे झाले. 1 मे 1960 याच दिवशी मराठी माणसाची मुंबई त्याला मिळाली असे म्हणता येईल. बर्‍याच जणांसाठी हुतात्मा चौक हा फक्त बसचा एक स्टॉप आहे, पण ‘मी मराठी’चे वारे जोरात चालत असल्यामुळे आज सर्वांना या इतिहासात रस वाटू लागला आहे. मराठी माणसांची गंमत सांगायची तर अशी की गोड खायला सण नाही आणि विरंगुळ्यासाठी सुट्टी लागत नाही. माझे कुटुंब, माहेर, ऑफिस... एकदा का एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला माझे म्हटले की मग त्यासाठी काहीही करायला तयार. तलवारीमध्ये तरबेज असलेला मराठी माणूस आता तराजूतही तरबेजपणा दाखवतो.
माशेलकर, किर्लोसकर, तिरोडकर, कुलकर्णी, भोसलेंसारखी नावे उद्योगात गाजतात. कधीकाळी इंग्रजीला घाबरणारा मराठी माणूस वाक्यातील 3-4 शब्द तरी इंग्लिशमध्येच बोलतो. वडापाव हा त्याचा वीक पॉइंट. कधीही, कुठेही, कितीही हा मंत्र वडापाव खाण्यासाठी चोख आहे. जेवणाच्या ठिकाणी वडापाव खाऊन ‘जाम खाल्ले रे’ म्हणणार्‍या मराठी माणसाला वरणभात, भाजी आणि रविवारच्या मटणाचा स्वर्ग हवाच त्याचबरोबर तो आजकालच्या पिझ्झा, बर्गर, पास्ता कल्चरमध्येही रुळला आहे. विरार लोकलच्या गर्दीत गरोदर मराठी स्त्रिया स्वेटर विणत, घरचे हिशेब लिहीत घरची सुखदु:खं वाटून मन हलके करतात व पुरुषांसारखेच घरखर्चात त्याच तोडीचा हातभार लावतात. मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो हे मला पटत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातल्या एका प्रसिद्ध संवादामध्ये हे स्पष्ट होते. प्रत्येक समाज त्याचा इतिहास, भूगोल व सामाजिक परिस्थिती यानुसार बदलत जातो व त्याप्रमाणे त्या समाजात सामाजिक पद्धती रूढ होत जातात. गुजरात किंवा इतर राज्यांत चांगली कामं होत आहेत म्हणून आपण कमी हे म्हणता येणार नाही. घोडा अडीच घर चालतो म्हणून उंटाला तसे चालता येत नाही. तो त्याच्या पद्धतीनेच तिरपा जाणार. प्रत्येक जण त्याची चाल चालतो. मराठी माणूसही त्याच्या पद्धतीने पुढेच जात आहे. जगभर मराठी पसरले आहेत व आपल्या मराठीपणाचा अभिमान राखून तो वाढवत जगत आहेत. भगवा झेंडा, पुरणपोळी, जय महाराष्ट्र, वरणभात, चितळेंची भाकरवडी, कोल्हापूरची आंबा बर्फी यातला कोणताही शब्द उच्चारला तरी मराठी माणसाला अगदी भरून येईल. मराठी माणसाला ‘जागे हो’ असे सांगण्याची गरज मला वाटत नाही. कारण तो झोपलेला नाही. तो हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो, तो समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो हा त्याचा मोठेपणा आहे. तो प्रत्येक प्रसंगात पाण्यासारखा वागतो. आकार व रंग परिस्थितीनुसार घेतो. त्याला कळते कुटुंबासोबत हक्काचे दोन घास जेवणे आणि लग्नकार्य, सणांना, आपल्या सर्वांना खूश करणे. एवढे केले की तो समाधानी. याचा अर्थ तो आळशी असा नाही. तो खूप कष्ट करतो. छोटी स्वप्नं पाहतो. छोटे आनंद कुरवाळतो आणि भरपूर जगतो. देवावर विश्‍वास ठेवणारा हा मराठी माणूस आता स्वत:वरही विश्‍वास ठेवत आहे. मोठा होत आहे व आपल्यासोबत अनेकांना मोठे करीत आहे. मराठी माणसाला आजच्या दिवशी मानाचा मुजरा आणि एक सल्ला
भरपूर जगो,
पेटभर खाओ,
खूप मज्जा करो
आणि काहीही करनेको लाजो मत!!!

