Sunday, July 11, 2010

मतदारांचा देव





आषाढी एकादशी म्हणजे वारकर्‍यांची खरी दिवाळी. सर्व विठ्ठलभक्तांचे लक्ष पंढरपुरी अडकलेले असते. वारकर्‍यांचा, सामान्य माणसांचा देव, विष्णूचा अवतार म्हणजेच पांडुरंग, पंढरपूरला कसा पोहोचला हे अनेकांना माहीतच नाही. जानुदेव आणि सत्यवतीचा मुलगा पुंडलिक अत्यंत आज्ञाधारक होता. दांडीरवनात हे तिघे आनंदाने राहात. मात्र लग्न झाल्यानंतर पुंडलिक आई-वडिलांचा छळ करू लागला. त्रासून त्यांनी काशीला जायचे ठरवले. काशीतच जीव जावा या विचाराने ते निघाले. हे ऐकून पुंडलिकच्या बायकोनेही सोबत जायचे ठरवले. पुंडलिक व त्याची पत्नी घोड्यावर बसून प्रवास करत व वृद्ध आई-वडिलांना चालायला लावत. कुकुटस्वामींच्या आश्रमात स्वारी रात्री थांबली. प्रवासाला दिलेल्या स्वल्प विरामातही आपल्या पालकांना कामाला लावले. रात्री झोपमोड झाली आणि पुंडलिकने एक विचित्र दृश्य पाहिले. सुंदर स्त्रियांनी आश्रमात प्रवेश केला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे गलिच्छ होते. आश्रम साफ करून त्या पूजाघरात जाऊन परतल्या आणि आता त्यांचे कपडे स्वच्छ वाटत होते. पुंडलिकने धाडस करून त्यांना विचारले ‘तुम्ही कोण?’ त्या म्हणाल्या, ‘आम्ही गंगा, यमुना, सरस्वती व इतर नद्या आहोत. तुझ्यासारखे दुष्ट व पापी नद्यांमध्ये आपली पापं धुतात आणि म्हणून आमचे कपडे गलिच्छ वाटतात. आई-वडिलांना वाईट वागवणार्‍याहून दुष्ट कुणीच नाही’. हे ऐकून पुंडलिक गडबडला. त्याला त्याची चूक कळली व तो बदलला. त्या दिवसानंतर त्याने त्याच्या आई-वडिलांची अफाट सेवा केली. या सेवेचा सुगंध भगवान विष्णूपर्यंत पोहोचला. लगेच विष्णुदेव वैकुंठाहून भूलोकावर प्रकट झाले. पुंडलिक आई-वडिलांची सेवा करण्यात तल्लीन होता. साक्षात परमेश्‍वर दार ठोकत असूनही मातृ व पितृभक्तीला तडा न देता तो कर्तव्यात पार बुडून गेला होता. त्याने देवाकडे वीट फेकली व त्यावर उभे राहून वाट पाहण्याचा आदेश दिला. विष्णू खरंच त्या विटेवर उभे राहून पुंडलिकची वाट पाहू लागले. नंतर देवाची माफी मागून ‘देवा तू इथेच रहा!’ अशी विनंती पुंडलिकाने केली. भक्ताचा मान राखला व विठोबाच्या रूपात विष्णुदेव पंढरपुरात स्थायिक झाले. त्याच ठिकाणी आज विठोबा विटेवर उभा आहे. प्रेमाने पंढरपुराचे ठेवलेले नाव आहे ‘भू-वैकुंठ’ महाराष्ट्रात तर विठोबाचे भक्त आहेतच तसे कर्नाटकातही तेवढेच भक्त असतील. ज्ञानेश्‍वर, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, एकनाथ, सावतामाळी यांनी विठोबाच्या नामात रंग भरले व भक्तिरसात तल्लीन झाले. या संतांना वारकरी सांप्रदायाच्या वाटचालीला गती दिली.

