
कोण चांगले आणि कोण वाईट याचा हिशेब कधीच लागत नाही. एकीकडे रामाची पूजा होते, तर दुसरीकडे रावणाला मानले जाते. कोण कुणाला आणि का मानेल हे गणित समजण्यापलीकडचे आहे. बिहारमधील सीवान जिल्ह्यात बंगरा गावात लवकरच एका पुतळ्याची स्थापना होणार आहे. हिंदुस्थानच्या पहिल्या पंतप्रधानांचा जन्म जरी इथे झाला असला तरी पुतळा मात्र त्यांचा उभारला जात नाही. चार्ल्स शोभराजच्या अलीकडल्या काळातील एका प्रसिद्ध ठगाचा ‘नटवरलाल’चा पुतळा उभारला जाणार आहे. 1912 मध्ये जन्मलेल्या नटवरलालचे खरे नाव आहे मिथिलेशकुमार श्रीवास्तव. लहानपणापासून मिथिलेश हातचलाखीत उस्ताद असल्याचे त्याचे गावकरी सांगतात. गंमत जंमत म्हणून इथले तिथे करणारा मोठा होऊन अनेकांना उल्लू बनवेल असे कुणाला वाटले नव्हते. आठ राज्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते. जवळजवळ 100 केसेसचा मालक नटवरलाल किमान 50 वेगवेगळ्या नावांचा वापर करून गुन्हे करीत आलाय. मिथिलेशकुमार हा राजेंद्रप्रसाद यांना फारच चांगला ओळखत होता असेही काही लोक सांगतात. डॉ. राजेंद्रप्रसाद यांची खोटी सही करून त्यांना संकटात आणल्यापासून त्यांचे संबंध तुटल्याचे काहींचे म्हणणे आहे. किती खरं किती खोटं हे नटवरलालशिवाय कुणीच नाही सांगू शकत. 1979 मध्ये याच मिथिलेशकुमारवर ‘मिस्टर नटवरलाल’ नामक सिनेमाही बनवला गेला. अमिताभ बच्चनने ते पात्र फारच सुंदर निभावले. नटवरलाल मूळचा बिहारचा, पण त्याला बर्याच भाषा येत होत्या. गोड गोड गप्पांमध्ये रंगवून साधेसुधे असल्याचे सोंग घेऊन तो सहजपणे लोकांना ठगवायचा. एखाद्याशी गहन विषयावर चर्चा करता करता समोरच्याचे घड्याळ, पाकीट, अंगठ्या त्याच्याकडे पोहोचायच्या आणि समोरच्याला कळतही नसे. नटवरलालने शहाजहानच्या आत्म्याला तर खूपच यातना दिल्या. ताजमहाल बांधणार्या कामगारांचे हात कापले गेले असा ताजमहल परत बनू नये म्हणून, पण या नटवरलालने हाच ताजमहल फिरंग्याना तीन वेळा विकला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ज्या लाल किल्ल्यावर आपला झेंडा डौलाने फडकतो तो लाल किल्लाही त्याने दोन वेळा विकला आहे. हे तर काहीच नाही. नटवरलालने राष्ट्रपती भवनाचाही एकदा सौदा करून टाकला आहे. फक्कड मार्केटिंग करीत असणार्या या ठगाला जर हिंदुस्थानचा पर्यटन मंत्री केले असते तर आज थोडीफार कमाई पर्यटनानेही झाली असती. किंवा कदाचित संपूर्ण हिंदुस्थान त्याने विकला असता. कॉमनवेल्थ, 2जी वगैरे जे आजचे घोटाळे आहेत यालाही ठगी म्हणायला हरकत नाही. पण नटवरलाल आणि या ठगांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. नटवरलालने नेहमी श्रीमंतांना लुबाडले, लुटले आणि गरीबांना मदत केली. गावची परिस्थिती सुधारण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. बर्याच कुटुंबांना दोन वेळचे अन्न आणि रोजगाराकरिता प्रवास करण्यासाठी पैसे त्याने पुरवले. गावचा ‘हीरो’ असे त्याला म्हटले जाते. कोणत्याही वेशात येऊन मदत करून जाणारा नटवरलाल कुणाच्या लक्षात येण्याआधी ‘छू’ व्हायचा. कुणी अनोळखी मदत करून गेला का गावकरी म्हणायचे, ‘आपला मिथिलेश येऊन गेला वाटते!!’ पोलिसांच्या हाताला तर तो लागायचाच नाही. पकडला गेला तरी तो सुरेखरीत्या निसटून जायचा. शेवटचे त्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पाहण्यात आले असे सांगतात. 24 जून 1996 ला पोलीस त्याला व्हीलचेअरवरून उपचारासाठी एम्स इस्पितळात नेत होते. निसटणे हा त्याचा गुणधर्म असल्यामुळे तो निसटला. हे त्याचे शेवटचे फरारी होणे. 100 वर्षांची कोठडी ही सजा लागू असणार्या नटवरलालने 10 वेळा जेलमधून पळ काढला. पण शेवटपर्यंत त्याने हार नाही मानली. मोठ्यामोठ्यांच्या सह्या मारून पत्र तयार करणारा, देशाच्या इमारती विकणारा हा आगळावेगळा ठग रांचीमध्ये आपल्या मुलीच्या सासुरवाडीत मरण पावला असेही ऐकण्यात येते. तसे त्याच्या मरणाच्या कथाही कमालीच्या. त्याचा धाकटा भाऊ गंगाप्रसाद श्रीवास्तव सांगतो की, 1996मध्ये त्याने त्याच्या भावाचे अंत्यसंस्कार केले. पण त्याचे वकील नंदलाल जैस्वाल सांगतात की, 2009 साली त्याचे निधन झाले. मरणातही त्याने सर्वांना ठगले. त्याला त्याच्या गावात खूप मानले जाते. लहान मुलांना त्याच्या कथा सांगितल्या जातात. त्याच्या उदारपणाचे व समाजकार्याचे किस्से ऐकवून गावकरी त्याची आठवण काढतात. त्याला ओळखणारे त्याच्या नावाचा वापर करून बरीच कामे साधत. तसेच त्याला न ओळखणारेही त्याचा उल्लेख करून फायदा घेत असत. एकदा त्याच्या गावची एक बाई ट्रेनमध्ये चढली. तिच्या चार नातवंडांना ती नटवरलालच्या गोष्टी सांगत होती. टी.सी. जवळ येऊन म्हणाला, ‘‘मिथिलेश भाईमुळेच मी आज टी.सी. झालो. दिल्लीत येऊन शिक्षण घेण्यापुरते पैसे माझ्या आईवडिलांकडे नव्हते. आम्हाला तर एकवेळचे नीट जेवताही येत नव्हते. पण आज मी कमावतो आणि माझे कुटुंब सांभाळायला समर्थ आहे.’’ त्या बाईकडून त्याने पैसे नाही घेतले व म्हणाला, ‘‘नटवरलालच्या गावच्यांचे पैसे मीच भरतो. कारण ते कुणाला कधीच सापडत नाहीत. मग उपकार फेडायला मला तरी कसे सापडतील! बंगरा गावात जो पुतळा उभारला जाणार आहे ती गावकर्यांची खाजगी जागा आहे. यामुळे सरकार किंवा कुणीही या उभारणीचा विरोध नाही करू शकत. त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी गावकर्यांनी हा निर्णय घेतला आहे. बिहारचे डी.जी.पी. नीलमणीदेखील सांगतात की खासगी जागेत हा पुतळा उभारत असल्यामुळे कुणी काही करू शकत नाही.
सध्याच्या डरपोक, लाचखोर ठगांना या दिलदार नटवरलालची सर नाही. कोटींचा चुना लावून कोटी घरांत अन्न देणारा ठग की समाजसेवक हा प्रश्नच आहे. स्वत:चे खिसे भरून स्विस बँकेत अकाऊंट उघडणारे मखमलच्या गाद्यांवर झोपतात आणि लांबलचक गाड्या मिरवतात त्यांच्यापेक्षा हा नटवरलाल बरा. त्याने ताजमहल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकले असेल; पण त्याचा आत्मा विकला नाही. सराईतपणे त्याने लोकांना चुना लावला. त्याच्या करामती ऐकण्यासारख्या आहेत. नटवरलाल म्हणजे चुन्याची फॅक्टरी. एखाद्या गावात कारखाना आला की गावाला तेज येते, लोक पोटं भरतात. तसेच या चुन्याच्या फॅक्टरीनेही अनेक घरं चालवली. पुढल्या वेळी ताजमहाल, लाल किल्ला किंवा राष्ट्रपती भवन पाहिलेत की तुम्हाला नक्की हसू येईल आणि ही चुन्याची फॅक्टरी आठवेल.
No comments:
Post a Comment