
प्रत्येकजण दिवस-रात्र कष्ट करत असतो, एक चांगले जीवन जगण्यासाठी. सामान्य माणसंदेखील स्वप्नं पाहतात ती सामान्य असतील कदाचित, पण शेवटी स्वप्नं ती स्वप्नंच. ही स्वप्नंच जगण्याचे कारण असतात. दोन वेळेचे पोटभर जेवण आणि वर्षात एकदा कुटुंबासोबत कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणचा प्रवास एवढ्यावर अनेकांच्या जीवनाचे सार्थक असते. मेच्या सुट्टीत कुठेतरी जायचे या स्वप्नावर विचार अगदी वर्षभर आधीच सुरू होतो. मग काय कपडे घालायचे, कसे फोटो काढायचे हे सगळं मनात फिरत राहाते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभर काटकसरही होते. या स्वप्नात कोणताही अडथळा किंवा व्यत्यय जीवघेणे वाटते व सहन होण्यापलीकडले जाणवते. व्हेकेशन प्लॅनमधील एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध झाली की वर्षभर त्या आठवणी काट्यासारख्या टोचत राहात. हे सर्वकाही लक्षात ठेवून असलेले सचिन ट्रॅव्हल्सचे ‘सचिन जकातदार’ कधीच टूर विकत नाहीत. ते स्वप्न विकतात. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक व्ही.आय.पी. असतो व त्याचे स्वप्न आपले समजून त्यात निरनिराळे रंग भरण्याचे काम करतात सचिन.
30 नोव्हेंबर 1973 मध्ये जन्माला आलेल्या सचिनला ‘ट्रॅव्हलस् ऍण्ड टुरिझम’चे संस्कार लहानपणापासूनच मिळाले. त्याचे वडील प्रमोद जकातदार यांनी सचिनच्या पहिल्या वाढदिवसाचाच मुहूर्त ठरवून आणि त्याचेच नाव देऊन ‘सचिन ट्रॅव्हल्स’ची स्थापना केली. सचिनचे बालपण दादरमध्ये गेले. साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण आणि आपल्या आजोबांकडून आयुष्याचे धडे हा अभ्यासक्रम म्हणजेच त्याचे खरे भांडवल. त्याचे आजोबा प्रकाशभाई मोहाडीकर यांच्यामुळे त्याला फार कमी वयात मोठमोठ्या व्यक्तींना भेटायला मिळाले. ते अतिशय साधे, पण ग्रेट आहेत हे त्याला लहानपणीच कळले होते. सचिनचे लक्ष घरच्या व्यवसायातच असूनही वडिलांच्या आज्ञेखातर ‘इलेक्ट्रिकल ऍण्ड पावर सीस्टम इंजिनीयरिंग’ची पदवी मिळवली. पण गमतीची गोष्ट अशी की सचिन हसत सांगतो, ‘‘पदवी आहेच, पण मला फ्यूजसुद्धा बदलता येत नाही.’’ मात्र टुरिझम क्षेत्रातले कोणतेही शिक्षण न घेता याबाबतीतले सचिनचे गणित चोख आहे. उलट 1 वर्षाचा ‘ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम’चा कोर्स त्यानेच त्यांच्या कंपनीतर्फे योजला आहे. ‘‘या व्यवसायामुळे मला वेगवेगळ्या लोकांना भेटता येते, जग बघायची संधी मिळते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. हा व्यवसाय मला तरुण ठेवतो व जिवंतपणाची जाणीव भासवत राहतो,’’ असे सचिनचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तो हेही सांगतो की, ‘‘आपण कितीही केले तरी एखादी ट्रिप जमत नाही कधी कधी. आपल्या हातात नसलेल्या कारणाने का होईना, पण ग्राहक नाराज झाला की वाईट वाटते.’’ आज त्याचा संपूर्ण परिवार त्याच्या जोडीला आहे. वडील प्रमोद, आई शुभदा हे फक्त आशीर्वादासाठीच नाही तर मदतीलाही हात पुढे करतात. पत्नी सोनालीने तर आकड्यांचा भार एकटीनेच झेलला आहे. भाऊ संकेत व त्याची पत्नी केतकी यांनीही सचिनचा भार हलका केला आहे. एवढेच नाही तर सचिनचा 4 वर्षांचा मुलगा छोटा वेदांतसुद्धा जगातील सर्व जागांची माहिती बिनचूक देतो. तसे सचिनने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. शून्यातून विश्व उभारणे हे एकदाच नाही तर बर्याचदा त्याने केले. दर वेळी जिद्दीने पुन्हा उभे राहून त्यानेच संकटावर हसून दाखवले. कामात आलेले अपयश हा त्याच्या आयुष्यातला अडथळा कधीच ठरले नाही. पण 5 फेब्रुवारी 2000 या दिवशी रात्री साडेअकरा वाजता सचिन त्याच्या मित्राची स्कूटर घेऊन टिळक ब्रीजवरून येत होता. त्याचा अपघात झाला. पाऊण तास तसाच पडून राहिला सचिन. घरच्यांनी पटकन सायन हॉस्पिटलला नेले. ‘गँगरीन’ होत असावे या भीतीने हिंदुजाला नेण्यात आले. त्यानंतर 6 महिने हॉस्पिटलमध्येच काढले. ‘या अपघाताने मला आयुष्यभराचे तत्त्वज्ञान शिकवले’ असे तो सांगतो. नातेवाईक कमी, पण सचिन ट्रॅव्हल्सबरोबर प्रवास केलेले असंख्य पर्यटक वारंवार त्यांना भेटायला येत. हॉस्पिटलच्या बेडवरून सचिन ट्रॅव्हल्स चालवणारे सचिन सकारात्मक विचारांचा साठाच आहेत. त्यामुळे दु:ख आणि त्रासही त्यांना घाबरून पळ काढतो.
