Tuesday, June 14, 2011

शेवटचा उ‘संत’



सध्या उपोषणांचा सीझन आहे. क्रिकेट, फुटबॉल किंवा ऑलिम्पिक्सचे जसे थेट प्रक्षेपण टी.व्ही.वर दाखवले जाते तसेच हे उपोषणाचे कार्यक्रमदेखील लाईव्ह टेलिकास्ट होतात. ए.सी. तंबू, वारा घालणारे सतराशे साठ चहाते, सर्व बाजूंनी कॅमेरा आणि दुनियेभरच्या गोंगाट्यातली ही उपोषणे पाहून हसावे की रडावे हे कळायचाही मार्ग नसतो. ‘मी संत आहे’ अशी पाटी गळ्यात टांगून फिरणार्‍यांनी अध्यात्म, देव आणि समाजसेवेचा जो बाजार मांडलाय त्यात ढोंग आणि फसवेगिरीखेरीज काहीच प्राप्त नाही. अनेक महाराज, अण्णा आणि बाबांच्या संतगिरीच्या धंद्याचे स्वरूप पाहून आता पटते की देवाने संत बनवायचे सोडून दिले. 11 सप्टेंबर 1895 रोजी जन्माला आलेले विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यांच्यानंतर आलेत फक्त पंत आणि संतत्वाचा अंत. लहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदे मातरम्चे नारेही त्यांना खेचत होते. 1916 मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता. आईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.

बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्‍न लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला. एक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.’

हे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले. गांधीजींनी त्यांना आश्रमात राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादातील आश्रमात एकटे राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. ते नेहमी सांगत, ‘मी बंगालला गेलो नाही किंवा हिमालयातही नाही गेलो. पण गांधीजींच्या सहवासात मला त्या दोनही ठिकाणी पोहोचल्याचे सुख मिळाले. हिमालयाची शांतता आणि अन्यायविरोधाचा पराक्रम दोनही एकाच वेळी कसे घडू शकते ते मला आता कळले.’ 7 जून 1916 या दिवशी ते गांधीजींना पहिल्यांदा कोचरब आश्रमात भेटले आणि त्याच दिवसापासून आपले आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केले. विनोबांना महान व्हायचे नव्हते. नेता व्हायचे नव्हते. गर्दी जमवायची नव्हती. ते नेहमी सांगत, ‘रोज ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. नाहीतर जगणे व्यर्थ आहे.’ 1921 साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला पोहोचले. तेथे त्यांना सेठ जमनालाल बजाज भेटले. बजाज यांनी विनोबांना गुरू मानले. पवनार येथे परमधाम आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात. केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांनी बंद केला होता. याविरुद्धच्या 1924 मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले. स्वातंत्र्यलढ्यात 1932 साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन सांगितले. हेच गीता प्रवचन ‘गीताई’ झाले. याच्याशी एक गोड गोष्ट जुडलेली आहे.

विनोबा कॉलेजमध्ये असताना विनोबांची आई गीतेवरील प्रवचन ऐकायला जात असे. एकदा ती विनोबांना म्हणाली, ‘गीता संस्कृत आहे. ती मला समजत नाही. मला मराठी गीता आणून दे.’ त्यावेळी उपलब्ध होता तो ग्रंथ विनोबांनी तिला आणून दिला. तो पसंत नव्हता तरी नाइलाजाने तोच द्यावा लागला. तेव्हा आई विनोबांना म्हणाली, ‘हे पद्य तर संस्कृतइतकेच कठीण आहे. तू स्वत:च का अनुवाद करीत नाहीस?’ आपला मुलगा गीतेचा अनुवाद करू शकेल इतका आत्मविश्‍वास तिला कशामुळे वाटला असेल कोण जाणे! कदाचित तिने विनोबांचे अप्रतिम कविता लिहून अग्नीला समर्पण करणे पाहिले असेल. आईच्या या पूर्ण विश्‍वासामुळे विनोबांना फार मोठे बळ लाभले. विनोबांची आई विद्वान नव्हती की शिकली सवरलेली नव्हती. तिने कधी विनोबांना शिकवलेही नाही. उलट विनोबांनीच तिला वाचायला शिकवले होते. तिचा अत्याधिक विश्‍वास विनोबांच्या जीवनाचा पाया होता. विश्‍वास ही एक जादू आहे. अनेक धर्मग्रंथ सांगतात, ‘तू पापी आहेस, पुण्यवान हो.’ पण वेद, उपनिषदे विश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘तू ब्रह्म आहेस.’ त्या माऊलीने विनोबांवर असाच विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास विनोबांनी गांधीजींवर ठेवला. आईच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी गीतेचा मराठी अनुवाद करून त्या अनुवादाला ‘गीताई’ म्हणजे गीता-आई असे नाव दिले. ही गीताई आज महाराष्ट्रात घरोघर पोहोचली आहे. विनोबांनी जे काही चिंतन, मनन केले होते आणि लिहिलेले अग्नीला समर्पण केले होते त्याचाच हा प्रसाद आहे असे विनोबांना वाटते. ही साहित्यिक कृती नसून हे धर्म-चिंतन आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जेलमध्ये विनोबा होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेले कैदी गीताईची मागणी करीत. फाशीला चढणार्‍या एका कैद्याने डॉक्टरांच्या मार्फत विनोबांना संदेश पाठवला, ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. गीताई वाचली. आता आनंदाने जातो.’ विनोबा सर्वांचे प्रिय होते.

