Sunday, May 29, 2011

व्ही. नाही ‘कि. शांताराम’



‘मोठ्या बापाचा आहे ना, मग काय म्हणायचे!’ असे फार सहजपणे बोलले जाते. पण मोठ्या बापाचे असणे म्हणजे काय चीज आहे, हे त्या परिस्थितीत असल्याशिवाय कळत नाही. मोठेपणाचे ओझे वेळेआधीच डोईवर ठेवले जाते. ‘आपण कोण’ हा शोध स्वत: लावण्यापूर्वीच ‘आपण कोण’ हे आपल्याला सांगितले जाते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसेच प्रत्येक परिस्थितीच्याही दोन बाजू असतात. किरण शांताराम म्हणतात की, ‘मी व्ही. शांताराम यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. या कुटुंबात जन्म झाला हे माझे भाग्य आहे.’

26 जून 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपण फारच सुखात गेले. किरण शांताराम यांच्या आई, शांतारामबापूंच्या दुसर्‍या पत्नी, बहीण राजश्री व तेजश्री या किरण यांचा जीवच. दादरच्या किंग जॉर्ज शाळेत त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. खूप मित्र, सुखी कुटुंब आणि खूप प्रेम हेच त्यांचे आयुष्य होते. शिक्षकांचे व सवंगड्यांचे लाडके किरण आई-वडिलांचाही प्राणच होते. आई-वडिलांकडून लहानपणी मिळालेले अमाप प्रेम त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे कारण असावे असे त्यांना वाटते. नंतर वडील कामात तल्लीन होऊ लागले. जास्त वेळ स्टुडिओत घालवायला लागले. फिल्मच्या कामात गुंतलेले असताना वडिलांचे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले, पण त्यांच्या आईने पोरांना कधी ते जाणवू दिले नाही. तीन मुलांची संपूर्ण जबाबदारी एकटीने पार पाडली. ‘आईनेच आम्हाला वाढवले’, असे ते सांगतात. शांतारामबापू जास्त वेळ काढू शकायचे नाही कुटुंबासाठी. पण रात्रीचे जेवण मात्र सर्व एकदमच करायचे. किरण हे लहानपणी खूप मस्तीखोर होते. आपण नीटच अभ्यास केला, पण तरीही मार्क कमी पडले असा त्यांचा टाहो असायचा. बहिणी हुशार होत्या आणि दादाच्या लाडक्याही होत्या. पण बाबांपुढे सर्वांची बोलती बंदच असायची. सहावीत असताना तिमाहीच्या परीक्षेत किरणना कमी मार्क पडले. आई अस्वस्थ झाली व शांतारामबापूंना तिने सांगितले. वडिलांची विचारपूस सुरू झाली. जेवताना या विषयावर चर्चा होत होती. किरणने नावडत्या दह्याची वाटी जरा ढकलली. कदाचित त्यांचा अस्वस्थपणा त्यांनी त्या वाटीवर काढला. पण बाबांना फार काय ते आवडले नाही. जेवणावरून उठून शांतारामबापूंनी किरणला हात पुढे करायला सागितला. जोरात हँगरने हातावर मारले. हँगरचा खिळा हातात घुसला. तो दिवस ते कधीही विसरू शकत नाहीत. त्या जखमेची खोक अजूनही किरणना त्यांच्या वडिलांच्या शिस्तीची व मुलांकडून असलेल्या अपेक्षांची आठवण करून देते.