व. पु. काळे सचिनशी गप्पा मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तासन्तास घालवत. सचिनमुळे अनेकांना व. पुं.चे सान्निध्य लाभले. या अपघातानंतरचा ‘रिटर्न ऑफ सचिन’ झाला आहे तो जास्त जोमाने झाला आहे. सचिनने नेहमीच नवीन नवीन सहली व प्लॅन आपल्यासमोर ठेवले. 2007 मध्ये भरारी नावाची सहल काढली. ही 26 अपंग मुलांची सहल होती. फार धाडस करून त्या मुलांना स्वीत्झरलँडला नेले. वेगवेगळे अपंगत्व असलेल्यांमध्ये एक आंधळा होता. त्याला सर्वकाही समजावण्यासाठी एक स्पेशल गाईड सुरुवातीपासूनच दिला गेला. त्या आंधळ्या माणसाने सचिनला माऊण्ट टीटलसला पोहोचल्यावर फोन लावून घेतला व म्हणाला, ‘‘तुमच्यामुळे जे कधी पाहता आलेच नसते ते पाहत आहे. धन्यवाद सचिनजी,’’ अशा अनुभवांनी जाणवलं की आपण बरोबर मार्गाने जात आहोत.
अनेक मजेशीर प्रसंगही घडतात. एका पर्यटकाने सचिनला फोन केला आणि म्हणाले, ‘‘अहो इथे खूप पाऊस पडत आहे. आम्हाला कश्मीर पाहायला जमतच नाही. काहीतरी करा.’’ आता पाऊस कसा थांबवावा यावर विचार नाही केला सचिनने, पण यांना कसे समजवावे याचा मात्र फक्त विचारच करता आला. एकदा तर गाईडने सर्वांना सांगितले की ‘‘मी जंतर मंतर म्हणालो की गाडी थांबेल. मग सर्वांनी उतरायचे व टॉयलेटला जाऊन परत गाडीत बसायचे. हनिमून कपलचे या संभाषणाकडे काडीमात्र लक्ष नव्हते. अष्टविनायकाला जाताना मुंबई सोडल्यावर गाईडने पहिल्यांदा म्हटले ‘जंतर मंतर’. हे जोडपे कॅमेरा घेऊन उतरले. बाहेर फोटो काढत वेळ काढणार्या जोडप्याला गाईडने म्हटले, ‘‘काय करताय, चला!’’ त्यावर त्याने विचारले, ‘‘अहो जंतर मंतर कुठे आहे? आम्हाला फोटो काढायचा आहे.’’ असेच असते हे स्वप्नांचे जग. ‘‘सचिनजी आम्हाला बेस्ट सोय करून द्या.’’ हे ऐकून सचिनजी खरंच तेवढे लक्ष घालतात. ऑनलाईन रिझर्वेशन, ट्रॅव्हेल हेल्पलाईन, सचिनचे स्वत:चे पोर्टल हे सर्व लवकरच आपल्यासमोर येईल. अष्टविनायक, महाबळेश्वर, ज्योतिर्लिंगपासून ते कश्मीर, कन्याकुमारी, दुबई, हॉंगकॉंग, स्वीत्झरलँडपर्यंत सर्व ठिकाणी सचिन आपले पंख पसरतो. सहल स्वयंवर, क्रिकेट टुरिझम, झीप झॅप झूप हे सचिनचे पर्यटनातील सुपरहिट प्रकार अनुभवल्याशिवाय त्यांची मजा कळणार नाही. सचिन ट्रॅव्हल्स बंद पडण्यापासून ते प्रगतीची अनेक शिखरे गाठण्यापर्यंतच्या प्रवासात सचिनने नेहमी ग्राहकांच्या स्वप्नांना महत्त्व दिले. त्यांनी भरलेल्या पैशांचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी सचिन प्रयत्नशील राहतात. पर्यटकांची संख्या वाढण्यापेक्षा एकच पर्यटक वारंवार प्रवासाला आला तर ते सचिनचे यश असेही ते समजतात. सचिन फक्त निरनिराळ्या जागांवर नेत नाहीत तर थकलेल्या मनांना जागे करूनच आपणात. आनंद आणि स्वप्नांचा होलसेलर असे मी सचिनला म्हणते कारण भरभरून आनंद वाटला जातो इथे. अशीच स्वप्नं रंगवा, असेच रंग उधळा, असेच लोकांना होलसेलमध्ये आनंद वाटत राहा.
जरी लागला जगभर
दु:खांचा झेल...
तुम्ही सतत करत राहा
स्वप्नांचा होलसेल...
No comments:
Post a Comment