Sunday, June 5, 2011

पिडियॅट्रिक संगीतकार


कधी कधी आपल्याला काय बोलावे कळतच नाही. आपण फार विचार करतो काय बोलायचे याचा आणि शेवटी न बोलता ती वेळ घालवतो, पण सलीलचे अगदी उलट आहे. तो कधीही बोलण्याआधी विचार करीत नाही. बर्‍याचदा तो काय बोलणार आहे हे त्यालाही माहीत नसते. ‘अनप्रेडिक्टेबल’ या शब्दाचा खरा अर्थ काय ते सलीलला भेटल्यावर नक्कीच कळते. आयुष्य म्हणजे ‘रुटीन’ तेच तेच आणि जगणे म्हणजे ‘फॉरमॅट’ सगळे करतात तसे. या वागणुकीहून विपरीत जगणार्‍याला आपल्यात ‘सटक’ असे म्हणतात. तसाच एक सटक म्हणजे डॉ. सलील कुलकर्णी.

त्याच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. विचारांची, भावनांची आणि आपलेपणाची बंपर ऑफर असलेल्या सलीलचा जन्म ६ ऑक्टोबर १९७२ मध्ये पुण्यात झाला. एकतर सटक, भन्नाट मुडी आणि त्यात पुणेकर म्हणजे कसले सॉलिड कॉम्बिनेशन असणार हे डॉक्टर याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणे हे भाग्याचेच आहे, असे सलील सांगतो. कारण पु. ल., सुधीर फडके, अत्रे, टिळक, साहित्य, संगीत या सगळ्यांचे उल्लेखसुद्धा मध्यमवर्गीय घरांमध्येच होतात. प्रेमाच्या भिंती आणि संस्कारांचे छत यात सलीलचे बालपण गेले. संगीताची त्याच्या आयुष्यातली सुरुवात त्याच्या श्‍वासाच्या लयीवरच झाली असावी. अडीच वर्षांच्या सलीलने आकाशवाणीवर जयोत्सुते गायले होते. मला मिळालेले पहिले गिफ्ट होते एक हार्मोनियम. त्याने संगीताशी नाही तर संगीतानेच त्याच्याशी एक नाते जोडले असावे असे माझे मत आहे. त्याचे सुदैव असे की लहान गायक म्हणून त्याला कधी कुणी डोक्यावर बसवले नाही. पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमालाबाई शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून त्याने गाण्याचे प्रशिक्षण घेतले. आधीपासून त्याला अभ्यासाचे वेड होते. आपण डॉक्टर व्हायचे हे त्याने ठरवले होते. म्हणूनच जोरजबरदस्ती आणि ढकलमपंची हा प्रकार शिक्षणात त्याने कधीच नाही अनुभवला. एमबीबीएस करीत असतानाच त्याने काही गाणी बनवली. शांता शेळके, पु. लं.सारख्या दिग्गजांनी त्याला दाद दिली. त्याक्षणी तो संगीताकडे वळला. पुराचे पाणी झाडांना ओढून नेते तेव्हा झाडांना चॉईस नसतो. तसेच मी संगीतात वाहून गेलो, असे त्याचे म्हणणे. संगीत दिग्दर्शन म्हणजे गोंगाट आणि स्टुडिओतील मशिनींची कमाल समजल्या जाणार्‍या काळात पेटीवर अप्रतिम चाली बसवणार्‍या सलीलला ‘हॅटस् ऑफ’ म्हणावेसे वाटते. एस. पी. बालसुब्रमणीयम, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, बेला शेंडेंसारख्या मोठमोठ्या गायकांना त्याने आपल्या चालींवर सुरांचा वर्षाव करण्याची संधी दिली आहे. संगीत म्हणजेच सलीलची अभिव्यक्ती. त्याच्यातल्या लहान मुलाला संगीतामुळेच मन मोकळे करता येते हेही तो सांगतो. एकटेपणाचे प्रदर्शन भरवणार्‍यांशी त्याचे अजिबात काही घेणेदेणे नाही. त्याला गर्दीत रमायला आवडते, गप्पा मारायला आवडतात आणि आनंद उपभोगायला आवडतो. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे बाबा गेले. आईच बाबासुद्धा झाली.