व्ही. शांताराम हे हृदयाने कोमल, पण शिस्तबद्ध असल्यामुळे सर्वांकडून त्यांची हीच अपेक्षा असायची. त्यानंतरचा काळ थोडा कठीण होता. जयश्रीताई व शांतारामबापू यांच्यात मतभेद होऊ लागले. वादविवादांना कारणांची गरज नाही, असे भासू लागले. मुलांवर या तणावाचा फरक पडू नये म्हणून घटस्फोट घ्यायचे ठरवले. जयश्रीताई व शांतारामबापू वेगळे जगू लागले. जयश्रीताईंनी धीराने पोरांना सावरले. आयुष्यात बदल जरी आला तरी किरण शांताराम यांनी आपण मोठे आणि घरातला पुरुष असे समजून नव्याने जीवनाकडे पाहायला सुरू केले. ‘दो आँखे बारा हात’ या चित्रपटात एका बैलाशी मारामारीचा सीन आहे. त्याचे चित्रीकरण करताना शांतारामबापूंना एक अपघात झाला. त्यांच्या डोळ्याला त्या बैलाचे शिंग लागले व त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. कागदी नाती तुटली तरी मनाच्या तारा जुळूनच राहतात. म्हणूनच जयश्रीताई बेचैन झाल्या. मधल्या काळात शांतारामबापूंशी अजिबात संपर्क नसल्यामुळे विचारपूस कशी करावी, या दुविधेत होत्या. त्यांनी किरणना सांगितले, ‘तुम्ही पोरं बाबांना भेटून या. मलाही त्यांची खबर कळेल आणि त्यांनाही बरं वाटेल.’ आईचे पाणावलेले डोळे पाहून किरणनाही भरून आले. बहिणींना घेऊन ते शांतारामबापूंना भेटायला गेले. त्यांना सर्व अण्णा म्हणायचे. ‘अण्णा पोरं आली,’ हे ऐकून शांतारामबापू खूप खूश झाले. गप्पा, पाप्या आणि प्रेम यात संपूर्ण दिवस गेला. स्टुडिओत सहाची घंटी वाजल्यावर त्यांनी किरणना ‘घरी जा आता! आई वाट पाहत असेल’, असे सांगितले. अण्णांनी किरणना जवळ बोलावले आणि म्हटले, ‘मला तुझी गरज आहे. शिक्षण झाले की तू लगेच माझ्यासोबत कामाला लाग.’ हे किरण यांना मनाला लावले. अकरावीनंतर कॉलेजची पायरी चढली, पण वडिलांची ओढ त्यांना राजकमल स्टुडिओत घेऊन गेली. नवरंगच्या चित्रीकरणाच्या काळात त्यांनी अण्णांच्या असिस्टंटचे काम केले. शांतारामबापूंनी त्यांना विविध फिल्म फेस्टिव्हलना पाठवले. सिनेमा जगतातील अनेक नव्या गोष्टी शिकण्याकरिता परदेशात पाठवले. वॉल्ट डिस्ने येथे वर्षभराचा स्टुडिओ मॅनेजमेंटचा अभ्यासही केला. व्ही. शांताराम यांना जाऊन आज 22 वर्षे झाली. गेली 51 वर्षे किरण शांताराम आपल्या वडिलांचा वारसा, राजकमल स्टुडिओ व प्लाझा थिएटर सांभाळत आहेत. 1966 मध्ये ज्योतीजींशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न फार मोठ्या प्रमाणात झाले. हा दिवस त्यांच्या जिव्हाळ्याचा. यासाठीसुद्धा कारण घटस्फोटानंतर पहिल्यांदा त्यांचे आई-वडील समोरासमोर आले. मुलाच्या सुखासाठी म्हणा की ज्योतींचा पायगुण म्हणा पण त्या दिवशी संपूर्ण शांताराम कुटुंब एका छताखाली जमले. प्लाझाचे नूतनीकरण व राजकमल स्टुडिओत काळाप्रमाणे गरज असलेले काही बदल हे त्यांचे पुढचे पाऊल आहे. या वाटचालीत त्यांचे सुपुत्र राहुल व चैतन्य त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या सुना अनिता व लक्ष्मी ही ज्योतींजीप्रमाणेच घरात संस्कार व संस्कृतीची उधळण करतात. त्यांच्या चार नातींना त्यांनी गोड नावेसुद्धा दिली आहेत. निमॉनला परीराणी, गौरवीला फुलराणी, क्रिषला मधुराणी आणि आईशाला छोटीराणी. ते सर्वांना सांगतात माझ्या चार राण्या आहेत आणि एक महाराणी तेही ही म्हणतात. मी संतुष्ट आहे. माझे घर हाऊसफुल आहे. मी बाबांचे नाव ठेवले आणि माझी मुलेही ते नाव जोपासतील. सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जो चांगले काम करील मी त्याच्या सोबत उभा राहतो हे त्यांचे म्हणणे. सर्व समारंभांना त्यांना आवर्जून बोलावले जाते आणि ते लोकांच्या प्रेमाखातर जातातही. अनेकांना त्यांच्या टोपीबद्दल फार कुतूहल असते. ‘ते व्ही. शांताराम यांची कॉपी का करतात’ असा प्रश्‍न बर्‍याच जणांच्या मनात उद्भवतो. पण त्याचेही कारण आहे.

30 ऑक्टोबर 1990 मध्ये व्ही. शांताराम यांचे निधन झाले. बरोबर दोन दिवस आधी त्यांनी किरणना बोलावून घेतले. 4 तास दोघांनी गप्पा मारल्या. त्याचवेळी शांतारामबापूंनी स्वत:ची टोपी काढून किरण यांच्या डोक्यावर ठेवली व त्यांना सांगितले, ‘मी माझी जबाबदारी तुझ्या डोक्यावर ठेवत आहे. ती नीट पार पाड. ही टोपी माझा आशीर्वाद आहे. जो सदैव तुझ्या डोक्यावर राहील. लहानपणी फार वेळ देता आला नाही, पण यापुढे मी तुझ्या सोबतच असेन.’ हे एकूण त्यांचे डोळे भरून आले. या दिवसानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांची टोपी म्हणजेच त्यांच्या जबाबदार्‍या धारण केल्या. बहिणी, तीन आया (शांतारामबापूंच्या तीन पत्नी विमलाताई, जयश्रीतार्ई आणि संध्याताई) आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी व त्यांच्या गरजा किरण यांनी जोपासल्या. व्ही. शांताराम हे नाव जपण्यासाठी त्यांनी स्वत:चे नाव, इच्छा व त्यांची छबी पणाला लावली.

‘झुंज’सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही राजकमल सांभाळताना बर्‍याच इच्छा राहून गेल्या. आता त्यांना चित्रपट काढावेसे वाटतात. व्ही. शांताराम जपता जपता के. शांताराम कुठेतरी हरवून गेले. मुंबईचे शेरीफ झाले तेव्हा त्यांनी अनेकांना मदत केली, दिशा दिली पण स्वत:च्या स्वप्नांना कधी फार वाव दिला नाही. किरण शांताराम होणे हे व्ही. शांताराम होण्याएवढेच कठीण आहे, कदाचीत जास्त कठीण.

No comments:

Post a Comment