Wednesday, May 18, 2011

कामाला सलाम ठोका!!


कामाला सलाम ठोका!!
स्वत:च्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही. यश हे केवळ नशिबावर अवलंबून नसते तर त्यामागे अथक, खडतर आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रम करून जगण्याचा प्रयत्न करीत असतो. कुणाला पटकन यश मिळते तर कुणाला उशिरा. महत्त्वाची असते मेहनत आणि ती करीत असताना काम ‘छोटे की मोठे’ याचा विचार करायचा नसतो. काम काम असते, ते कोणतेही असो. आपण करतो ते काम करण्यात कधीही कमीपणा समजू नये. आपण सर्वच कामगार आहोत. फार वाईट परिस्थितीत असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या एब्रहॅम लिंकनने परिश्रमाने आयुष्यात सर्व काही मिळवले. अमेरिकेचा पहिला काळा राष्ट्राध्यक्ष आपण होऊ असे काही मनात आणले नव्हते, पण फक्त आपल्या कामगिर्‍या नीट व आनंदाने बजावण्याकडे लक्ष दिले. एका कार्यक्रमात एकाने त्यांची थट्टा उडविण्याकरिता म्हटले, ‘लिंकन यांचे वडील मोची असून लिंकन आज या पदावर आहेत ही आश्‍चर्याची गोष्ट आहे.’ हे ऐकून लिंकनना अजिबात वाईट वाटले नाही. त्यावर ते म्हणाले, ‘माझे वडील मोची होते, उत्कृष्ट मोची होते, मी जीवनात नेहमी त्यांचा आदर्श ठेवला. मी जे करीन त्यात उच्च शिखर गाठीन आणि आज तसेच झाले. मी आज त्यांच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझा त्यांना मानाचा मुजरा. हे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या व फार कमी शब्दात लिंकन यांनी स्पष्ट केले की आपण आपल्या कामाशी निष्ठेने वागणे हे सर्वात मोलाचे असते.
आपल्या कामाला, कर्तव्याला सलाम ठोका. जो असे करत नाही त्याला प्रत्येकासमोर वाकावे लागते व उगाच नको तिथेही सलाम ठोकावा लागतो. कामगार दिन वर्षात एक नसून रोजच असतो. कारण कामगारांमुळे जग चालते. जो काम करतो तो कामगार, जो स्वत:ला कामगार समजतो तो स्वत:ला या जगाचा एक भाग समजू शकतो.
काम करत रहा!
थांबू नका!
नको तिथे वाकू नका!
कामाला सलाम ठोका!!!

स्वप्नांचा होलसेलर



प्रत्येकजण दिवस-रात्र कष्ट करत असतो, एक चांगले जीवन जगण्यासाठी. सामान्य माणसंदेखील स्वप्नं पाहतात ती सामान्य असतील कदाचित, पण शेवटी स्वप्नं ती स्वप्नंच. ही स्वप्नंच जगण्याचे कारण असतात. दोन वेळेचे पोटभर जेवण आणि वर्षात एकदा कुटुंबासोबत कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणचा प्रवास एवढ्यावर अनेकांच्या जीवनाचे सार्थक असते. मेच्या सुट्टीत कुठेतरी जायचे या स्वप्नावर विचार अगदी वर्षभर आधीच सुरू होतो. मग काय कपडे घालायचे, कसे फोटो काढायचे हे सगळं मनात फिरत राहाते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभर काटकसरही होते. या स्वप्नात कोणताही अडथळा किंवा व्यत्यय जीवघेणे वाटते व सहन होण्यापलीकडले जाणवते. व्हेकेशन प्लॅनमधील एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध झाली की वर्षभर त्या आठवणी काट्यासारख्या टोचत राहात. हे सर्वकाही लक्षात ठेवून असलेले सचिन ट्रॅव्हल्सचे ‘सचिन जकातदार’ कधीच टूर विकत नाहीत. ते स्वप्न विकतात. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक व्ही.आय.पी. असतो व त्याचे स्वप्न आपले समजून त्यात निरनिराळे रंग भरण्याचे काम करतात सचिन.
30 नोव्हेंबर 1973 मध्ये जन्माला आलेल्या सचिनला ‘ट्रॅव्हलस् ऍण्ड टुरिझम’चे संस्कार लहानपणापासूनच मिळाले. त्याचे वडील प्रमोद जकातदार यांनी सचिनच्या पहिल्या वाढदिवसाचाच मुहूर्त ठरवून आणि त्याचेच नाव देऊन ‘सचिन ट्रॅव्हल्स’ची स्थापना केली. सचिनचे बालपण दादरमध्ये गेले. साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण आणि आपल्या आजोबांकडून आयुष्याचे धडे हा अभ्यासक्रम म्हणजेच त्याचे खरे भांडवल. त्याचे आजोबा प्रकाशभाई मोहाडीकर यांच्यामुळे त्याला फार कमी वयात मोठमोठ्या व्यक्तींना भेटायला मिळाले. ते अतिशय साधे, पण ग्रेट आहेत हे त्याला लहानपणीच कळले होते. सचिनचे लक्ष घरच्या व्यवसायातच असूनही वडिलांच्या आज्ञेखातर ‘इलेक्ट्रिकल ऍण्ड पावर सीस्टम इंजिनीयरिंग’ची पदवी मिळवली. पण गमतीची गोष्ट अशी की सचिन हसत सांगतो, ‘‘पदवी आहेच, पण मला फ्यूजसुद्धा बदलता येत नाही.’’ मात्र टुरिझम क्षेत्रातले कोणतेही शिक्षण न घेता याबाबतीतले सचिनचे गणित चोख आहे. उलट 1 वर्षाचा ‘ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम’चा कोर्स त्यानेच त्यांच्या कंपनीतर्फे योजला आहे. ‘‘या व्यवसायामुळे मला वेगवेगळ्या लोकांना भेटता येते, जग बघायची संधी मिळते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. हा व्यवसाय मला तरुण ठेवतो व जिवंतपणाची जाणीव भासवत राहतो,’’ असे सचिनचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तो हेही सांगतो की, ‘‘आपण कितीही केले तरी एखादी ट्रिप जमत नाही कधी कधी. आपल्या हातात नसलेल्या कारणाने का होईना, पण ग्राहक नाराज झाला की वाईट वाटते.’’ आज त्याचा संपूर्ण परिवार त्याच्या जोडीला आहे. वडील प्रमोद, आई शुभदा हे फक्त आशीर्वादासाठीच नाही तर मदतीलाही हात पुढे करतात. पत्नी सोनालीने तर आकड्यांचा भार एकटीनेच झेलला आहे. भाऊ संकेत व त्याची पत्नी केतकी यांनीही सचिनचा भार हलका केला आहे. एवढेच नाही तर सचिनचा 4 वर्षांचा मुलगा छोटा वेदांतसुद्धा जगातील सर्व जागांची माहिती बिनचूक देतो. तसे सचिनने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. शून्यातून विश्‍व उभारणे हे एकदाच नाही तर बर्‍याचदा त्याने केले. दर वेळी जिद्दीने पुन्हा उभे राहून त्यानेच संकटावर हसून दाखवले. कामात आलेले अपयश हा त्याच्या आयुष्यातला अडथळा कधीच ठरले नाही. पण 5 फेब्रुवारी 2000 या दिवशी रात्री साडेअकरा वाजता सचिन त्याच्या मित्राची स्कूटर घेऊन टिळक ब्रीजवरून येत होता. त्याचा अपघात झाला. पाऊण तास तसाच पडून राहिला सचिन. घरच्यांनी पटकन सायन हॉस्पिटलला नेले. ‘गँगरीन’ होत असावे या भीतीने हिंदुजाला नेण्यात आले. त्यानंतर 6 महिने हॉस्पिटलमध्येच काढले. ‘या अपघाताने मला आयुष्यभराचे तत्त्वज्ञान शिकवले’ असे तो सांगतो. नातेवाईक कमी, पण सचिन ट्रॅव्हल्सबरोबर प्रवास केलेले असंख्य पर्यटक वारंवार त्यांना भेटायला येत. हॉस्पिटलच्या बेडवरून सचिन ट्रॅव्हल्स चालवणारे सचिन सकारात्मक विचारांचा साठाच आहेत. त्यामुळे दु:ख आणि त्रासही त्यांना घाबरून पळ काढतो.