निसर्गाचे व मुक्या प्राण्यांचे कैवारी होते ते. शांतपणे उपोषणे, साधे कपडे, गोरगरीबांची सेवा हेच त्यांचे जगणे. गांधीजींचे दोन लाडके- एक विनोबा आणि एक जवाहरलाल नेहरू. ब्राह्मण असून मांस-मच्छी व मद्यपान करणार्‍या नेहरूंना विनोबा फार आवडायचे नाहीत. गांधींच्या तोंडी विनोबांचा सारखा उल्लेखही नेहरूंना पसंत नव्हता. पण त्यांना ते सहन करण्याखेरीज उपाय नव्हता. जनता विनोबाची दिवानी होती. विनोबा नेहमीच चाहत्यांनी घेरलेले व त्यांच्या प्रवचनांना-भाषणांना खूप गर्दी असायची. या गर्दीसाठी नेहरू विनोबांजवळ जाऊ लागले. लोकांचे प्रचंड प्रेम होते विनोबांवर, नेहरूंचे नव्हते. पण प्रेम न करणारेही विनोबांकडे खेचले जायचे. विनोबांना अनेक भाषा येत. फ्रेंच व लॅटिनवर तर त्यांचे प्रभुत्व होते. 17 ऑक्टोबर 1940 पासून गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली व भावे यांची निवड केली. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या चळवळीचा आरंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. भूमिहीन हरिजनांनी विनोबांना आपल्या वेदना सांगितल्या. गर्दीतील विनोबांच्या एका भक्ताने उठून सांगितले, ‘मी शंभर एकर जमीन तुम्हाला अर्पण करतो विनोबा.’ हे ऐकून ते थक्क झाले. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या परीने जमिनी दान करणे सुरू केले. विनोबांनी मेलेली मनं जागृत केली. ही होती भूदान चळवळ. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व भूदान चळवळींसाठी विनोबा पायी फिरले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना दिली.

आपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. ‘टाइम’ मासिकाने व ‘यॉर्कर’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या विचाराला साथ दिली. शिस्त हवी असे सांगणार्‍या विनोबांच्या आश्रमात इंदिराजींच्याच माणसांनी काही मासिके जाळून थैमान घातले तेव्हाही ते हसलेच. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.’ त्यांना परदेशात ‘द वॉल्किंग सेंट’ असे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली. 15 नोव्हेंबर 1982 मध्ये विनोबा गेले. शेवटचे दिवस आश्रमात पण सेवेतच घालवले. त्यांना 1983 मध्ये भारतरत्न दिले गेले (मरणोत्तर). माणूस मेल्याशिवाय त्याचे कौतुक करायचे नाही अशी पद्धत आहे. जीव सोडला की पुरस्कार, त्याच्या नावाने रस्ते, बागा व सिनेमे सर्व होते. पण विनोबांचे कौतुक करू तेवढे कमीच. कार्य लिहू तेवढे कमीच. त्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्‍यांनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे. अमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस्थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का?’ विनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे!’ विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यानंतर झाले ते दुकानदार.

No comments:

Post a Comment