Thursday, May 19, 2011

खरा ‘कळाकार’



खरं तर आपण सगळेच कलाकार आहोत. कारण आयुष्य जगणे हीदेखील एक कलाच आहे. जे रडतखडत, रुसत, फुगत जगतात ते पडिक, फ्लॉप आणि जे प्रत्येक क्षणाचा, सुखाचा, दु:खाचा आनंद घेतात ते हिट. वितभर सुखासाठी हातभर दु:खांशी कॉम्प्रमाईज करण्याला आयुष्य म्हणत नाही. आयुष्य म्हणजे भेलपुरी, तिखट-गोड दोन्हीची चव घेणे. १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन शहरातील गलिच्छ वस्तीत जन्मलेल्या चार्लीने आपले आयुष्य चव घेत घेत काढले. त्यांचे संपूर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅप्लीन. त्यांचे वडील चार्ल्स सीनियर व आई हॅना. दोघेही रंगमंचावर गायचे. चार्ली ३ वर्षांचा असतानाच त्याचे आईवडील वेगळे झाले. आईची बिघडती तब्येत, गरिबीची झळ आणि यातना हेच चार्लीचे जग होते. वडील लुईस नावाच्या स्त्रीबरोबर राहात होते. त्यांचीही आर्थिक परिस्थिती वाईटच होती. एकदा चार्लीला खूप भूक लागलेली. आजारी आईला पावाचे दोन तुकडे देऊन तिचे पोट भरले. भावाला एक तुकडा दिला व स्वत: ढेकर देऊन जेवण अंगावर आल्याचे केलेले नाटक ही त्यांच्या आयुष्यातली पहिली ‘नाट्य भूमिका’. भाऊ सिडनी व चार्ली दोघे वडिलांसोबत काही काळ राहिले. आईला रुग्णालयात ठेवल्यावर त्यांचा नाइलाज झाला. लुईसशी फार पटत नसे. तिने त्यांना आर्चबिशप टेंपल बॉईज स्कूलमध्ये टाकले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी पैसे कमवायला सुरू केले. रस्त्यावर गाणी गाऊन व त्या गाण्यांना अभिनयाची साथ देऊन ते कसेबसे दोन वेळचे जेवत. दारूडे वडील आणि आजारी आई यांच्याकडून शिकलेले गाणे हेच त्यांच्या आयुष्याचे भांडवल होते. चार्ली १२ वर्षांचा असताना १९०१ मध्ये वडील गेले. ‘द एट लॅन्कशायर लॅड्स’ हे त्यांचे पहिले बालनाट्य. लोक चार्लीला ओळखू लागले. विलियम जिलेट यांच्या मदतीने ‘शेरलॉक होम्स’ या नाटकात चार्लीला ‘बिली’ हे पात्र मिळालं.
चार्लीचे बालपण त्याला जगायलाच मिळाले नाही. डोळ्यात भरलेल्या पाण्यातच त्याने आशेच्या होड्या सोडून पावसाळे काढले. आपल्या दु:खाला हशा व टाळ्यांच्या ऊबदार पांघरुणात घालून त्यांनी रात्री काढल्या. हसणे म्हणजे जगणे म्हणणार्‍या चार्ली चॅप्लीनने स्वत:वर हसून दुसर्‍यांना हसवले. त्यांचे काम पाहून मोठ्या मोठ्यांना त्यांच्या सोबत काम करावेसे वाटले. १९१० मध्ये फ्रेड कार्मो कंपनीने त्यांना अमेरिकेत नेले. प्रेक्षकांनी चार्लीला डोक्यावर घेतले. एका प्रयोगात चार्ली सुपर हिट झाला. ‘अ नाईट इन ऍन इंग्लिश म्युझिक हॉल’ या नाट्यात चार्लीने तुफान अभिनयाने अमेरिकेला हादरून टाकले. म्युचुअल फिल्म कॉर्पोरेशनने त्यांना एका वर्षात ३५ पिक्चरसाठी पैसे दिले. फ्लोरवॉकर, फायरमॅन, वॅगाबॉण्ड, वन ए.एम, द काऊंट, पॉनशॉप, द रिक, बिहाइंड द स्क्रीन, इजी स्ट्रीट, द क्योर, ‘द इमिग्रंट’, ‘द ऍडव्हेंचरर’ अशा अनेक कॉमेडी चित्रपटांत चार्लीने आपल्या अभिनयाची जादू पसरली. हसून हसून डोळ्यात पाणी, पोटात कळ आणि मोकळे मन घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडणार्‍या प्रेक्षकांना चार्ली नक्की हसवतो की रडवतो हे कळतच नव्हते. कधीकाळी एखाद्या घासासाठी तरसणार्‍या चार्लीचे पोट कौतुकाने भरत होते व त्याने चांगले पैसेही कमावले. त्याने कलेला आणि कलेने त्याला जोपासले.
