Wednesday, May 25, 2011

आधुनिक शिल्पकार



डॉक्टरकडे कुणी आनंदाने जात नाही. पण सर्व डॉक्टरांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. काही डॉक्टर औषधे वाटतात, पण डॉ. पूर्णिमा म्हात्रे अनेकांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम करतात. आरशासमोर उभे राहण्याची इच्छा निर्माण करतात. त्या फक्त शरीरालाच नाही तर मनालाही आकार देतात. त्यांच्या ‘गॉरजियस’ क्लिनिकमध्ये शिरल्याक्षणी प्रसन्न वाटू लागते. इथे सर्वांचा कायापालट होत असेल हे कळायला फार वेळ लागत नाही. कॉस्मेटिक सर्जरी, वजन कमी करणे, चेहर्‍याची ठेवण नीट करणे हे सर्व काही त्या करतात. अनेकांना त्यांनी जगण्याची उमेद व आत्मविश्‍वास दिला आहे.

गॉरजियस क्लिनिक हा सुंदर बनवण्याचा कारखाना आहे असे म्हणायला हरकत नाही. 13 जुलै 1967 मध्ये डोंबिवलीत पूर्णिमाचा जन्म झाला. वडील दिनकर म्हात्रे व आई शोभना म्हात्रे यांनी आपल्या मुलांमध्ये व मुलीमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. भावांना जेवढे स्वातंत्र्य व शिक्षणाची संधी दिली तेवढीच तिलाही दिली गेली. आपल्या पोरीने डॉक्टर व्हावे आणि समाजात मोठे स्थान मिळवावे असे सौ. शोभना यांचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्णिमाचे ध्येय कधी झाले हे तिलाही कळले नाही. आपण डॉक्टर व्हायचे हे तिने लहानपणापासूनच ठरवले होते. त्यांच्या घराण्यात कुणीच डॉक्टर नाही. वडील कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात व बदलापूर येथील त्यांच्या फार्मवर शेतीचे कामही पाहतात. पण आपल्या पोरीने हवे ते शिकावे यासाठी त्यांनी सतत तिला प्रोत्साहन दिले. संस्कारांसोबत स्वप्ने पाहायची हिंमतही दिली. टिळकनगर विद्यामंदिर शाळेची मुलगी पूर्णिमा पेंढारकर कॉलेजमध्येदेखील अभ्यासात नेहमी पुढेच होती. आपल्याला पुढे काय करायचे आहे हे माहीत असल्यामुळे तिची मानसिक भरकट कधीच झाली नाही.

क्रिष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडमधून ती डॉक्टर झाली. स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू केली, पण तिला नुसत्या गोळ्या वाटून पैसे छापायचे नव्हते. तिला बदल घडवणे हा प्रकार फार आवडतो. माझ्यामुळे लोकांचे चेहरे खुलले पाहिजेत, त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळायला हवे या विचाराने तिने मुंबई विद्यापीठातून कॉस्मेटॉलॉजी या विषयातून डिप्लोमा केला. या विषयात रस असल्यामुळे ती जोमाने कामाला लागली. 2005 ते 2007 ती कॅनडाला ऍडबास्ड कॉस्मेटॉलॉजी शिकण्याकरिता गेली. आपण जे शिकलो ते आपल्या हिंदुस्थानातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तिने धडपड करून पहिले क्लिनिक उभे केले. ‘स्त्रीला या समाजात मूर्ख समजून तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो’ असे ती सांगते. पण तिच्या आयुष्यात आलेल्या अशा प्रसंगांना तिने धाडसाने हाताळले. स्वप्नांच्या मागे धावणे हा तिचा रोजचाच व्यायाम असल्यामुळे तिला अडथळ्यांची भीती वाटत नाही. अमेरिकेत जाऊन तिने काही नव्या प्रकारचे उपचार हिंदुस्थानात आणले आहेत. कमी दरात, कमी तासात बरेच काही करता येते हे लोकांना पटत नाही, पण पूर्णिमा ते फार सोप्या भाषेतच चांगल्या रीतीने समजावते. एम. बी. बी.एस.ला शिवाजी युनिव्हर्सिटीत मेरिटमध्ये येण्यापासून ते ‘गॉरजियस’ची केंद्रे सर्वत्र पसरवण्यापर्यंत तीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अनेक कलाकारांची ती मैत्रीण आहे. त्यांच्यावर उपचार करता करता वेगळेच नाते जुळून येते असे ती सांगते. सिनेमा जगतातील बर्‍याच तारकांनी तिचे उपचार घेतले आहेत. केसांची काळजी, नाक सरळ करणे, ओठांची ठेवण बदलणे हे तिचे रोजचे काम. ऋषी कपूरची पत्नी व रणबीर कपूर यांची आई नीतू सिंग या पूर्णिमाच्या कलेवर भारावूनच गेल्या आहेत. जाहीरपणे त्या तिची तारीफ करत असतात. ‘सध्या प्रत्येक हीरोईन माझ्याकडे येते’ असे हसत तिने म्हटले. जरी, तरी कोण कोणता उपाय करून घेत आहे हे मी नाही सांगू शकत हेही ती ठामपणे सांगते. एकेकाळी फक्त सेलेब्रिटी’ असे उपचार करायचे पण आता सर्वसामान्य माणसेदेखील या उपायांचा वापर करत आहेत. केसांचा उपचार, त्वचेचा उपचार, वजन कमी करणे या सगळ्यासाठी वेगवेगळे डॉक्टर असतात. पण पूर्णिमाने हे सगळे एका छताखाली आणले आहे. दहा ठिकाणी जावे लागावे नाही म्हणून या सर्व उपचारांना ‘गॉरजियस’ एकाच क्लिनिकमध्ये मांडले आहे. हे सर्व करत असताना विविध प्रकारचे लोक भेटतात. त्यांच्या विचित्र मागण्या ऐकूनही अगदी आश्‍चर्य होते. एकदा एका पोरीने पूर्णिमाला म्हटले, मला अगदी तुमच्यासारखे बनवण्याचे किती पैसे लागतील? एका महिलेला दीपिका पदुकोणसारखी हनुवटी करून हवी होती. काही तर चित्र घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला असे व्हायचे आहे. अपघातात चेहर्‍याचा आकार बिघडलेले बरेच लोक पूर्णिमाकडे आपला चेहरा नीट करण्याकरिता येतात. लग्नापूर्वी चेहर्‍यावरचे डाग घालवण्यासाठीही रांग असते. मराठी असल्याचा तिला अभिमान आहे. मराठी माणसांनी मला खूप मदत केली व दाद दिली. लायपोसकशन करून चरबी काढणे या प्रकाराला आपल्या देशात भयाण समजले जाते. पण ते किती फायद्याचे आणि सोयीचे हे तिने अनेकांना समजावून त्यांचे जीवन हलके केले. आज तिचे मुंबईत पाच क्लिनिक आहेत. जयपूरलाही तिचे एक क्लिनिक आहे. आपली 50 केंद्रे असावीत हे स्वप्न ती लवकरच साकार करील असे आश्‍वासन देते. तिचे पती डॉ. सॅबियो डिसुझादेखील तिच्या पाठीशी असतात.