आईने कोणतीही उणीव भासू दिली नाही. सलीलच्या वागण्यात जी माया जाणवते त्याचे खरे क्रेडिट कुणाला मिळायला हवे ते आता सर्वांना कळलेच असेल. प्रेमगीते असो किंवा बालगीते, सलीलचे संगीत मनाला भिडणारे असते. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातील गाण्याच्या चाली नसत्या तर कदाचित त्या कवितांचे अर्थ कळले नसते, असे मला नेहमी वाटते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे गाणारा आणि ऐकणारा गाणे संपेपर्यंत डोळे पुसत राहतो. फक्त पेटी, तबला आणि भावना एकत्र आल्या की संगीत हृदयात खोलवर शिरते हे सलीलच्या संगीताने लक्षात येते. बालगीतांना संगीत देणे त्याला आवडते. ते कठीण असते. कारण लहान मुलांना राग, कौशल्य, अलंकार, षडज वगैरे काही कळत नाही. त्यांना गाणे आवडते किंवा आवडत नाही. ‘अग्गेबाई-ढग्गोबाई’ या बालगीतांच्या अल्बममधील गाणी मोठ्यांनाही आवडणारी आहेत. ‘मी पप्पांचा ढापून फोन’ या गाण्याने तर तुफान केले होते. सलीलचे आयुष्य म्हणजे त्याची आई रेखा कुलकर्णी, बायको अंजली आणि पोरं शुभंकर व अनन्या. अंजली ही प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांची कन्या. सलील सांगतो, ‘माझ्या दोन्ही पोरांचा आवाज अंजलीसारखा चांगला आहे हे नशीब.’ सलीलची स्मरणशक्ती फारच छान आहे. एकदा भेटलेल्या व्यक्तीलाही तो विसरत नाही. बाबा गेले तो त्याचा सर्वात वाईट दिवस होता. तो दिवस आजही ठळक आठवतो. त्याला हसायला आवडते, मित्रांसोबत गप्पांच्या मैफली रंगवायला आवडतात, पोरांसोबत खेळायला आवडते. ‘गेलेले क्षण परत येत नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक क्षण जगतो’ असे तो सांगतो. मुलांच्या शाळेत पॅरेंटस् मिटिंगपासून ते मित्रांच्या गरजेच्या वेळेत मी असतो.’

क्रिकेटचे वेड आहे सलीलला. तेंडुलकर, युवराज आणि गांगुलीसोबत घरी जेवायला बसून क्रिकेट या विषयावर गप्पा मारणे हे स्वप्न सलीलसारखेच भन्नाट आहे. माझे मित्र, माझी माणसं हीच माझी संपत्ती आहे हे तो सांगतो. त्याचे अल्बम ‘आयुष्यावर बोलू काही’, नामंजूर, दमलेल्या बाबाची कहाणी, आनंद पहाट, संधीप्रकाश! आणि अनेक हे मनात घर करणारे आहेत. तो सांगतो, मी शर्यतीत नाही. मला कोणते स्टेशन गाठायचे नाही. माझ्या मुलांना व पुढल्या पिढीला माझ्या कार्याचा अभिमान वाटला पाहिजे एवढेच माझे ध्येय. खूप सुंदर विचार करणे, चांगली गाणी बनवणे, खूप प्रेम वाटणे हे सगळे या कार्यासोबत करायचे आहे. मनं जिंकायची आहेत. कोणतीही रेस जिंकायची नाही. त्याचे पुस्तक ‘लपवलेल्या काचा’ आजकाल फार चर्चेत आहे. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की वाचकाला हे आपणच लिहिले आहे असे वाटते. फार सुंदर शब्दांत सलीलने संपूर्ण आयुष्यच त्या पुस्तकात संचित केले आहे. २०७ पानांमध्ये कितीतरी प्रसंग, भावना व वर्ष लपलेली आहेत. हे पुस्तक वाचूनही संपत नाही. खरं तर या पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात ते वाचून संपल्यावरच होते. पुस्तक अर्पण केलंय दोघींना. आईला व हार्मोनियमला. तरीही ते प्रत्येक वाचकाला त्यालाच अर्पण केलंय असे वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचे संगीतवेड, क्रिकेटवेड, प्रेमळ स्वभाव, संगीत शाळा, त्याचे विद्यार्थी आणि जगण्याची इच्छा हे सगळे त्याच्या जगण्याचा पाया. कुटुंब, मित्रपरिवार आणि संगीत त्याच्या सगळ्यांचे कारण. तो प्रत्येकातल्या लहान मुलाला आपल्या संगीताने जागृत करतो. हसवतो, रडवतो, विचार न करता भावना व्यक्त करायला लावतो. त्याच्या कार्यक्रमात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत पोट धरून हसतातही आणि मान खाली घालून रडतातही. म्हणूनच हा डॉक्टर कम संगीतकार मला अगदी जवळचा वाटतो. अगदी के.जी.मधल्या टीचरसारखा किंवा गोड गोळ्या देणार्‍या लहान मुलांच्या डॉक्टरसारखा.

मुलांचे डॉक्टर तसे मोठ्या माणसातल्या लहान मुलाच्या भावनांचा डॉक्टर सलील याला आपण पिडियॅट्रिक संगीतकार म्हणायला काहीच हरकत नाही. सलील तू तुझा अजबखाना चालूच ठेव. आमच्या भावनांना वाचा दे. तुझ्या संगीताने सर्वांना थोडा वेळ का होईना पण लहान होण्याची संधी दे.

No comments:

Post a Comment