
एकदा एक मुलगा अंगणात उभे राहून सूर्याकडे पाहत होता. लख्ख प्रकाशात डोळे मिटत होते तरी त्या सूर्यात काहीतरी शोधत होता. तेवढ्यात सूर्याने त्याला हाक मारली, ‘‘ए पोरा, काय विचार करत आहेस माझ्याकडे पाहून?’’ त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘‘अरे सूर्या, तू यायला कधी चुकत कसा नाहीस? वादळ, वारा, भूकंप, सुनामी काहीही आले तरी तू आपला दुसर्या दिवशी हजर असतोस. तुला कशाचा काहीच फरक पडत नाही का? तू यायला कधी विसरत कसा नाहीस?’’ तेव्हा सूर्याने उत्तर दिले, ‘‘तू कितीही चिडलास, रडलास, दु:खात बुडालास, त्रासलास तरी तू श्वास घ्यायला विसरतोस का? नाही ना! तसेच आहे माझे. मुळात तुला श्वास घेणे हे आठवावे लागत नाही तसे माझे येणेजाणेही ठरलेले आहे. ते तुझ्या आणि माझ्या नकळत सुरूच राहते.’’ कधी कधी अडचणी, अडथळे आपल्यावर हावी होतात, जग संपल्यासारखे वाटते. आता आयुष्य संपणार असे गृहीत धरून वैफल्याचे पांघरूण ओढून आपण झोपून जातो. झोपताना स्वत:ला, आपल्यांना व जगाला अखेरचा टाटा केल्यासारखे डोळे मिटतो. नोकरी सुटली, भांडण झाले, अपेक्षाभंग, प्रेमभंग, आर्थिक नुकसान, भावनिक वेदना, शारीरिक यातना हे सर्वकाही येते आणि जाते. काळ, वेळ, येणे, जाणे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे पण प्रत्येकजण तेच वैफल्याचे पांघरूण ओढतो. तो क्षण, तो प्रसंग शेवटचा वाटतो. पण तसे नसते. कुणाचाही शेवट व कशाचाही शेवट आपल्या हातात नसतो. सर्वकाही ठरलेले असते. सर्व प्रसंग, घडामोडी ठरलेल्या असतात. या प्रसंगांमध्ये आपण कसे वागावे एवढेच आपण ठरवतो. रडगाणे, वैफल्य, छातीतली धडधड हे विकतचे ओढवलेले त्रास आहेत. त्यात गुंतून आयुष्याची मजा घालवू नका. आनंद शोधा, दु:ख नको. तुम्ही दु:खी व्हायचा कितीही प्रयत्न केला तरी आनंद त्याची वेळ चुकवणार नाही. तुम्ही झोपून राहिलात तरी सूर्य उगवणारच. श्वास घेताना विचार नाही करावा लागत तसे आनंद उपभोगताना दु:खाच्या विचारांनी आनंदाचा सत्यानाश करू नका. व्हायचे ते होणार आणि चांगलेच होणार. कारण ‘‘बनानेवाला चलाना जानता है।’’
No comments:
Post a Comment