तिचे मराठीपण, तिचे मूळ नाव आणि स्वप्न जपण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तिचा 16 वर्षांचा मुलगा प्रतीत तिचा लाडका आहे. कुणाकडून एक पैसा न घेता शिक्षण व मेहनतीचे भांडवल हाताशी धरून डोंबिवलीतली पोरगी आज कुठल्याकुठे पोहोचली. फेमिना मिस इंडियाच्या पॅनलवरही पूर्णिमाचे महत्त्वाचे स्थान आहे.स्त्री असून व्यापारात पडणे हा मूर्खपणा असे समजणार्‍या अनेकांना तिने शालजोडीतले फटके दिले आहेत. तिला अजून खूप काही करायचे आहे. व्यवसायात असलेल्या स्त्रियांना मदत करण्याकरिता एक सामाजिक संघटना बनवायची आहे. जे त्रास तिला झाले त्यातून ती खूप शिकली व इतर महिलांना मदत व्हावी अशी तिची इच्छा आहे. ती चेहरे सुंदर करतेच पण मने सुंदर करण्याचा कार्यक्रम तिला भेटल्यापासूनच सुरू होतो. तिचा आपलेपणा अगदी आपलेसे करून घेतो. सुंदर पूर्णिमाला संपूर्ण जग सुंदर दिसावे असे वाटते. तिच्या ताब्यात असलेली सर्व माणसे आपोआप सुंदर होऊ लागतात.

डॉ. पूर्णिमा म्हात्रे हे नाव कॉस्मेटिक सर्जरीसाठी आता खूपच नावाजले आहे. ‘माझे गाव डोंबिवली’ हे सांगणारी पूर्णिमा आपल्या मराठीपणाचे ठसे सर्वत्र उमटत असते. तिच्या क्लिनिकमध्ये मराठी संभाषणे ऐकू येतात. रिसेप्शनवर बसलेल्या मुलींपासून ते चहा आणणार्‍या पोरीपर्यंत सर्व मराठी. कमाल म्हणजे पूर्णिमा मराठीतच संभाषण सुरू करते. अगदी अमराठी लोकांशीसुद्धा. तिने स्वत:च्या हिमतीवर स्वत:च्या आयुष्याला आकार दिला, तसेच ती इतरांच्या जीवनात घडवत आहे. मला ती आधुनिक शिल्पकार वाटते. ‘मी फक्त वाकडी नाकं आणि फाटके ओठ नीट करत नाही. त्या काळात गप्पा मारून मनही सरळ करते’ असे डॉ. पूर्णिमा म्हात्रेचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment