Sunday, June 19, 2011

आय ऍॅम अ डिस्को डान्सर...



सगळं काही नीट होत असताना मध्येच राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीडचीड होते. का? कशासाठी? कशामुळे? काहीच कळत नाही, पण असं होतं. ऑफिसचे काम लवकर संपते. नेहमी लवकर घरी पोहोचावे असे वाटत असून पोहोचता न येणार्‍याला घरी जावेसे वाटत नाही. इथे तिथे वेळ घालवूनही वेळ जात नाही. कारण काही नसते, पण असं होतं. खूप वर्षे वाट पाहिलेली संधी दारात चालून येते. मनासारखे होते, पण आनंदाचा एक अंशही जाणवत नाही. खरं तर अर्थच नाही याला, पण असं होतं.

आपले प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीवर क्रोधाचा वर्षाव केला जातो. तसे करायचे नसते, पण नकळत घडून जाते. प्रेम अमाप असते तरी असं होतं. तरतरीत सुरू झालेल्या सकाळचा शेवट एक वैफल्यपूर्ण संध्याकाळ करते. बिघडलेले काहीच नसते. दिवसही नेहमीप्रमाणेच सरलेला असतो, पण असं होते. आपली क्षमता, कुवत माहीत असूनही कधीतरी लाचारीचे पांघरुण ओढून झोपावेसे वाटते. आपण काहीच करू शकत नाही. आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच मानावेसे वाटते. तोच आत्मविश्‍वास, तीच जिद्द, तीच स्वप्नं असतात मनात, पण असं होतं.

एकटेपणाची खूप भीती वाटते. कुणीतरी सोबत असावे असे वाटते. मुद्दाम सर्वांपासून दूर राहायचा, अबोला धरायचा निर्णय आपण घेतो. गरज असते संवादाची आणि आपण तोंड लपवून पळत राहतो. करायचे असते काहीतरी, करतो वेगळेच. असेही होते. अरे पण का होते याचे उत्तर कुणालाच सापडत नाही. कदाचित ते उत्तर न सापडण्यातच जगण्याची मजा आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन फुलपाखरासारखे असते. रंगीबेरंगी. कधी या फुलावर तर कधी त्या. मध्येच खूश होते. आनंदात रडवते, दु:खात हसवते. प्रगतीचा ध्यास लावते. ती मिळाली की, त्याचे महत्त्व संपवते. फुलपाखराप्रमाणे उडत राहते. पाऊस नाही पडला की, मन म्हणते ‘कसे होणार जगाचे? पावसाला काही काळजीच नाही.’ धो धो पडला की, तेच मन म्हणते, ‘अरे, काही सीमा आहे की नाही? किती पडायचे पावसाने!’ आणि अगदीच काही नाही तर म्हणते ‘पावसाचे काहीच खरं नाही, कधीही येतो आणि कधीही जातो.’ मन हे असेच.

छोट्या पोरांची मनं सांभाळण्यासाठी आपण जी मेहनत घेतो, तेवढेच श्रम आपण स्वत:चे मन सांभाळण्यासाठी घ्यायला हवे. मनाशी संवाद साधा. स्वत:च्या मनाला समजवा. ‘मूड’च्या नावाखाली काम न होणे हे योग्य नाही. मन बदलत राहते, उडत राहते, भावनांचे मंथन करते, विचारांचे पत्ते पिसते, मूड नावाच्या गुंत्यात गुंतवते. मन अक्षरश: आपल्याला नाचवते आणि आपण नाचत राहतो. काही कळतच नाही, कधी कधी बेसूर रडगाण्याचे खड्डे खणून त्याभोवती बेताल ठेके देत नाचतो. खड्ड्यात पडू या भीतीने कुढतो, पण नाचत राहतो. हा नाच नाचण्यापेक्षा मनाचे हे खेळ समजून घ्या. आपल्या बाळांचे जेवण सांडणे, धडपडणे, रडणे, हसणे, अगदी काहीही जसे ‘गोड’ किंवा ‘किऊट’ वाटते तसेच स्वत:च्या मनाच्या नाचालाही गोड मानून हसत रहा. त्या बेताल नृत्याला छान समजूतदारीचा ठेका द्या. मनाच्या खेळांची मजा घ्या. त्यात व्यापून जाऊ नका. आनंदाचा ताल धरून मनासोबत नाचा. रोज नाचा. आनंद घ्या जगण्याचा. मनाच्या उड्यांचा. उत्तरे शोधू नका. अनुभव घ्या. मनासोबत आनंदाने नाचताना खुशाल म्हणा ‘‘आय ऍम अ डिस्को डान्सर.’’

No comments:

Post a Comment