व. पु. काळे सचिनशी गप्पा मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तासन्तास घालवत. सचिनमुळे अनेकांना व. पुं.चे सान्निध्य लाभले. या अपघातानंतरचा ‘रिटर्न ऑफ सचिन’ झाला आहे तो जास्त जोमाने झाला आहे. सचिनने नेहमीच नवीन नवीन सहली व प्लॅन आपल्यासमोर ठेवले. 2007 मध्ये भरारी नावाची सहल काढली. ही 26 अपंग मुलांची सहल होती. फार धाडस करून त्या मुलांना स्वीत्झरलँडला नेले. वेगवेगळे अपंगत्व असलेल्यांमध्ये एक आंधळा होता. त्याला सर्वकाही समजावण्यासाठी एक स्पेशल गाईड सुरुवातीपासूनच दिला गेला. त्या आंधळ्या माणसाने सचिनला माऊण्ट टीटलसला पोहोचल्यावर फोन लावून घेतला व म्हणाला, ‘‘तुमच्यामुळे जे कधी पाहता आलेच नसते ते पाहत आहे. धन्यवाद सचिनजी,’’ अशा अनुभवांनी जाणवलं की आपण बरोबर मार्गाने जात आहोत.
अनेक मजेशीर प्रसंगही घडतात. एका पर्यटकाने सचिनला फोन केला आणि म्हणाले, ‘‘अहो इथे खूप पाऊस पडत आहे. आम्हाला कश्मीर पाहायला जमतच नाही. काहीतरी करा.’’ आता पाऊस कसा थांबवावा यावर विचार नाही केला सचिनने, पण यांना कसे समजवावे याचा मात्र फक्त विचारच करता आला. एकदा तर गाईडने सर्वांना सांगितले की ‘‘मी जंतर मंतर म्हणालो की गाडी थांबेल. मग सर्वांनी उतरायचे व टॉयलेटला जाऊन परत गाडीत बसायचे. हनिमून कपलचे या संभाषणाकडे काडीमात्र लक्ष नव्हते. अष्टविनायकाला जाताना मुंबई सोडल्यावर गाईडने पहिल्यांदा म्हटले ‘जंतर मंतर’. हे जोडपे कॅमेरा घेऊन उतरले. बाहेर फोटो काढत वेळ काढणार्‍या जोडप्याला गाईडने म्हटले, ‘‘काय करताय, चला!’’ त्यावर त्याने विचारले, ‘‘अहो जंतर मंतर कुठे आहे? आम्हाला फोटो काढायचा आहे.’’ असेच असते हे स्वप्नांचे जग. ‘‘सचिनजी आम्हाला बेस्ट सोय करून द्या.’’ हे ऐकून सचिनजी खरंच तेवढे लक्ष घालतात. ऑनलाईन रिझर्वेशन, ट्रॅव्हेल हेल्पलाईन, सचिनचे स्वत:चे पोर्टल हे सर्व लवकरच आपल्यासमोर येईल. अष्टविनायक, महाबळेश्‍वर, ज्योतिर्लिंगपासून ते कश्मीर, कन्याकुमारी, दुबई, हॉंगकॉंग, स्वीत्झरलँडपर्यंत सर्व ठिकाणी सचिन आपले पंख पसरतो. सहल स्वयंवर, क्रिकेट टुरिझम, झीप झॅप झूप हे सचिनचे पर्यटनातील सुपरहिट प्रकार अनुभवल्याशिवाय त्यांची मजा कळणार नाही. सचिन ट्रॅव्हल्स बंद पडण्यापासून ते प्रगतीची अनेक शिखरे गाठण्यापर्यंतच्या प्रवासात सचिनने नेहमी ग्राहकांच्या स्वप्नांना महत्त्व दिले. त्यांनी भरलेल्या पैशांचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी सचिन प्रयत्नशील राहतात. पर्यटकांची संख्या वाढण्यापेक्षा एकच पर्यटक वारंवार प्रवासाला आला तर ते सचिनचे यश असेही ते समजतात. सचिन फक्त निरनिराळ्या जागांवर नेत नाहीत तर थकलेल्या मनांना जागे करूनच आपणात. आनंद आणि स्वप्नांचा होलसेलर असे मी सचिनला म्हणते कारण भरभरून आनंद वाटला जातो इथे. अशीच स्वप्नं रंगवा, असेच रंग उधळा, असेच लोकांना होलसेलमध्ये आनंद वाटत राहा.
