Monday, July 4, 2011

मीच मला खांदा देणार!


शरीरात वेगवेगळ्या अवयवात असलेला एक आहे खांदा. डोळ्यावर, ओठांवर, केसांवर, हातांवर अगदी पायांवरही कविता लिहिल्या जातात. पानावर पाने भरून लेख लिहिले जातात. पण ‘खांदा’ या विषयाकडे फार कुणाचे लक्ष जात नाही. खरं तर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण आयुष्य खांदे शोधण्यात जाते. मेल्यानंतर मात्र खांदे देणार्‍यांची रांग लागते. आलटून पालटून नंबर लावून प्रत्येकाला खांदा द्यायचा असतो. ‘मलाही द्यायचाय यांना खांदा. थोडे पुढे गेल्यावर जरा मला संधी द्याल का?’ हे जेवढे सहजपणे ऐकू येते, तेवढे सहज जिवंतपणी नाही कानी पडत. एवढे सगळे खांदे जिवंतपणी का नाही समोर येत, या प्रश्‍नावर विचार करून वेळ घालवणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्यात पद्धतच आहे ती, ‘जिवंतपणी तिरस्कार आणि मरणोत्तर पुरस्कार.’ अनेक मोठ्या लोकांनीही या पद्धतीतच जीव सोडला. कठीण परिस्थितीत कधी कधी आधार घ्यावासा वाटतो. खूप मनमोकळे बोलावे, रडावे, न पटणारी बाजू असली तरी कुणी ऐकून घ्यावी, डोक्यावरून हात फिरवावा, सगळं नीट होईल असे उगाच आश्‍वासन द्यावे, हे सगळे वाटत राहते. पण तसे काही होत नाही. मग रागाचे वादळ मन, मेंदू झपाटून टाकते. ही सगळी तडफड असते फक्त ‘खांद्या’साठी.

मोबाईलमध्ये जमा असलेल्या सर्व नावांमध्ये आपल्याला समजून घेईल असे एकही आढळत नाही अशा क्षणी. हे असे क्षण सर्वांच्याच जीवनात येतात. प्रत्येकाला आधाराची ओढ असते. डोके ठेवायला सगळेच खांदा शोधत असतात. त्यात काहीच गैर नाही. पण आपण विसरतो की, आपल्यालाही दोन खांदे आहेत. आपण जगभर आधार शोधतो, पण स्वत:च स्वत:ला आधार देत नाही. ही चूकच नाही का? ज्या खांंद्यांनी आपण इतरांना आधार देतो तेच खांदे आपल्यालाही आधार देऊ शकतात ही गोष्ट विसरू नका. खांदे शोधत फिराल तर स्वत:च हरवाल. तुम्ही जे खांदे शोधत आहात ते फक्त जगण्याला पूर्णविराम लागल्याशिवाय मिळत नाहीत. आधाराची गरज जाणवली की आरशात पहा. आपल्या मजबूत खांद्यावर असेल त्या संकटाची जबाबदारी सोडा. जेव्हा तुम्ही आयुष्यात संकटक्षणी आरशात पाहाल...हे खांदे तुमच्यासोबत असतील. कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. खांदे शोधू नका, आधारासाठी वणवण फिरू नका. आरशात पहा. स्वत:ला खांदा द्या. स्वत:ला आधार द्या. पुढल्यावेळी डोके ठेवण्याकरिता खांदा हवा असे वाटले की आरशात पाहून म्हणा, ‘मीच मला खांदा देईन.’

No comments:

Post a Comment