दक्षिण हिंदुस्थानात विठोबाला ‘विठ्ठल’ असे नाव दिले गेले आहे. मराठी सामराज्य विजयनगरात असताना विठोबाची प्रचीती तिथे पसरली. हंपीचे देऊळ हे महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठे विठ्ठल मंदिर असेल. 15व्या शतकात बांधलेल्या या देवळात राजा कृष्ण देवरायने पंढरपूरमधील मूर्ती आणून ठेवली होती. मुगलांपासून वाचवण्याकरिता असे केले गेले. तीन मूर्ती संत एकनाथांच्या नातवाने म्हणजेच भानुदेसने पंढरपुरात परत आणली. खरं तर देव हा देव असतो, पण त्यातही माणूस वाद निर्माण करतोच. विठोबा हा विष्णू व शीव या दोघांचेही रूप आहे, पण तो नक्की वैश्य की शैव यावर अनेक संवाद केले जातात. माणूस भांडायची एकही संधी सोडत नाही. मला आश्‍चर्य हेच वाटते की बेळगाव प्रश्‍नाबरोबर विठोबा कोणाचा, महाराष्ट्राचा का कर्नाटकचा, हे पोस्टर अजून कसे लागले नाही. विठोबाचे भक्त अनेक आहेत. कुणी शिंपी, कुणी कुंभार, कुणी माळी तर कुणी सेवक. जात, पात, धर्म, वर्ण याला विठोबाकडे काहीच बंधन नाही. शुद्रांना अडवणूक झाली, पण विठ्याने त्यांचीही सोय केलीच.

कुर्मदास नावाचा विठोबाचा एक भक्त अपंग होता. लोळत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचायची जिद्द धरून पैठणहून निघाला. दिवस उलटले. एकादशी 3 दिवसांवर आली. आपण पोहोचू शकत नाही कळताच एका वारकर्‍याजवळ देवासाठी पत्र दिले. कुर्मदासाचे पत्र विठोबाच्या चरणी पडताच विठू उठून निघाले. ज्ञानदेव, नामदेव व सावतामाळी त्यांच्या मागोमाग गेले. शेवटी भक्त पोहोचू शकला तर विठोबाच त्याच्यापर्यंत पोहोचतो हे खरे. म्हणूनच तो सामान्यांचा देव मानला जातो. वैष्णवदेवी, तिरुपती, काली यांच्या चरणी सोनं, हिरे, पैसे, दागिने सर्वकाही अर्पण होत असते. उद्योगपती, क्रिकेट खेळाडू, अभिनेते, नेते, कोणतेही कार्य करण्याआधी या ठिकाणी जाऊन संपूर्ण खिसे खाली करतात. पण विठ्ठलाला भेटायला निघालेले अनेकदा घरदार विकून पंढरपूरपर्यंत पोहोचण्याचे विचार करतात. पाच-दहा रुपये टाकणारे हे भक्त संपत्तीचे दान नसतील देत, पण यांच्या भक्तीचा खजाना उघडला तर तिरुपतीत जमा झालेले सर्व धन फिके पडेल. मैलोन्‌मैल चालणारे विठ्ठलाचे भक्त हे जाणतात की, त्यांचा विठोबा फक्त भक्तीची भूक ठेवतो.

विठोबा हा फक्त देवच नाही तर अनेकांचा मित्र आहे. संतांच्या अभंगांतही आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तिशी साधल्यासारखे संवाद विठ्ठलाबरोबर मांडले आहेत. विठोबा माऊली म्हणून आईच्या रूपातही विठोबाला पाहिले जाते. देवाच्या परिभाषा जगात वेळोवेळी व सोयीप्रमाणे बदलत राहतात, पण माझ्याप्रमाणे देव हा आईसारखा असतो. आपले सारे गुन्हे माफ करणारा, चुका पदरात घालणारा, आपली वाट पाहात राहणारा व आपल्या मदतीला धावणारा. तुम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचू नाही शकलाच तर तोच तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. या देशाचे भवितव्य मोठे श्रीमंत ठरवत नाहीत तर या देशातील सामान्य ठरवतात. जो या सामान्यांना नाखूश करेल तो कधीच टिकणार नाही. गोर-गरीबांचा वाली, विठोबा माऊली सर्व परिस्थितीवर डोळा ठेवून आहे. खुर्चीवर बसलेल्यांनी तिरुपती व वैष्णोदेवीच्या चकरा न मारता पंढरीची वारी घ्यायला हवी. कारण एक लक्षात घ्यावे, हा सामान्यांचा देव आहे...
म्हणजेच ‘मतदारांचा देव आहे...’


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवेभावे॥

No comments:

Post a Comment