जरी लागला जगभर
दु:खांचा झेल...
तुम्ही सतत करत राहा
स्वप्नांचा होलसेल...

येशील ना गं आई..?



‘आई’ हा शब्द फार छोटा आहे, पण या छोट्याशा शब्दांत आपले आयुष्य दडले आहे. फक्त नऊ महिनेच नाही, तर तिचे श्‍वास चालतात तोवर ती आपले ओझे वाहत असते. त्याग आणि काळजी करणे हे आईच्या जीवनात रोजचेच. कुटुंबाचा कणा म्हणजे आई. खरं तर तिला जादूगार म्हणायला हरकत नाही. तिच्या घट्ट मिठीहून मोठे सुख नाही. तिने डोक्यावर हात फिरवल्यावर आजारांनाही पळावे लागते. कवींनी व लेखकांनी तिचे वर्णन करून तिला नेहमी देवाच्या शेजारीच बसवले. या पुरुषप्रधान जगात आज आई फक्त घर सांभाळत नाही, तर बाबांच्या जोडीला उभी राहून घर चालविण्यासाठी हातभार लावते. मोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदांवर स्त्री पोहोचली आहे. घरात कमी आणि घराबाहेर जास्त असणार्‍या आईलाही मन असते. तिलाही आईपण जगायला आवडते, पण जगाच्या शर्यतीत तिला थांबणे कठीण होते. शेवटी ती तिच्या पिलांना आनंद व सुखसोयी मिळाव्यात म्हणूनच झटत असते. स्वप्न, आराम, आनंद यांचा विचार सोडून ती धावत राहते. स्त्रीने खूप मोठे व्हावे. स्त्रीशिवाय या जगाला अर्थ नाही हेही तेवढेच खरे, पण आज अनेक लहान पोरांना आई असूनही त्यांना अनाथांचे जगणे पत्करावे लागते. आई कमी आणि आया जास्त जवळची होते. आजच्या आईने हे लक्षात ठेवायला हवे की, जशी ती एका पोराला जन्म देते तसेच ते पोरही तिच्यातल्या आईला जन्म देते. मुलांच्या छोट्या गरजांकडे दुर्लक्ष होते त्यांच्या मोठेपणाची तयारी करता करता. आईनं खूप गप्पा माराव्यात, प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, तेच तेच खरेखोटे पुन:पुन्हा ऐकावे. काऊचिऊचे घास भरवून नजर काढावी, कधीतरी मांडीवर झोपवावे, गोष्ट सांगावी आणि कधीतरी खूपखूप खेळावे. एकदा मुलं मोठी झाली की, त्यांचे विश्‍व वेगळे होते. मग त्यांना काऊचिऊचे घास नको असतात, पण ते हवे तेव्हा मिळाले नाही हे मात्र स्पष्ट लक्षात राहते. कॉर्पोरेटच्या चक्रव्यूहात आईने हरवू नये. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ हे अगदी आजकालच्या जगात दिसून येते. आई असून नसलेल्या पोरांची हालत केविलवाणीच वाटते. मुलांना वेळ द्या. दोन खेळणी कमी आणलीत तरी चालेेल, पण डोक्यावरून हात नक्कीच फिरवा. आईचे प्रेम, संस्कार आणि आधार दुसरे कुणीच देऊ शकणार नाही. आईचा जन्म पुण्याचा. तो उपभोगा. ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा!
संध्याकाळचे सात झाले, मला भीती वाटते,
तुझ्या आठवांनी माझ्या डोळ्यांत पाणी साठते,
धावून पळून कोळून काढल्या, मी दिशा दाही,
आता तरी येथील ना गं आई..?
कामात असशील ठाऊक आहे, वेळ नसेल तुला,
मीच झुलवत राहिले माझ्या एकांताचा झुला,
कसला खेळ, कसला झुला, काहीच मज्जा नाही,
आता तरी येशील ना गं आई....?
रात्र झाली झोपायला जाते आता पटकन,
गोष्ट मला मीच सांगते डोळे मिटून झटकन,
खेळणी नको, खाऊ नको, नको मला काही,
आता तरी येशील ना गं आई..?

चुन्याची फॅक्टरी



कोण चांगले आणि कोण वाईट याचा हिशेब कधीच लागत नाही. एकीकडे रामाची पूजा होते, तर दुसरीकडे रावणाला मानले जाते. कोण कुणाला आणि का मानेल हे गणित समजण्यापलीकडचे आहे. बिहारमधील सीवान जिल्ह्यात बंगरा गावात लवकरच एका पुतळ्याची स्थापना होणार आहे. हिंदुस्थानच्या पहिल्या पंतप्रधानांचा जन्म जरी इथे झाला असला तरी पुतळा मात्र त्यांचा उभारला जात नाही. चार्ल्स शोभराजच्या अलीकडल्या काळातील एका प्रसिद्ध ठगाचा ‘नटवरलाल’चा पुतळा उभारला जाणार आहे. 1912 मध्ये जन्मलेल्या नटवरलालचे खरे नाव आहे मिथिलेशकुमार श्रीवास्तव. लहानपणापासून मिथिलेश हातचलाखीत उस्ताद असल्याचे त्याचे गावकरी सांगतात. गंमत जंमत म्हणून इथले तिथे करणारा मोठा होऊन अनेकांना उल्लू बनवेल असे कुणाला वाटले नव्हते. आठ राज्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते. जवळजवळ 100 केसेसचा मालक नटवरलाल किमान 50 वेगवेगळ्या नावांचा वापर करून गुन्हे करीत आलाय. मिथिलेशकुमार हा राजेंद्रप्रसाद यांना फारच चांगला ओळखत होता असेही काही लोक सांगतात. डॉ. राजेंद्रप्रसाद यांची खोटी सही करून त्यांना संकटात आणल्यापासून त्यांचे संबंध तुटल्याचे काहींचे म्हणणे आहे. किती खरं किती खोटं हे नटवरलालशिवाय कुणीच नाही सांगू शकत. 1979 मध्ये याच मिथिलेशकुमारवर ‘मिस्टर नटवरलाल’ नामक सिनेमाही बनवला गेला. अमिताभ बच्चनने ते पात्र फारच सुंदर निभावले. नटवरलाल मूळचा बिहारचा, पण त्याला बर्‍याच भाषा येत होत्या. गोड गोड गप्पांमध्ये रंगवून साधेसुधे असल्याचे सोंग घेऊन तो सहजपणे लोकांना ठगवायचा. एखाद्याशी गहन विषयावर चर्चा करता करता समोरच्याचे घड्याळ, पाकीट, अंगठ्या त्याच्याकडे पोहोचायच्या आणि समोरच्याला कळतही नसे. नटवरलालने शहाजहानच्या आत्म्याला तर खूपच यातना दिल्या. ताजमहाल बांधणार्‍या कामगारांचे हात कापले गेले असा ताजमहल परत बनू नये म्हणून, पण या नटवरलालने हाच ताजमहल फिरंग्याना तीन वेळा विकला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ज्या लाल किल्ल्यावर आपला झेंडा डौलाने फडकतो तो लाल किल्लाही त्याने दोन वेळा विकला आहे. हे तर काहीच नाही. नटवरलालने राष्ट्रपती भवनाचाही एकदा सौदा करून टाकला आहे. फक्कड मार्केटिंग करीत असणार्‍या या ठगाला जर हिंदुस्थानचा पर्यटन मंत्री केले असते तर आज थोडीफार कमाई पर्यटनानेही झाली असती. किंवा कदाचित संपूर्ण हिंदुस्थान त्याने विकला असता. कॉमनवेल्थ, 2जी वगैरे जे आजचे घोटाळे आहेत यालाही ठगी म्हणायला हरकत नाही. पण नटवरलाल आणि या ठगांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. नटवरलालने नेहमी श्रीमंतांना लुबाडले, लुटले आणि गरीबांना मदत केली. गावची परिस्थिती सुधारण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. बर्‍याच कुटुंबांना दोन वेळचे अन्न आणि रोजगाराकरिता प्रवास करण्यासाठी पैसे त्याने पुरवले. गावचा ‘हीरो’ असे त्याला म्हटले जाते. कोणत्याही वेशात येऊन मदत करून जाणारा नटवरलाल कुणाच्या लक्षात येण्याआधी ‘छू’ व्हायचा. कुणी अनोळखी मदत करून गेला का गावकरी म्हणायचे, ‘आपला मिथिलेश येऊन गेला वाटते!!’ पोलिसांच्या हाताला तर तो लागायचाच नाही. पकडला गेला तरी तो सुरेखरीत्या निसटून जायचा. शेवटचे त्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पाहण्यात आले असे सांगतात. 24 जून 1996 ला पोलीस त्याला व्हीलचेअरवरून उपचारासाठी एम्स इस्पितळात नेत होते. निसटणे हा त्याचा गुणधर्म असल्यामुळे तो निसटला. हे त्याचे शेवटचे फरारी होणे. 100 वर्षांची कोठडी ही सजा लागू असणार्‍या नटवरलालने 10 वेळा जेलमधून पळ काढला. पण शेवटपर्यंत त्याने हार नाही मानली. मोठ्यामोठ्यांच्या सह्या मारून पत्र तयार करणारा, देशाच्या इमारती विकणारा हा आगळावेगळा ठग रांचीमध्ये आपल्या मुलीच्या सासुरवाडीत मरण पावला असेही ऐकण्यात येते. तसे त्याच्या मरणाच्या कथाही कमालीच्या. त्याचा धाकटा भाऊ गंगाप्रसाद श्रीवास्तव सांगतो की, 1996मध्ये त्याने त्याच्या भावाचे अंत्यसंस्कार केले. पण त्याचे वकील नंदलाल जैस्वाल सांगतात की, 2009 साली त्याचे निधन झाले. मरणातही त्याने सर्वांना ठगले. त्याला त्याच्या गावात खूप मानले जाते. लहान मुलांना त्याच्या कथा सांगितल्या जातात. त्याच्या उदारपणाचे व समाजकार्याचे किस्से ऐकवून गावकरी त्याची आठवण काढतात. त्याला ओळखणारे त्याच्या नावाचा वापर करून बरीच कामे साधत. तसेच त्याला न ओळखणारेही त्याचा उल्लेख करून फायदा घेत असत. एकदा त्याच्या गावची एक बाई ट्रेनमध्ये चढली. तिच्या चार नातवंडांना ती नटवरलालच्या गोष्टी सांगत होती. टी.सी. जवळ येऊन म्हणाला, ‘‘मिथिलेश भाईमुळेच मी आज टी.सी. झालो. दिल्लीत येऊन शिक्षण घेण्यापुरते पैसे माझ्या आईवडिलांकडे नव्हते. आम्हाला तर एकवेळचे नीट जेवताही येत नव्हते. पण आज मी कमावतो आणि माझे कुटुंब सांभाळायला समर्थ आहे.’’ त्या बाईकडून त्याने पैसे नाही घेतले व म्हणाला, ‘‘नटवरलालच्या गावच्यांचे पैसे मीच भरतो. कारण ते कुणाला कधीच सापडत नाहीत. मग उपकार फेडायला मला तरी कसे सापडतील! बंगरा गावात जो पुतळा उभारला जाणार आहे ती गावकर्‍यांची खाजगी जागा आहे. यामुळे सरकार किंवा कुणीही या उभारणीचा विरोध नाही करू शकत. त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. बिहारचे डी.जी.पी. नीलमणीदेखील सांगतात की खासगी जागेत हा पुतळा उभारत असल्यामुळे कुणी काही करू शकत नाही.
सध्याच्या डरपोक, लाचखोर ठगांना या दिलदार नटवरलालची सर नाही. कोटींचा चुना लावून कोटी घरांत अन्न देणारा ठग की समाजसेवक हा प्रश्‍नच आहे. स्वत:चे खिसे भरून स्विस बँकेत अकाऊंट उघडणारे मखमलच्या गाद्यांवर झोपतात आणि लांबलचक गाड्या मिरवतात त्यांच्यापेक्षा हा नटवरलाल बरा. त्याने ताजमहल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकले असेल; पण त्याचा आत्मा विकला नाही. सराईतपणे त्याने लोकांना चुना लावला. त्याच्या करामती ऐकण्यासारख्या आहेत. नटवरलाल म्हणजे चुन्याची फॅक्टरी. एखाद्या गावात कारखाना आला की गावाला तेज येते, लोक पोटं भरतात. तसेच या चुन्याच्या फॅक्टरीनेही अनेक घरं चालवली. पुढल्या वेळी ताजमहाल, लाल किल्ला किंवा राष्ट्रपती भवन पाहिलेत की तुम्हाला नक्की हसू येईल आणि ही चुन्याची फॅक्टरी आठवेल.