चार्ली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. लहानपणी न मिळालेल्या चॉकलेटमध्ये त्याला त्याचे बालपण सापडायचे. भूक मारण्यासाठी चहा प्यायचा चार्ली कमी वयातच. पण चार्ली चॅप्लीन मोठा कलाकार होऊनही चहा त्याच्या आयुष्याचा भागच राहिला. प्रेमाची भूक ही सर्वांनाच असते. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणे, वडिलांची कडकडून मिठी, कुणीतरी आपली वाट पाहणे हे सर्व चार्लीसाठी स्वप्नासारखेच होते. हेटी केलीच्या प्रेमात पडून १९व्या वर्षीच त्याने तिच्याशी लग्न करायचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. तिने तो नाकारला. ती चांगली डान्सर होती. चार्लीला जीवनात सहन करायची चांगलीच सवय होती. हे दु:खही त्याने पचवले. पण काही वर्षांत फ्लूच्या साथीत तिचा मृत्यू झाला हे ऐकून चार्ली तुटला. जगाला हसवणारा खूप रडला. त्या वेळेस त्याला व्यथेला समजावता आले नाही. पण त्या दु:खाचेही त्याने जगासमोर हसे करून सर्वांना हसवले. त्याच्या डोळ्यातले पाणी कधी आपल्या डोळ्यात आले हे प्रेक्षकांना कळायचे नाही. चार्लीच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या व गेल्या हेटीच्या मृत्यूनंतर तो एडना पुरवीआन्सच्या प्रेमात पडला, असे सर्व म्हणायचे. पण मिलड्रेड हॅरीसशी लग्न करून त्याने संसार थाटला. तीसुद्धा कलाकारच होती. नॉरमन नावाचा मुलगा झाला त्यांना. चार्लीने हॅरीसशी घटस्फोट घेतला, कारण तिचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला कळले. तो स्त्रियांमध्ये आईचे रूप शोधायचा. कधीही न मिळालेले प्रेम त्याला मिळावे हे त्याचे स्वप्न होते. लीटा ग्रेशी झालेले लग्नही असेच विस्कटले. तिला झालेल्या दोन मुलांवर चार्ली खूप प्रेम करत.
चार्ली जुनियर आणि सिडनी अर्ल ही दोन लीटा आणि चार्लीची मुले. जुएन बॅरीला एका चित्रपटात चार्ली काम देणार होता. तिने चार्लीवर आरोप केला की तिची मुलगी कॅरल ही चार्लीचीच आहे. तो काळ चार्लीसाठी फार त्रासदायक होता. त्याच काळात १६ जून १९४३ला त्यांनी ऊना ओनीलशी लग्न केले. चार्ली ५४ आणि ऊना १८ अशा वयामध्ये त्यांनी नव्याने आयुष्य सुरू केले. तिच्यापासून चार्लीला ८ मुले झाली. जेरालडीन, मायकल, जोरफीन, व्हिक्टोरिया, ऊनी, जेन, एनेट व ख्रिस्टोफर ही त्यांची पोरं. त्यांनी चार पुस्तके लिहिली. ‘माय ट्रीप अब्रॉड, अ कॉमेडीयन सीझ द वर्ल्ड, माय ऑटोबायोग्राफी आणि माय लाई पिक्चर्स. त्याने अनेक गाणी लिहिली व त्यांना संगीतही दिले. ‘स्माईल’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे. त्यांना ‘सर’ हा किताब १९७५ साली देण्यात आला.
डाव्या विचारांचे चार्ली राजकारणातही रस ठेवायचे. आपल्या नाट्यात सरकार व अव्यवस्थित समाजाची खिल्ली उडवून जनतेला विचार करायला लावायचे. हिटलरलाही चॅप्लीनने सोडले नाही. १९४० मध्ये द ग्रेट डिक्टेटर या चित्रपटाने सर्वांच्या आतड्यांना हसवून हसवून खूप व्यायाम दिला. सिनेमासृष्टीतील त्यांच्या कलात्मक दृष्टीवर प्रसन्न होऊन एलिझाबेथ राणीच्या हस्ते त्यांना ‘नाईट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. १९७२ साली त्यांना ऑस्कर पारितोषिक देण्यात आले. चलत् चित्रपटांचा जमाना सुरू होण्यापूर्वीच १९७७ साली त्यांचे निधन झाले. चित्रपटसृष्टीत एक नवे विश्‍व निर्माण करणारा तो ‘विश्‍वामित्र’ होता. आजही त्यांचे ते स्थान जगात सर्वमान्य आहे. चार्ली चॅप्लिनचे जुने चित्रपट पाहायला नवी पिढी आजही तेवढीच उत्सुक असते. चार्लीचे लहानपण फारच वाईट परिस्थितीत गेले. रडण्याचे हसू करून त्यांनी जगाला हसवले. मला तर प्रश्‍न पडतो की, हा कलाकार की ‘कळाकार’ आहे. तो आपल्या वेदनांची व कळांची ‘कला’ करून जग जिंकतो. हसरे ओले ओठ आणि पाणावलेल्या ओल्या पापण्या एकाच वेळी कसे करायचे याचा गुरूमंत्र होता चार्ली या कलाकारांत. टायटल ‘कळाकार’ आहे. ते चुकलेले नाही. चार्लीच्या कळांनी त्याला मोठे केले. चार्ली चप्लिनने म्हटले आहे, हसण्याविना जगणे व्यर्थ. हसत रहा. हसवत रहा. आयुष्याच्या भेलपुरीतील तिखट-गोड स्वादाचा आनंद घेत रहा.

No comments:

Post a Comment