Sunday, June 19, 2011

एक लाख टक्के



तेच तेच करणे, तसेच तसेच करणे आणि तेवढेच तेवढेच करणे या चक्रव्यूहात अडकलेल्यांना ‘हवे ते, हवे तसे आणि हवे तेवढे’ या संकल्पनेेचे दर्शन होत नाही. बदल माणसाला सहनच होत नाही. जगात बदल घडवून आणायच्या बोंबा मारणार्‍यांना रात्री झोपताना उशी बदललेलीही चालत नाही. आपल्याला सगळे ‘सेट’ हवे असते. कुणीतरी आधी चालून गेलेल्या मार्गावर चालणे सोपे वाटते. वेगळे काहीतरी करणार्‍याला वेड्यात काढल्याशिवाय आपण शांत बसत नाही. ‘रिस्क नको’ या मंत्राचा जप करून जगणे हे अनेकांच्या आवडीचे जगणे, पण या गर्दीत रोज नवी रिस्क घेणार्‍यांचीही कमी नाही. सागर पगारनेदेखील आयुष्यात सतत ‘रिस्क’ घेतली. 22 एप्रिल 1980 रोजी जन्मलेल्या सागरचे आडनाव ‘पगार’ असले तरी कष्ट त्याच्या वाट्याला होतेच. बालपण अगदी मजेत गेले. आई-वडिलांचे अमाप प्रेम, अभ्यास, मस्ती, मित्र असे सुंदर आयुष्य असतानाच अचानक बाबा गेले. त्याचे वडील नाना पगार हे अनेक मराठी नाटकांचे कर्तेकरविते होते. ‘लग्नाची बेडी’, ‘फुलाला सुगंध मातीचा’सारखी अनेक नाटके त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. निर्मात्याकडे कलावंतांच्या रांगा लागतात हे सागरने लहानपणापासूनच पाहिले.

वडिलांना भेटायला येणार्‍यांची गर्दीसुद्धा त्याच्या आयुष्याचा भाग होती. दादर हिंदू कॉलनीतील किंग जॉर्ज शाळेच्या सातव्या इयत्तेत असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईनेच सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या. वडील गेल्यावर लोकांची, कलावंतांची गर्दीही नाहीशी झाली. सागर सांगतो, ‘‘बाबा खरंच गेले आहेत हे कळणे स्लो पॉयझनसारखे होते.’’ मराठी नाटक-चित्रपटांतील माणूस संपतो आणि मागे काही ठेवत नाही तसेच झाले. मालमत्ता, जमापुंजी काहीच नव्हती. आर.एम. भट शाळेत आई शिक्षिका होती. कोणतीही उणीव न जाणवू देता सागरला आईने मोठे केले. आईचीच इच्छा म्हणून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला बी.आय.टी. कॉलेजात प्रवेश केला. या अभ्यासक्रमाचा फॉर्म भरतानाच त्याला लक्षात आले होते की, हा त्याचा प्रांत नव्हता, पण मराठी मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाले पाहिजे या जुनाट विचाराच्या गुंत्यात सागरही नकळत अडकला. सागर सांगतो, ‘‘कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षापर्यंत त्यांना कॉम्प्युटरला हातही लावायला मिळाला नव्हता.’’ आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तके जास्त आणि अनुभव कमी आहे असे त्याचे म्हणणे आहे. जेटकिंगमधून कॉम्प्युटर असेम्ब्लिंगचा अनुभव घेऊन त्याने कामाला लागायचे ठरवले. त्याने त्याच्या नावाची कार्डे छापली. गल्लोगल्ली फिरून ती वाटली व आपण संगणकासंबंधित सर्व कामे करतो हे सांगत फिरला. हळूहळू कामे मिळू लागली. संगणकाचे उपयोगी पार्ट विकणे सुरू केले. फॉर्मेट कॉम्प्युटर्स नाव लोकांना कळू लागले. त्यानंतर आर्यन इन्फोकॉम या कंपनीने रिटेल, होलसेल सर्वच जबाबदार्‍या घेतल्या. 50 माणसे हाताखाली काम करीत असताना सागरने एक रिस्क घेतली. कलेचा किडा सतत मनात फिरत होताच. कामावर जम बसताच चित्रपट दिग्दर्शनाचा कोर्स केला. चित्रपटांचे स्क्रिप्ट लिहिले. रमेश देव प्रॉडक्शनसाठी कामही केले. स्वत:च्या ऑफिसमध्ये 50 माणसं कामाला असताना चित्रपटाच्या सेटवर असिस्टंटचे काम केले. त्याला अनेकांनी विचारले, ‘‘तू वेडा आहेस का? हे काय चालवलंयस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘एक लाख टक्के मला मी काय करतो ते पटत आहे.’’ सागरला जगायला आवडते. खूप काही नवीन नवीन करत राहावे असे वाटते, पण कॉम्प्युटर इंजिनीअर आणि चित्रपट दिग्दर्शन...जरा चुकतंय का काही? अशा विचाराला सागरचे एकच उत्तर ‘‘मी मजेत आहे, एक लाख टक्के.’’ या प्रश्‍नांना सामोरे जाऊन झाले नाही तेवढ्यात अजून एक रिस्क घ्यायचे सागरने ठरवले. त्याची एक जपानी मैत्रीण मसाजचे प्रशिक्षण द्यायची. बुंग थॉंग मॉयचे काम पाहून त्याला सहज मनात विचार आला की, आपण एक ‘स्पा’ उघडावा. मालीश हा प्रकार आपल्या संस्कृतीत नवीन नाही. बाळंतिणीला सुईण मालीश करते. बाळांनाही मालीश केली जाते. बाईला पुढे जाऊन त्रास नको म्हणून तिला तेल लावून मालीश केली जाते. बदलत्या जगात आजीबाईचे घरगुती फंडे विसरले जात आहेत. गरम पाण्याच्या गुळण्यांची जागा स्ट्रेप्सिलसारख्या गोळ्यांनी घेतली आहे. ‘स्पा’ या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नसतानाही मनात आलेली संकल्पना अस्तित्वात आणायचीच असे त्याने ठरवले.

मराठी असल्याचा मला नेहमीच फायदा झाला असे तो सांगतो. शिवाजी पार्क, दादरमध्ये एक कॉम्प्युटर इंजिनीअर ज्याने दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे त्याला एक मसाज स्पा उघडायचा आहे. हे सरदारजींच्या विनोदासारखेच वाटत असताना सागरच्या आयुष्यात नेहमीप्रमाणे चमत्कार झाला. त्यालाही एक रिस्क घेणारा सापडला. श्री. पडवळ यांनी एक मराठी मुलगा काहीतरी नवीन करू इच्छितो म्हणून आपली जागा त्याला फार कमी भाड्यात दिली. वर ‘‘नाही चालले तर चावी आणून दे कधीही, कोणतेही बंधन नाही’’ असेही सांगितले. त्यावर सागर त्यांना म्हणाला, ‘‘एक लाख टक्के चालेल काका!’’ तो स्पा चाललाच. त्यानंतर जुहू, मुलुंड, ह्युजेस रोडलाही त्याच्या शाखा काढल्या. ‘एरीओपेगस’ नावाचा हा स्पा आता अनेक मोठ्या नावांचा लाडका झाला आहे. ऊर्मिला मातोंडकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस, आदिती गोवित्रीकर, मलायका अरोरा, पूजा बेदी या नियमितपणे त्याच्या स्पामध्ये येतात. त्याचबरोबर सामान्य स्त्रियांनाही ‘एरीओपेगस’ आवडत आहे. त्याची बायको स्वाती त्याचा मानसिक आधार आहे. आज कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पा कंपनीच्याही एवढ्या शाखा नाहीत. मराठी माणसाला धंदा जमत नाही असे म्हणतात. कारण तो प्रामाणिक असतो. अनेक गुजरात्यांचे, मारवाड्यांचे करोडो रुपये हाताळणारा एक मराठी असतो. सागर सांगतो, ‘‘मराठी मुले खूप हुशार आहेत, त्यांना नवीन काही करायचे असते. रिस्कही घ्यायला तयार असतात, पण त्यांना चांगले काऊन्सिलिंग, चोख माहिती मिळत नसल्यामुळे ती मागे पडतात. मी इंजिनीअर झालो इच्छा नसताना ती ही रिस्क, काम सोडून दिग्दर्शन करणे हीसुद्धा रिस्क, स्पा टाकणेदेखील रिस्क... रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. एक लाख टक्के माझे हे मत आहे.’’

सागरला अजून स्पा टाकायचे आहेत. लोकांपर्यंत मालीश आणि त्यामागचे विज्ञान पोहोचवायचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. रिस्क घेत राहायची आहे. सागरशी बोलताना एक जाणवते, तो शंभर टक्के न बोलता ‘एक लाख टक्के’ असे म्हणतो. असे का? हा प्रश्‍न विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘लोक जो विचार करतात, त्याहून काहीतरी वेगळा विचार करतो मी. शंभर टक्के कमी वाटतात. त्यामुळे मी स्वत:शीदेखील एक लाख टक्क्याचाच वायदा करतो.’’ ठरवले तर आपण काहीही करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत असलो तरी स्वप्नं पाहायची हिंमत असेल तर ती साकारही करू शकता. स्वप्नांच्या शब्दकोशात ‘मर्यादा’ हा शब्द नाही. अनेक मराठी मुलांनी सागरसारखी स्वप्नं पाहावीत व ती साकारही करावीत अशी त्याची इच्छा आहे आणि मलाही तसेच वाटते.

सागरच्याच भाषेत एक लाख टक्के!

No comments:

Post a Comment